पुणे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कर्णकर्कश डीजे (DJ) आणि उच्च डेसिबलच्या साऊंड सिस्टीमच्या वापराविरोधात नागरिकांनी रविवारी तीव्र रोष व्यक्त केला. डीजे प्रणालीवर पूर्ण बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी बालगंधर्व रंगमंदिराजवळून पुणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत एका निषेध मोर्चानचे आयोजन करण्यात आले होते. शांतता आणि ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे सांगत आंदोलकांनी डीजेविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
'लाउडस्पीकर अपोझिशन पुणे सिटिझन्स फोरम'च्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमधील संताप आणखी वाढला आहे. सोलापूर आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये प्रशासनाने डीजेवर बंदी घातली असताना पुण्यात अशी बंदी का लागू केली जाऊ शकत नाही, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. शनिवारच्या दहीहंडीोत्सवादरम्यान पोलीस प्रशासनाला कर्णकर्कश आवाज नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.