डॉ. सरफराज तांबोळी : २९ व्या वर्षी फार्म डी आणि डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टरची गोष्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
डॉ. सरफराज तांबोळी
डॉ. सरफराज तांबोळी

 

योगेश जगताप 

​कौटुंबिक संस्कारांमधून मिळालेला शिक्षणाचा वारसा, वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्राची आवड आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची धडपड ही २९ वर्षीय डॉ. सरफराज बशीर तांबोळी यांची ओळख. फार्म डीचं शिक्षण घेतलेल्या आणि धाराशिव येथील केटी पाटील फार्मसी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या सरफराज यांनी नुकतीच ​'टाइप-२' मधुमेह आणि डोळ्यांचे आजार (रेटिनोपॅथी) या विषयावर पीएचडी पूर्ण केली आहे. 

राजस्थानच्या अलवर भागातील सनराईज युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ही पीएचडी मिळवली असून त्यांचं संशोधन मधुमेही रुग्णांच्या डोळ्यांच्या आजाराचं निदान आणि उपचारासाठी दिशादर्शक ठरणार आहे. फार्म डी शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या ३० वर्षांच्या आतच पीएचडी मिळवणारे डॉ सरफराज हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. त्यांचा हा प्रवास वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दखलपात्र म्हणावा असाच आहे. 

असं होत बालपण 
​डॉ. सरफराज यांचं मूळ गाव धाराशिवमधील समतानगर. त्यांचे वडील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या आईने (रेश्मा तांबोळी) शिक्षणशास्त्र विषयात पदवी घेतली असून त्या गृहिणी आहेत. सुशिक्षित कौटुंबिक वातावरणामुळे सरफराज आणि त्यांच्या बहिणीने वैद्यकीय क्षेत्र निवडलं. त्यांची बहीण डॉ तबस्सुम या 'एमबीबीएस' आहेत. तर पत्नी डॉ. अलिशा शेख या 'बीएएमएस' असून २०२४ मध्ये एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेतून त्या वैद्यकीय अधिकारी (वर्ग-१) म्हणून निवडल्या गेल्या आहेत. त्या सध्या आंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.
 
 
धाराशिवमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या सरफराज यांनी अकरावी-बारावीचं शिक्षण लातूरमधून घेतलं. बारावीत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं त्यांनी ठरवलं. बायोलॉजी विषयाचा अभ्यास ते आवडीने करायचे. ​बारावीनंतर त्यांना एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता, मात्र नीट परीक्षेत अवघे ४ गुण कमी मिळाल्याने त्यांचा सरकारी कॉलेजमधील एमबीबीएस प्रवेश हुकला. याच गुणांवर त्यांना निमशासकीय कॉलेजला ऍडमिशन मिळत होतं, मात्र त्यांनी ते घेतलं नाही.
 
त्यावेळी ओळखीतल्या काही लोकांनी त्यांना फार्मसी करण्याचा सल्ला दिला. मात्र केवळ रोगाचं निदान करण्याच्या किंवा औषध बनवण्याच्या प्रक्रियेत न जाता वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन (Clinical Research) करायला वाव मिळावा या हेतूने सरफराज यांनी फार्म डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) करायचं ठरवलं. ६ वर्षांच्या पदवीसाठी त्यांनी २०१६ साली शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे प्रवेश घेतला. 

डोळ्यांच्या आजारावर संशोधन
फार्म डी शिक्षण घेत असताना स्वतःची शिकवण्याची आवडही सरफराज यांनी जोपासली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असल्यापासूनच संभाजीनगरमध्ये ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे बायोलॉजी विषयाचे क्लासेस घ्यायचे. २०१७ ते २०२१ या वर्षात त्यांनी शेकडो मुलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलं. २०२१ साली फार्म डीचं कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात एक वर्ष इंटर्नशिप केली. यानंतर त्यांना परदेशात पीएचडी आणि नोकरीची संधी चालून आली होती, मात्र वडिलांना आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ही संधी सोडली. 

पदवी पूर्ण झाल्यानंतर सरफराज स्वतःच्या मूळ गावी म्हणजे धाराशिव येथील 'के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी' येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सोबतच त्यांनी पीएचडी साठी नोंदणी केली. ​'टाइप-२' मधुमेह (Type 2 Diabetes Mellitus) असलेल्या रुग्णांमध्ये उद्भवणारा 'डायबेटिक रेटिनोपॅथी' (Diabetic Retinopathy) हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. ​दीर्घकाळ (८ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक) मधुमेह असलेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्यावर (रेटिना) कसा वाईट परिणाम होतो, दृष्टिहीनतेचा धोका कसा वाढतो आणि त्याचे जोखीम घटक (Risk Factors) काय असतात, यावर त्यांनी संशोधन केलं.
 
 
अहमदाबाद येथील आय इन्स्टिट्यूटमधील सुमारे २०० रुग्णांच्या सांख्यिकीचा (Sample Size) अभ्यास करून त्यांनी क्लिनिकल असेसमेंट पूर्ण केलं. त्यांच्या या संशोधनाचा फायदा भविष्यात मधुमेहामुळे होणारे अंधत्व टाळण्यासाठी आणि औषधोपचारांची अचूकता वाढवण्यासाठी होणार आहे.

आपल्या संशोधनाबद्दल बोलताना डॉ सरफराज सांगतात, "मधुमेहाचा कालावधी वाढणे आणि रक्तातील साखर योग्य नियंत्रणात नसणे यांचा Diabetic Retinopathy वाढण्याशी संबंध आहे. CRP, TNF-α आणि VEGF या biomarkers मध्ये वाढ झाल्यामुळेही रोगाची तीव्रता वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वेळेवर डोळ्यांची तपासणी, HbA1c व इतर जोखीम घटकांचे नियंत्रण आणि योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. यामुळे Diabetic Retinopathy लवकर ओळखून दृष्टी कमी होण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते."

​​भारतात अजूनही 'फार्म डी' या अभ्यासक्रमाबद्दल आणि क्लिनिकल फार्मसिस्टच्या भूमिकेबद्दल पुरेशी जागरूकता नाही. पाश्चात्य देशांमध्ये डॉक्टर फक्त रोगाचे निदान करतात आणि फार्म डी डॉक्टर हे योग्य औषधोपचार ठरवतात. भारतात २००८ पासून हा अभ्यासक्रम सुरू झाला असला तरी अनेकदा लोक त्याला केवळ 'डी.फार्म' समजतात. ​हा गैरसमज दूर करून क्लिनिकल रिसर्च आणि फार्मसी क्षेत्रातील योग्य ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, हे डॉ. सरफराज यांचं ध्येय आहे.
 
कौटुंबिक अडचणींमुळे परदेशातील संधी नाकारून त्यांनी आपल्याच मातीत राहून नवीन पिढीला घडवण्याचा आणि संशोधन क्षेत्रात योगदान देण्याचा मार्ग निवडला आहे. डॉ. सरफराज तांबोळी यांची वाटचाल ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter