गैरसमज दूर करत संवादाचा पूल बांधणारा 'इस्लामोफोबिया अवेअरनेस मंथ'; भारतातही सलोख्याचे उपक्रम

Story by  पुणे | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

मृदगंधा दीक्षित

नोव्हेंबर महिना जगभरात "इस्लामोफोबिया अवेअरनेस मंथ" म्हणजेच इस्लामोफोबिया जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. "फोबिया म्हणजे अनावश्यक भीती." अपुरी माहिती, अफवा आणि संवादाच्या अभावातून एखाद्या धर्माबद्दल किंवा समाजाबद्दल मनात अशी अनावश्यक भीती व गैरसमज तयार होतात. इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाबद्दल असलेली हीच निराधार भीती दूर करण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये ही मोहीम राबवली जाते.

इस्लामोफोबिया हा केवळ वैयक्तिक पूर्वग्रह नसून त्याचे समाजावरही खोल परिणाम होतात. शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक जीवनात मुस्लिम व्यक्ती किंवा मुस्लिम दिसणाऱ्या नागरिकांना भेदभाव, द्वेष आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. या मोहिमेची सुरुवात १९९७ मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या एका अभ्यासातून झाली. ब्रिटनमधील "रनीमीड ट्रस्ट" या संस्थेने १९९७ मध्ये "इस्लामोफोबिया: अ चॅलेंज फॉर अस ऑल" हा अहवाल प्रसिद्ध केला. मुस्लिम समाजाविरोधातील निराधार शत्रुत्व आणि भेदभावावर या अहवालात प्रकाश टाकला गेला.

याच विचारांना पुढे नेत नोव्हेंबर २०१२ मध्ये लंडन मुस्लिम सेंटर येथे एका कार्यक्रमाद्वारे "इस्लामोफोबिया अवेअरनेस मंथ" सुरू झाला. "मुस्लिम एंगेजमेंट अँड डेव्हलपमेंट" (MEND), "मुस्लिम कौन्सिल ऑफ ब्रिटन" (MCB), "फेडरेशन ऑफ स्टुडंट इस्लामिक सोसायटीज" (FOSIS) आणि "इस्लामिक ह्युमन राइट्स कमिशन" या संस्थांनी स्थानिक गटांच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला ब्रिटनपुरती मर्यादित असलेली ही चळवळ हळूहळू युरोप, उत्तर अमेरिका आणि जगभरातील विद्यापीठे व सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचली.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, पोलीस प्रशासन, कंपन्या आणि स्थानिक मंडळे एकत्र येऊन संवाद कार्यक्रम घेतात. इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली यानेही या मोहिमेचा सदिच्छा दूत म्हणून काम पाहिले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही या विषयाची दखल घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी २०१९ मध्ये द्वेषपूर्ण भाषणे रोखण्यासाठी कृती आराखडा आणि "#NoToHate" ही मोहीम सुरू केली. तसेच १५ मार्च २०१९ रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथे मशिदींवर झालेल्या हल्ल्यात ५१ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र आमसभेने १५ मार्च २०२२ रोजी ठराव मंजूर करून दरवर्षी १५ मार्च हा दिवस "इंटरनॅशनल डे टू कॉम्बॅट इस्लामोफोबिया" म्हणून जाहीर केला.

हा महिना साजरा करण्यामागे दोन उद्दिष्टे आहेत. पहिले उद्दिष्ट म्हणजे समाजातील द्वेष आणि गैरसमजांबद्दल नागरिकांना जागे करणे. दुसरे उद्दिष्ट म्हणजे मुस्लिम समाजाने विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, कला, साहित्य, क्रीडा आणि समाजसेवेत दिलेले योगदान जगासमोर आणणे.

ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने मार्च २०२६ अखेर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, धार्मिक द्वेषातून होणाऱ्या गुन्ह्यांत १३ टक्क्यांनी वाढ झाली असून मुस्लिमविरोधी गुन्हे १५ टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे, ब्रिटनमधील १,५०० हून अधिक मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणातून कामाच्या ठिकाणची स्थिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार ६९ टक्के कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी इस्लामोफोबियाचा अनुभव घेतल्याचे सांगितले. ग्राहकांशी बोलताना ४४ टक्के, सामाजिक कार्यक्रमांत ४२ टक्के, टीम बैठकांमध्ये ३८ टक्के आणि कामाचे वाटप करताना ३७ टक्के लोकांना भेदभावाचा सामना करावा लागला. तसेच बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, इतर धर्मांच्या तुलनेत इस्लामबद्दल गैरसमज बाळगण्याचे प्रमाण तिप्पट आहे.

या पार्श्वभूमीवर २०२६ च्या मोहिमेची संकल्पना "डोन्ट लेट इट स्लाइड" (Don't Let It Slide) अशी ठेवण्यात आली आहे. रोजच्या जीवनात दिसणारा छोटासाही भेदभाव किंवा चुकीची टिप्पणी दुर्लक्षित न करता त्यावर शांतपणे आणि ठामपणे भूमिका घेणे, असा संदेश यातून दिला जात आहे. या निमित्ताने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ब्रिटिश संसदेच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये खासदार नेसिल कॅलिस्कन यांच्या पुढाकाराने आणि डेम शिओभान मॅकडोनाघ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चासत्र पार पडले . चर्चेची सुरुवात करताना बार्किंगच्या खासदार नेसिल कॅलिस्कन यांनी ब्रिटनमधील मुस्लिम लोकसंख्या ७ टक्क्यांपेक्षा कमी असतानाही धार्मिक द्वेषातून होणाऱ्या गुन्ह्यांमधील ४६ टक्के बळी मुस्लिम असल्याचे आणि दर पाच दिवसांनी एका मस्वजिदीवर हल्ला होत असल्याची नोंद ब्रिटिश मुस्लिम ट्रस्टने केल्याचे सांगितले.

सोशल मीडिया कंपन्या मुस्लिमविरोधी द्वेष पसरवणाऱ्या जवळपास ९० टक्के पोस्टवर कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचे, तसेच एनएचएसमधील जवळपास ४० टक्के मुस्लिम आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांकडूनच धार्मिक शेरेबाजीला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. या चर्चेत तन्मनजीत सिंग धेसी, अप्सना बेगम, जिम शॅनन, स्टीव्ह रीड, हॅना स्पेन्सर, सगल अब्दी-वाली, नाझ शाह, डेव्हिड पिंटो-दुश्चिन्स्की, जस अथवाल, जॉन मॅकडोनेल आणि इक्बाल मोहम्मद या खासदारांनी सहभाग घेतला. मुस्लिमविरोधी द्वेषाची व्याख्या व्यवहारात लागू करण्यासाठी विशेष प्रतिनिधीची तातडीने नियुक्ती करणे, मस्जिदींच्या सुरक्षेसाठीच्या निधीचे प्रलंबित अर्ज मार्गी लावणे, सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीला आळा घालणे आणि समाजात सर्वसमावेशक संवाद वाढवणे या मुद्द्यांवर सर्वपक्षीय खासदारांनी भर दिला.

कामाच्या ठिकाणी आणि संस्थांमध्ये सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज "नॅशनल सेंटर फॉर डायव्हर्सिटी" या संस्थेने मांडली आहे. कोणत्याही संस्थेने धर्मावर आधारित भेदभाव रोखण्यासाठी स्पष्ट नियम आखून ते कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होतानाच समजावून सांगावेत. गैरसमज दूर करण्यासाठी सांस्कृतिक संवेदनशीलता आणि विविधतेचे नियमित प्रशिक्षण द्यावे. भेदभावाच्या घटनांची तक्रार करण्यासाठी सुरक्षित आणि गोपनीय सोय असावी, तसेच तक्रारींची पारदर्शक चौकशी होऊन कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढावा. कामाच्या ठिकाणी आदरयुक्त भाषा वापरली जावी आणि एखाद्या धर्माची खिल्ली उडवणारे विनोद किंवा टिप्पण्या थांबवण्यासाठी सहकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

यासोबतच धार्मिक गरजांचा सन्मान करत नमाज किंवा प्रार्थनेसाठी स्वतंत्र जागा देणे, सणांसाठी लवचिक सुट्ट्या ठेवणे आणि उपवासाच्या काळात कामाच्या वेळेत आवश्यक बदल करणे अशा उपाययोजना उपयुक्त ठरतात. संस्थेच्या प्रमुखांनी स्वतः या उपक्रमांना उघड पाठिंबा दिल्यास भेदभाव सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सर्वांपर्यंत पोहोचतो.

भारताचा विचार केल्यास आपल्या देशाला शतकानुशतकांची "गंगा-जमुनी तहजीब" म्हणजेच संमिश्र संस्कृतीची परंपरा लाभली आहे. इथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक पिढ्यान्पिढ्या शेजारी म्हणून एकत्र राहतात. गावागावांत आणि शहरांतील वस्त्यांत लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. तरीही अलीकडच्या काळात सोशल मीडियावर पसरणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे आणि जुन्या व्हिडिओंच्या चुकीच्या वापरामुळे कधीकधी गैरसमजांचे वातावरण तयार होते. अशा वेळी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता थेट संवादातून गैरसमज दूर करण्याचे काम भारतात अनेक स्तरांवर सुरू आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये सुरू झालेला "मस्जिद दर्शन" किंवा "मस्जिद परिचय" हा उपक्रम या दिशेने टाकलेले पाऊल ठरला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, बेंगळुरू आणि केरळमधील अनेक मशिदींचे दरवाजे सर्वधर्मीय नागरिकांसाठी खुले केले जात आहेत. जमात-ए-इस्लामी हिंद आणि स्थानिक मशीद समित्यांतर्फे आयोजित या कार्यक्रमांत बिगर-मुस्लिम शेजारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि पत्रकारांना मशिदीत आमंत्रित केले जाते. तिथे नमाज कशी अदा केली जाते, मशिदीचे दैनंदिन कामकाज कसे चालते आणि इस्लामची मूळ शिकवण काय आहे, याची माहिती दिली जाते. पाहुणे मनातील शंका मोकळेपणाने विचारतात आणि एकत्र चहापानाचा आस्वाद घेतात. प्रत्यक्ष भेटीमुळे अनोळखीपणाची भिंत गळून पडते. मशीद परिचय उपक्रमासोबतच देशभरात आंतरधर्मीय संवादाचे व्यासपीठ उभारले जात आहे.

जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने अनेक राज्यांत "सद्भावना मंच" आणि "सद्भावना संसद" आयोजित केली आहे. द्वेषाचे उत्तर द्वेषाने नाही; प्रेमाने आणि संवादानेच देता येते, या विचाराने हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मगुरू व नागरिक या व्यासपीठावर एकत्र येत आहेत. जमात-ए-इस्लामी हिंदनेही वस्ती पातळीवर सद्भावना समित्या स्थापन केल्याआहेत. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील छोटे वाद चर्चेने सोडवले जातात आणि नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या काळात सर्व समाज एकत्र येऊन मदतकार्य करतो.

भारताच्या कानाकोपऱ्यातून समोर येणारी बंधुभावाची उदाहरणे या प्रयत्नांना बळ देतात. केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक गावांत हिंदू शेतकरी आणि जमीनमालकांनी मशिदी व मदरशांसाठी स्वेच्छेने जमीन दान केली आहे. जन्माष्टमी, गणेशोत्सव, ईद आणि "ईद-ए-मिलाद-उन-नबी"च्या जुलूसमध्ये दोन्ही समाजांतील नागरिक एकमेकांच्या मिरवणुकांचे स्वागत करतात आणि सरबत व मिठाई वाटतात.

भारतातील तरुण पिढीही या सकारात्मक बदलात पुढाकार घेत आहे. देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आंतरधर्मीय अभ्यास गट कार्यरत आहेत. बिहारमधील झेनिथ सोशल फाउंडेशनसारख्या संस्थांतर्फे "यूथ इन सूफिझम" हा उपक्रम चालवला जातो. या माध्यमातून तरुणांना भारताच्या सुफी आणि भक्ती परंपरेची ओळख करून दिली जाते. कबीर, गुरु नानक, बाबा फरीद, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती आणि संत तुकाराम यांनी दिलेला मानवतेचा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवला जातो. समान सांस्कृतिक वारसा समजून घेतल्याने तरुणांच्या मनातील गैरसमज दूर होतात.

डिजिटल युगात माहितीची सत्यता तपासणे तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारे संदेश रोखण्यासाठी भारतात "ऑल्ट न्यूज" आणि "बूम" यांसारख्या फॅक्ट-चेकिंग संस्था काम करत आहेत. खोटे दावे पुराव्यानिशी खोडून काढल्याने समाजात पसरणारा तणाव कमी होतो. दुसरीकडे, "आवाज-द व्हॉईस"सारख्या माध्यमांतून देशभरातील सकारात्मक कथा जगासमोर येत आहेत. विज्ञान, क्रीडा, कला, शिक्षण आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्या भारतीय मुस्लिमांचे कार्य आणि आंतरधर्मीय सहकार्याच्या घटना वाचकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

कोणत्याही समाजाबद्दलचे गैरसमज फक्त कायदा करून किंवा भाषणे देऊन संपवता येत नाहीत. त्यासाठी माणसांनी एकमेकांच्या घरी जाणे, एकत्र बसून बोलणे, कामाच्या ठिकाणी समान संधी देणे आणि एकमेकांचे सण समजून घेणे आवश्यक असते. नोव्हेंबरमधील "इस्लामोफोबिया अवेअरनेस मंथ" आपल्याला हीच साधी गोष्ट लक्षात आणून देतो. ओळख वाढल्यावर मनातील अनावश्यक भीती आपोआप संपते. परस्पर आदर, सर्वांना सोबत घेणारे नियम आणि थेट संवादातूनच समाजात विश्वास निर्माण होतो, हा संदेश जगभरातील आणि भारतातील या उपक्रमांतून दिला जात आहे.



Latest News