मार्को रुबिओंचा भारत दौरा; रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी आणि 'वंतारा' प्रकल्पाला भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मार्को रुबिओंचा भारत दौरा
मार्को रुबिओंचा भारत दौरा

 

मुंबई 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आपल्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत उद्योग जगतातील प्रमुख दिग्गजांची भेट घेतली. त्यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्यावर चर्चा केली. त्यानंतर ते रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगरमधील रिफायनरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी रवाना झाले.

उद्योगपतींसोबत महत्त्वाची बैठक

मंगळवारी मुंबईत दाखल झालेल्या रुबिओ यांनी बुधवारी सकाळी प्रथम गौतम अदानी यांची भेट घेतली, त्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा केली. अदानी समूह पोर्ट, विमानतळ, ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करत आहे, तर टाटा समूह आयटी, स्टील, ऑटोमोबाईल्सपासून ते सेमीकंडक्टर आणि बॅटरी तंत्रज्ञानापर्यंत विस्तारलेला आहे. या दोन्ही औद्योगिक दिग्गजांसोबत झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका व्यावसायिक संबंधांना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

जामनगरमधील रिलायन्स प्रकल्पाची पाहणी

मुंबईतील बैठकांनंतर रुबिओ हे गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्सच्या विशाल तेल शुद्धीकरण संकुलाला (Oil-refinery complex) भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीसह अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील 'वंतारा' वन्यजीव पुनर्वसन केंद्र आणि धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्सलाही भेट देतील. ऊर्जा सुरक्षा, क्लीन एनर्जी आणि व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाबाबत रिलायन्ससोबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.