डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा टॅरिफ सापळा; अमेरिकेशी व्यापार करार करताना भारताने किती तडजोड करावी?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 51 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

राजीव नारायण 

अमेरिकेशी होणारा व्यापार करार भारतीय निर्यातदारांसाठी नवी दारे उघडू शकतो. मात्र वॉशिंग्टनने एकीकडे २५ टक्के आयात शुल्काची (टॅरिफ) भीती दाखवली आहे आणि दुसरीकडे करार केल्यास हा दर १७ टक्क्यांवर आणण्याची तयारी दर्शवली आहे. अशा परिस्थितीत नवी दिल्लीने स्वतःला एक कठीण प्रश्न विचारला पाहिजे. ही दोन भागीदारांमधील चर्चा आहे, की बाजारपेठेत प्रवेश देण्याच्या बदल्यात भारताला आर्थिक आघाडीवर मागे हटायला लावण्याचा हा प्रयत्न आहे? आयात शुल्क कमी होणे स्वागतार्ह असले तरी तो करार फायदेशीर असल्याचा पुरावा ठरत नाही.

या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेने भारतीय वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला. उत्पादन क्षेत्रातील अतिरिक्त क्षमतेच्या चौकशीनंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य करत परस्पर व्यापार करार केल्यास हा दर १७ टक्के ठेवण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. यानंतर कालच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हा करार अंतिम टप्प्यात पोहोचला असून तो पूर्ण होण्याचा मार्ग तयार होत असल्याचे सांगितले.

ही प्रगती वाटत असली तरी २५ टक्के शुल्क हा केवळ एक प्रस्ताव आहे, या आठवड्यात लागू झालेला नवा कर नाही. यातील सवलती आणि आधीपासून लागू असलेले करही महत्त्वाचे आहेत. तसेच १७ टक्क्यांची सवलत ही विनाअट दिलेली नाही. कराराच्या बदल्यात दबाव टाकण्याचे ते एक हत्यार असून या कराराच्या अटी भारताने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे संकटातून सुटका झाल्याची बातमी ठळकपणे समोर येताना भारताने त्यासाठी मोजलेली किंमत पडद्याआड जाण्याचा धोका आहे.

अमेरिकेच्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान अमेरिकेला झालेली निर्यात ५९.५२ अब्ज डॉलरवर पोहोचली असून गेल्या वर्षी ती ५२ अब्ज डॉलर होती. वस्त्रोद्योग, हिरे व दागिने, अभियांत्रिकी वस्तू, औषधनिर्माण, सागरी उत्पादने आणि लहान निर्यात उद्योगांतील लाखो भारतीयांचा रोजगार या बाजारपेठेवर अवलंबून आहे. स्पर्धक आशियाई देशांच्या तुलनेत भारतावर अधिक शुल्क लागल्यास भारतीय उत्पादकांचे व्यावसायिक नुकसान होऊ शकते.

मात्र हे अवलंबित्व दुधारी तलवारीसारखे आहे. अमेरिकेला आपल्या वस्तू आणि सेवांसाठी भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेश हवा आहे, तर भारताला आपल्या निर्यातीसाठी खात्रीशीर बाजारपेठ हवी आहे. अमेरिकेच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये त्यांनी भारतातून १०३.८ अब्ज डॉलरच्या वस्तू आयात केल्या आणि भारताला ४५.६ अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या. ही व्यापार तूट मोठी असली तरी ती काही गैरव्यवहाराचा पुरावा नाही. या तुटीच्या आधारे दुसऱ्या देशाच्या औद्योगिक धोरणावर हुकमत गाजवण्याचा परवाना मिळत नाही. व्यापार ही एका बाजूने दुसऱ्या बाजूवर केलेली मेहेरबानी नसते.

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) भारताच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेवर (PLI), उत्पादन धोरणांवर आणि चिनी कच्च्या मालाच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या धोरणांमुळे गरजेपेक्षा जास्त उत्पादन क्षमता निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. भारताने हा आरोप फेटाळून लावला असून कोणत्याही उद्योगात अतिरिक्त क्षमता नसल्याचे स्पष्ट केले आहे. "मेक इन इंडिया" आणि "पीएलआय" योजना या देशात उत्पादन वाढवण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी राबवलेल्या विकास धोरणाचा भाग आहेत, अशी भारत सरकारची भूमिका आहे. या योजनांवर चर्चा होऊ शकते आणि त्यात सुधारणाही करता येतील; मात्र एका व्यापार भागीदाराला त्यातून निर्माण होणारी स्पर्धा आवडत नाही म्हणून त्या बंद करता येणार नाहीत.

या वाटाघाटींची खरी कसोटी कृषी क्षेत्रात लागणार आहे. अमेरिकेने दुग्धजन्य पदार्थ, अन्नपदार्थ आणि जनुकीय सुधारित (GM) पिकांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेसाठी ही केवळ व्यावसायिक संधी आहे, तर भारतासाठी हा कोट्यवधी लहान शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या उपजीविकेचा व अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे. भारतातील असुरक्षित उत्पादकांना पेलवणार नाही अशा स्पर्धेत ढकलणारा करार झाल्यास त्याची किंमत निर्यातदारांच्या ताळेबंदापेक्षा कितीतरी पटीने मोठी असेल.

याचा अर्थ भारतीय शेतीला स्पर्धेपासून कायमचे दूर ठेवावे किंवा प्रत्येक देशांतर्गत उद्योगाला अनंतकाळ संरक्षण द्यावे असा होत नाही. स्वस्त आयात, नवे तंत्रज्ञान आणि स्पर्धेचा फायदा ग्राहक व उत्पादकांना होऊ शकतो. मात्र बाजारपेठ खुली करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने, परस्पर हिताची आणि देशांतर्गत क्षमतेचा विचार करून व्हायला हवी; आयात शुल्काच्या धमकीने ठरवलेल्या मुदतीत ती होता कामा नये.

हाच निकष उत्पादन क्षेत्रालाही लागू होतो. जागतिक पुरवठा साखळीत एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे; केवळ इतर देशांच्या वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ बनून राहणे भारताला परवडणारे नाही. या चर्चेत स्थानिक उत्पादन प्राधान्ये सौम्य करावी लागली, योग्य मानके शिथिल करावी लागली किंवा धोरणात्मक स्वायत्तता गमवावी लागली, तर निर्यातीत मिळणारा तात्पुरता फायदा दीर्घकालीन ध्येयांना बाधक ठरेल. करारातून भारतीय कंपन्या अधिक स्पर्धात्मक बनायला हव्यात; त्यांना पाठबळ देण्यास सरकारने कचरता कामा नये.

एका चांगल्या आणि टिकाऊ करारातून अनिश्चितता कमी होऊ शकते, बाजारपेठेत प्रवेश सुधारू शकतो आणि सेवा व तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यातून गुंतवणूक आकर्षित होईल आणि उद्योगांना स्पष्ट आराखडा मिळेल. आयात शुल्क, सीमाशुल्क प्रक्रिया, मानके आणि नियामक अडथळ्यांवर दोन्ही बाजूंनी तोडगा काढता येईल. भारताने या चर्चेत कणखरपणे बाजू मांडत ठोस फायदे मिळतील तिथेच व्यावहारिक तडजोड करावी.

मात्र परस्पर सहकार्याचा अर्थ केवळ भारताने आपले अडथळे कमी करणे आणि अमेरिकेने मनात येईल तेव्हा शुल्क वाढवण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवणे असा असू नये. कोणत्या क्षेत्रात किती सवलती दिल्या आहेत, संरक्षणात्मक उपाय काय आहेत, मूळ देशाचे नियम (रूल्स ऑफ ओरिजिन), वाद निवारण यंत्रणा आणि शुल्क बदलण्याच्या अटी यांबाबत करारात पारदर्शकता हवी. सार्वजनिक हिताच्या नियमांचे संरक्षण व्हायला हवे आणि संवेदनशील क्षेत्रांना बदलाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. नेमके काय दिले जात आहे आणि काय मिळवले जात आहे, हे संसद, उद्योग आणि शेतकऱ्यांना समजले पाहिजे.

आशियातील इतर देशांच्या १८ किंवा २० टक्के शुल्काच्या तुलनेत भारताला १७ टक्के दर मिळाल्यास थोडी आघाडी मिळू शकते. तरीही भारतीय निर्यातदारांना मोठा कर भरावाच लागणार आहे. स्पर्धात्मकता केवळ एका कराच्या आकड्यावर अवलंबून नसते; मालवाहतूक व्यवस्था, उत्पादकता, दर्जा, उत्पादन क्षमता आणि धोरणात्मक स्थैर्य या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. तसेच आज मिळालेला सवलतीचा दर उद्याच्या राजकीय दबावापासून सुरक्षित राहील, असेही भारत गृहीत धरू शकत नाही.

भारताचा आशावाद योग्य असू शकतो. दोन्ही देश एका न्याय्य आणि संतुलित कराराच्या जवळ पोहोचले असतील, तर भारताने ही संधी नक्कीच साधावी. मात्र वेगाने करार होणे यालाच यश मानण्याची किंवा तात्पुरत्या दिलाशाला विजय समजण्याची चूक भारताने करू नये. या करारातून भारताचे पर्याय मर्यादित न होता व्यापार विस्तारतो का, हीच खरी कसोटी असेल.

भारताला अमेरिकेच्या बाजारपेठेची गरज आहे, तशीच अमेरिकेलाही भारतीय वस्तू, सेवा आणि एका विश्वासार्ह आर्थिक भागीदाराची गरज आहे. हाच समान पातळीवरील चर्चेचा आधार आहे. नवी दिल्लीने करारातील तपशिलांवर तडजोड करावी, मात्र आपल्या धोरणात्मक दिशेबाबत शरणागती पत्करू नये. आयात शुल्काची धमकी हे काही व्यापार धोरण असू शकत नाही. भारताची आर्थिक स्वायत्तता पणाला लावून १७ टक्के दर मिळत असेल, तर तो फायदेशीर सौदा ठरत नाही.

(लेखक राजीव नारायण हे ज्येष्ठ पत्रकार आणि संवाद तज्ज्ञ आहेत.)