छत्रपती संभाजीनगरात डॉ. सय्यद अब्दुल्ला अन् टीमने वाचवले ९ नवजात बालगोपाळांचे प्राण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 31 m ago
छत्रपती संभाजीनगरमध्ये एशियन हॉस्पिटलमधील आगीत नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढणारे डॉ. सय्यद अब्दुल्ला आणि त्यांची टीम
छत्रपती संभाजीनगरमध्ये एशियन हॉस्पिटलमधील आगीत नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढणारे डॉ. सय्यद अब्दुल्ला आणि त्यांची टीम

 

फझल पठाण 

शुक्रवारी सगळीकडे श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा होत असताना, छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात पहाटेच्या अंधारात मृत्यूने अचानक सावली टाकली. निष्पाप नवजात बाळगोपाळांचा श्वास रोखू पाहणाऱ्या आगीच्या लालजर्द ज्वालांशी दोन हात करत एका मुस्लिम डॉक्टरने आणि त्यांच्या टीमने या चिमुकल्यांना नवजीवन दिले.

छत्रपती संभाजीनगरमधील जालनारोडवरील आकाशवाणी परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास हा थरार घडला. दुसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) अचानक शॉर्टसर्किट झाले आणि एसीमधून धूर निघू लागला. अवघ्या दोन मिनिटांत ठिणग्या उडाल्या आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. याच वॉर्डात ९ नवजात बालके मृत्यूच्या छायेत अडकली होती.

पहाटेचा तो भयानक थरार
मध्यरात्री अचानक एसीमधून अचानक धूर निघू लागला. त्याच एसीच्या ठीक खाली ती नवजात मुले ठेवलेली होती. त्यातले एक बाळ मुदतपूर्व जन्माला आल्याने थेट व्हेंटिलेटरवर होते. अचानक फायर अलार्म वाजला आणि अख्ख्या रुग्णालयात धावपळ सुरु झाली. तेव्हा ऑन-ड्यूटी असलेले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद अब्दुल्ला आणि त्यांच्या परिचारिकांच्या टीमने क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरु केले.

त्या भयानक क्षणाचा थरार सांगताना डॉ. सय्यद अब्दुल्ला अत्यंत भावूक होऊन म्हणाले, “परिस्थिती खूप कठीण होती. सुरुवातीला आम्हाला वाटले की किरकोळ गॅस लीक होतोय. पण जशी एसीमधून ठिणगी पडली, आम्ही लगेच वॉर्मर बाजूला करण्याचा प्रयत्न केला, कारण व्हेंटिलेटरवर असलेले बाळ ठीक खालीच होते. ते बाळ खूप सीरियस होते, प्रीटर्म होते.”

ते पुढे म्हणतात, “आम्ही वॉर्मर हलवायला गेलो पण आग खूप वेगाने पसरली. त्यानंतर सिस्टर लोकांनी लगेच बाळांना उचलून बाहेर काढायला सुरुवात केली. व्हेंटिलेटरवरील बाळाला अंबु बॅगद्वारे कृत्रिम श्वास द्यावा लागत होता. एका परिचारिकेने एका बाळाला हातात धरले आणि दुसरे व्हेंटिलेटरवरचे बाळ सांभाळले, तर मी त्याला अंबु बॅग करत होतो. अशा प्रकारे आम्ही सर्व बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढले.”

या बचावकार्याबाबत पुढे बोलताना डॉ. सय्यद म्हणतात, “ती सर्व बाळ बाहेर काढल्यानंतर मला व्हेंटिलेटरही वाचवायचे होते, कारण व्हेंटिलेटर ही खूप महागडी मशीन असते. म्हणून मी व्हेंटिलेटर ओढण्याचा प्रयत्न केला, पण ते लॉक होते. आग वाढतच चालली होती आणि त्यामुळे मी व्हेंटिलेटर सोडून दुसऱ्या बाळाला वाचवायला लागलो.”

ते पुढे म्हणतात, “आम्हाला ती बालके वाचवण्यात यश आले याचा मला आनंद वाटतो. इतक्या कमी वर्षांच्या सेवेत असा प्रसंग येईल असे कधी वाटले नव्हते. पण अल्लाचे लाख लाख आभार. अल्लाच्या फझल-ओ-करमने सर्व गोष्टी सुरक्षितपणे पार पडल्या आणि सर्व रुग्णांची प्रकृती आता उत्तम व स्थिर आहे. घाटी आणि इतर रुग्णालयांत सर्व बाळांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.”

परिचारिकेचा जिगरबाज लढा
एकीकडे एसीमधून धूर अन् ठिणग्या उडत असताना, व्हेंटिलेटरवरील गंभीर बालकाला बाहेर काढण्यासाठी व्हेंटिलेटरसहित वॉर्मर ओढण्याचा प्रयत्न झाला. मात्र वॉर्मर लॉक असल्याने तो निघाला नाही. आग वेगाने पसरत असल्याने डॉ. अब्दुल्ला यांच्यासमवेत परिचारिका कल्पना नलावडे, सुरेखा चव्हाण (मावशी), रेखा रगडे, संध्या जाधव आणि अर्चना भालेराव यांनी बाळांना हातावर उचलून सुरक्षित बाहेर काढायला सुरुवात केली.

आपल्या निष्पाप बालकांना वाचवताना जिवाची बाजी लावणाऱ्या परिचारिका रेखा रगडे यांचे शब्द ऐकून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. आपली भावना व्यक्त करताना परिचारिका रेखा रगडे म्हणाल्या, “मी नेहमीप्रमाणे ड्यूटी करत होते. कोणत्या बाळाला काय पाहिजे, काय नाही, ही सर्व कामं सुरू होती. अचानक काही सहकारी एनआयसीयूतल्या कोपऱ्याकडे धावताना दिसले. बघते तर काय? तिथं धूर निघत होता. तो बघेपर्यंत ठिणगी पडली अन् लगेच एसीला आग लागली.”

त्या पुढे म्हणतात, “ ते दृश्य पाहिल्यावर मी क्षणभर मीही घाबरले, पण वेळीच सावरून सहकाऱ्यांच्या मदतीनं लेकरांना बाहेर काढलं. मनात भीती होती. घाबरलेपणानं हातपाय गळून गेले होते. पण जिवाची बाजी लावली आणि बाळांचा जीव वाचला. मलाही तीन लेकरं आहेत. आई म्हणून मला एकच माहिती होतं, ती नऊही मुलं माझीयेत, त्यांना मला बाहेर काढायचंय.”

तातडीने मदतकार्य सुरु
आग लागलेल्या मजल्यावर एनआयसीयूमधील ९ बालकांसह जनरल वॉर्डमध्ये ३६ आणि स्पेशल रूममधील १३ असे एकूण ५८ रुग्ण दाखल होते. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पण जवान घटनास्थळी पोहोचण्याआधीच डॉक्टर आणि परिचारिकांनी फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले होते.

त्यानंतर सिडको, पदमपुरा आणि एन-९ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी विजय राठोड, लक्ष्मण कोल्हे, रमेश सोनवणे, दीपराज गंगावणे, छत्रपती केकान, विशाल निंबाळकर, चालक विजय दुबेले यांनी पाइपद्वारे दुसऱ्या मजल्यावर चढून अवघ्या काही मिनिटांत पूर्ण आग आटोक्यात आणली.

नऊही बाळ गोकुळात सुरक्षित
रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ५८ रुग्णांचे प्राण वाचले. एनआयसीयूतील नऊ बालकांना अत्यंत सुरक्षितपणे रुग्णवाहिकेतून इतर रुग्णालयांत हलवण्यात आले. त्यापैकी चार बालकांना शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी), तीन बालकांना एमजीएम हॉस्पिटल, एका बालकाला मुस्कान मुलांचा दवाखाना (आझाद चौक) आणि एकाला डे केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व बालकांची प्रकृती सध्या अतिशय स्थिर असून ते सुरक्षित आहेत.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News