कोलकाता
वयाची खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बंगालचा तरुण लेग-स्पिनर रोहित यादववर दोन वर्षांची बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नुकतीच भारताच्या १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली होती. मात्र, कागदपत्रांमधील गंभीर फसवणूक उघडकीस आल्यानंतर बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला रोहित गेल्या जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता.
श्रीलंका दौऱ्यावरील कागदपत्रांची कसून छाननी केल्यानंतर त्याच्या वयातील विसंगती समोर आली. रोहितकडे २०१०, २००९ आणि २००७ असे तीन वेगवेगळे जन्माचे दाखले असल्याचे आढळले. तसेच त्याच्या आधार कार्डच्या नोंदींमध्येही तफावत आढळून आली. २०१७ आणि २०२० मधील अपडेट्समध्ये त्याचे जन्मवर्ष २००६ दाखवण्यात आले होते, तर २०२१ मध्ये ते बदलून २००९ करण्यात आले. या सर्व अनियमिततेमुळे तो वयोमर्यादित क्रिकेट खेळण्यास पात्र ठरला नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
फक्त रोहित यादवच नव्हे, तर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) कागदपत्रे आणि वयातील फेरफारप्रकरणी २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन्ही हंगामांसाठी तब्बल ६२ खेळाडूंना नोंदणी किंवा हस्तांतरणास अयोग्य घोषित केले आहे. या यादीत भारताच्या २०२२ मधील १९ वर्षांखालील विश्वविक्रमवीर संघाचा सदस्य रवी कुमार आणि अष्टपैलू विशाल भट्टी यांचाही समावेश आहे. रवी कुमारच्या कागदपत्रांमध्ये तब्बल ४५ महिन्यांची तफावत असल्याचे आढळले आहे. सीएबीने खेळाडूंच्या कागदपत्रांची व्यापक छाननी करून ही कठोर कारवाई केली असून सर्व संबंधित राज्यांच्या संघटनांना याची माहिती देण्यात आली आहे.