श्रीनगर
दिग्दर्शक भारतबाला यांच्या 'व्हर्च्युअल भारत' (Virtual Bharat) या माहितीपट मालिकेतील तीन लघुपटांची 'आंतरराष्ट्रीय जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सव' (IFFJK) २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. येत्या ७ ते १० सप्टेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या या महोत्सवात हे माहितीपट दाखवले जाणार आहेत. 'रंग-ए-सिनेमा' ही थीम असलेल्या या महोत्सवाचे आयोजन जम्मू-काश्मीर सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभातर्फे श्रीनगर, जम्मू आणि गुलमर्ग येथे केले जात आहे.
या महोत्सवाच्या 'जेके सिलेक्ट' स्पर्धा विभागात 'नक्श-ए-दौर' आणि 'तालीम' या दोन माहितीपटांची निवड झाली आहे. 'नक्श-ए-दौर' हा लघुपट श्रीनगरचे मास्टर कारागीर गुलाम नबी दार यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी अक्रोडच्या लाकडावर काश्मीरचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा कोरण्यात आपले आयुष्य व्यतीत केले आहे. तर 'तालीम' हा माहितीपट काश्मीरची प्राचीन गालीचा विणकाम परंपरा आणि 'तालीम' या मौखिक संकेतांवर प्रकाश टाकतो. याशिवाय, बिगर-स्पर्धा विभागात नागालँडच्या पारंपारिक लाकूडकोरीव कामावर आधारित 'कुनेमेची' हा लघुपट दाखवला जाईल.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या महोत्सवाला ५० हून अधिक देशांमधून सुमारे ११०० नोंदी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ४१ देशांतील १३५ चित्रपट प्रदर्शनासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. या चित्रपटांचे मूल्यमापन करण्यासाठी पाच सदस्यांची आंतरराष्ट्रीय ज्युरी नेमण्यात आली आहे, ज्यामध्ये संतोष शिवन, रेसूल पकुट्टी, डोरोथी वेनेर, केइको बँग आणि हिमांशू शेखर खटू यांचा समावेश आहे. श्रीनगरमधील एसकेआयसीसी, आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गुलमर्ग कन्व्हेन्शन सेंटर येथे या चित्रपटांचे स्क्रीनिंग पार पडेल.