पणजी
देशाला २०२९ पर्यंत पूर्णपणे 'ड्रग्जमुक्त' (Drug-Free India) करण्यासाठी केंद्र सरकारने एक सर्वसमावेशक आणि कडक रोडमॅप तयार केला आहे, अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्याप्रमाणे नक्षलवाद आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी काम केले आहे, त्याच धर्तीवर विकसित भारताच्या स्वप्नासाठी देश ड्रग्समुक्त करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील पनाजी येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २०१४ पूर्वी ड्रग्जविरोधी लढा लहान युनिट्सपुरता मर्यादित होता आणि यंत्रणा केवळ लहान गुन्हेगार पकडण्यावर समाधानी असत, असे सांगत अमित शाह म्हणाले की, आता आमचे सरकार या लढ्याला राष्ट्रीय सुरक्षेची सर्वोच्च प्राथमिकता देत आहे. ड्रग्सची तस्करी, त्याचे वित्तपुरवठा आणि पुनर्वसन या संपूर्ण नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी देशात समन्वित धोरण राबवले जात आहे. तसेच MANAS हेल्पलाइनच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
या पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री शाह यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेतील विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यानंतर दहशतवादाला मोठा आळा बसला असून खोरे विकासाच्या मार्गावर आहे. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद समूळ नष्ट करण्यात यश आले आहे, असे त्यांनी नमूद केले. मार्च २०२९ पर्यंत १०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त करणे आणि विदेशात पळालेल्या फरार गुन्हेगारांना भारतात आणण्याचे लक्ष्य असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.