मुंबई
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एका विशेष केंद्रीय पथकाची स्थापना केली आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या समन्वयाने हे केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागांना भेट देईल, परिस्थितीच्या तीव्रतेचे मूल्यांकन करेल आणि मदत व पुनर्वसनासाठी शिफारसी करेल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली. राज्यातील जवळपास ८० टक्के भाग दुष्काळाच्या छायेत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मदतीची मागणी करणारा अंतरिम अहवाल केंद्राला सादर केल्यानंतर ही हालचाल सुरू झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या रबी हंगामाच्या आढावा बैठकीत कृषीमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तांद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. यामध्ये वित्त आणि कृषी विभाग तसेच नीती आयोगासह १० केंद्रीय विभागांचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत. हे पथक दुष्काळाच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन राज्य आणि केंद्र आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत मिळवण्याबाबत शिफारस करेल. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.