मिराजुल इस्लाम : गरिबीवर मात करत जिद्दीने शिकणारा डॉक्टर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मिराजुल इस्लाम
मिराजुल इस्लाम

 

तरुण नंदी

आठवीच्या वर्गात बंगाली, गणित अन् विज्ञान या मुख्य विषयांतच नापास झालेला एक मुलगा पुढे जाऊन थेट डॉक्टरेट (PhD) पदवी मिळवतो, यावर पहिल्यांदा कुणाचा विश्वासच बसणार नाही. पण ध्येय स्पष्ट अन् जिद्द पक्की असेल तर अपयशाचे डोंगर पार करून यशाचे शिखर गाठता येते, हे दक्षिण दिनाजपूरच्या एका खेडेगावातील मुलाने सिद्ध करून दाखवले आहे.

दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुशमंडी तालुक्यातील चकदाहा गावचा मिराजुल इस्लाम हाच तो तरुण! आठवीतील अपयश हा आयुष्याचा शेवट नसून ती एका नव्या संघर्षाची सुरुवात असते, हे त्याने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे.

आईच्या शब्दांची जादू
१९९५ मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात मिराजुलचा जन्म झाला. वडील लतिफूर रहमान शेतीत काबाडकष्ट करायचे, तर आई मसुरा बीबी बदके अन् कोंबड्या पाळून संसाराला हातभार लावायची. अशा परिस्थितीत मुलाच्या शिक्षणाचा अन् घराचा खर्च भागवताना माय-बापाची मोठी दमछाक व्हायची.

आई-वडिलांनी अतोनात कष्ट करूनही आठवीच्या निकालाने मिराजुलचे खच्चीकरण केले. तीन विषयांत नापास झाल्यावर तो पुरता खचून गेला होता. पण अशा कठीण प्रसंगी त्याची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. "बाळा, काहीही करून किमान दहावी तरी पास हो!" आईच्या या एका साध्या वाक्याने मिराजुलच्या मनात एक वेगळीच ज्योत पेटवली.
 

चिखलाची वाटेतून २० किलोमीटरचा प्रवास
आठवीच्या निकालानंतर मिराजुलने स्वतःशी एक पक्का निश्चय केला. जुन्या पुस्तकातून अभ्यास करणे, चिखलाने भरलेल्या रस्त्यांवरून तीन-तीन किलोमीटर अनवाणी चालणे अन् शिकवणीसाठी सायकली-बसने तब्बल २० किलोमीटरचा प्रवास करणे, हा त्याचा रोजचा दिनक्रम बनला.

अनेक अडचणी आल्या, पण त्याची जिद्द ढळली नाही. आईला दिलेले वचन पाळत त्याने मदरसा शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून दहावी अन् १२ वीच्या परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केल्या. त्यानंतर अलिया युनिव्हर्सिटीमधून पदवी अन् पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून बी.एड. केले अन् पुढे थेट पीएचडीच्या प्रवासाला सुरुवात केली.

कुटुंबातील पहिलाच पदवीधर
त्याच्या या प्रवासात यशापेक्षा अडथळेच जास्त होते. कुटुंबात आधी कोणीही उच्च शिक्षण घेतलेले नव्हते. त्यामुळे कोणत्या संधी कुठे उपलब्ध आहेत, अर्ज कसा करायचा, भविष्यासाठी कोणती संस्था योग्य ठरेल, या सर्व गोष्टी मिराजुलला स्वतःच्या अनुभवातूनच शिकाव्या लागल्या. आर्थिक चणचण तर पावलोपावली होतीच. त्याच्या संशोधनाचा मुख्य विषय "काझी नजरुल इस्लाम: गद्य लेखकाचा सामाजिक-सांस्कृतिक अभ्यास" हा होता.

काझी नजरुल यांच्या गद्याचे आकर्षण
अनेकजण काझी नजरुल इस्लाम यांना प्रामुख्याने एक कवी आणि गीतकार म्हणूनच ओळखतात. पण मिराजुलला नजरुल यांच्या गद्य साहित्याने भुरळ घातली होती. नजरुल यांच्या निबंध, कथा, कादंबऱ्या, नाटके, भाषणे अन् पत्रांमधून मांडलेले समाज, संस्कृती, समता अन् मानवतेचे विचार मिराजुलला संशोधनाकडे घेऊन गेले.

संशोधनाचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक प्रशासकीय अडचणींचा त्याला सामना करावा लागला. अखेर कुलगुरू आणि कुलसचिवांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रश्न सुटले. ४ वर्षांत पूर्ण होणाऱ्या संशोधनाला ६ वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. मध्यंतरी त्याचा शोधनिबंध एकदा नाकारलाही गेला होता.

पण सर्व संकटांवर मात करत तो बहुप्रतिक्षित दिवस उजाडला. ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्याने आपली तोंडी परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली अन् पीएचडी मिळवण्याचे स्वप्न साकार केले.
 

वंचितांसाठी बनला मार्गदर्शक
आज अध्यापन आणि संशोधनासोबतच मिराजुल विविध विद्यार्थी आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहे. आज तो गरीब अन् वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची योग्य दिशा दाखवण्याचे काम करत आहे.

मिराजुलचा हा प्रवास सांगतो की, गरिबी किंवा सुरुवातीचे अपयश माणसाचे भविष्य ठरवू शकत नाही. स्वतःवर विश्वास अन् मनात जिद्द असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करून यश मिळवता येते. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter