नवी दिल्ली
देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेली संसदेची चार दिवसीय विशेष बैठक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व खासदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्र सरकारने शुक्रवारी केले. जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीने जगासमोर आदर्श ठेवावा, ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले.
नियम आणि संकेतांचे पालन करण्याचे आवाहन संसदेच्या चार दिवसीय विशेष बैठकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना किरेन रिजिजू म्हणाले, "संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, असे माझे सर्व खासदारांना आवाहन आहे. आम्हाला आमच्या लोकशाहीचा अभिमान आहे आणि सभागृहाचे कामकाज योग्य रीतीने चालवणे हे आपले कर्तव्य आहे." या वेळापत्रकानुसार लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी, तर राज्यसभेची बैठक २ आणि ३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
जेव्हा सरकार अधिवेशन किंवा विशेष बैठक बोलावते, तेव्हा देशासाठी अत्यंत महत्त्वाची विधेयके किंवा कामकाज समोर असते, असे रिजिजू यांनी सांगितले. "सदस्यांना सहमती किंवा असहमती दर्शवण्याचे सर्व अधिकार आणि स्वातंत्र्य आहे; मात्र सभागृहाच्या नियम आणि परंपरांच्या चौकटीत राहूनच ते मांडले गेले पाहिजे," असे त्यांनी अधोरेखित केले.
महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकाची पार्श्वभूमी महिला आरक्षणाची अंमलबजावणी परिसीमनाशी (मतदारसंघ पुनर्रचना) जोडणारी घटनादुरुस्ती सरकार पुन्हा सादर करण्याची शक्यता असतानाच 'अत्यावश्यक' कामकाजासाठी गुरुवारी ही विशेष बैठक जाहीर करण्यात आली होती. परिसीमनाद्वारे लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून कमाल ८५० पर्यंत वाढवणे आणि २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी संसद व राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करणे, हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये पुरेशा संख्याबळाअभावी हे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत संमत होऊ शकले नव्हते.