Vishwas Nangre Patil On DJ Ban Nagpur: बहुस्तरीय साउंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सवर कडक नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
नागपूरमध्ये डीजेवर सरसकट बंदी नाही; मात्र डेसिबल मर्यादा ओलांडल्यास कारवाईचा इशारा
नागपूरमध्ये डीजेवर सरसकट बंदी नाही; मात्र डेसिबल मर्यादा ओलांडल्यास कारवाईचा इशारा

 

नागपूर 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांकडून डीजे सिस्टीमबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, शहरात डीजे सिस्टीमवर कोणतीही सरसकट बंदी (blanket ban) घालण्यात आलेली नाही. मात्र, निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

यापूर्वी गुरुवारी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ नुसार आगामी उत्सव काळात उच्च-शक्ती आणि बदल केलेल्या साऊंड सिस्टीम, तसेच बीम आणि लेझर लाइटच्या वापरावर निर्बंध घातल्याचे जाहीर केले होते. हे आदेश ४ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान लागू राहतील. पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त नांगरे पाटील म्हणाले की, विहित आवाजाच्या मर्यादेत चालणाऱ्या साऊंड सिस्टीम वापरायला परवानगी आहे. मात्र, जास्त आवाज आणि कंप निर्माण करणाऱ्या बहुस्तरीय (multi-layered) डीजे सिस्टीमवर कडक कारवाई केली जाईल. प्लाझ्मा आणि प्रेशर मिड साऊंड सिस्टीमवरही पोलीस लक्ष ठेवणार आहेत. पारंपारिक वाद्यांच्या वापरावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि उत्सव शांततेत पाळण्याचे आवाहन

ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे हाच या निर्बंधांचा मुख्य उद्देश असून हा निर्णय कोणत्याही सण, संगीत किंवा धर्माच्या विरोधात नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विवाह सोहळे आणि मिरवणुकांमध्ये होणाऱ्या कर्णकर्कश वाद्यांच्या वापरावरही पोलीस नजर ठेवणार आहेत. ज्या नागरिक आणि मंडळे नियमांचे पालन करून विहित मर्यादेत उत्सव साजरी करतील, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगत प्रशासनाने सहकार्याचे आवाहन केले आहे.



Latest News