श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बडगाम जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बडगाममधील दुर्गम वनक्षेत्रात शुक्रवारी ही चकमक झाली. पुलवामा जिल्ह्यातील पाखेरपोरा येथून बडगाममधील युसमार्गकडे काही संशयित दहशतवादी जात असल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती, त्यानंतर ही शोधमोहीम हाती घेण्यात आली.
श्रीनगरस्थित चिनार कोर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे बडगाममधील अशदार गल्ली भागात शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान जवानांना संशयित हालचाली दिसून आल्या. जवानांनी आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असता दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या चोख प्रतिउतरात एक दहशतवादी मारला गेला असून त्याच्याकडून एक एके-४७ (AK-47) रायफल जप्त करण्यात आली आहे. परिसरात अजूनही एक ते दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. बऱ्याच महिन्यांच्या शांततेनंतर खोऱ्यात पुन्हा एकदा मोठी चकमक उडाली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. परिसरातील सर्व रस्ते सील करण्यात आले असून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.