नवरात्रोत्सव २०२६: अपुरा पाऊस आणि दुष्काळामुळे वाहन खरेदीत दोन टक्क्यांची घट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 55 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

मुंबई 

यंदाच्या १० दिवसांच्या नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात एकूण १ लाख १२ हजार ८१४ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ७७ हजारांहून अधिक दुचाकी आणि २५ हजारांहून अधिक कारचा समावेश आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीत सुमारे दोन टक्क्यांची घट नोंदवली गेल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वाहन नोंदणी

परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ६० प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान एकूण १ लाख १२ हजार ८१४ वाहनांची नोंदणी झाली. यात ७७ हजार ४४९ खासगी दुचाकी आणि २५ हजार ५३६ खासगी कारचा समावेश आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन वाहने खरेदी करण्याच्या परंपरेमुळे वाहन विक्रेत्यांकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या नोंदणीमध्ये पुणे आरटीओने १२ हजार ७५२ वाहनांसह संपूर्ण राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. पुण्याच्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये ८ हजार ८८७, ठाण्यात ४ हजार ४७४ आणि नाशिकमध्ये ४ हजार २४ वाहन नोंदणी झाली आहे. मुंबईतील चारही आरटीओमध्ये मिळून १३ हजार १६० वाहनांची नोंदणी नोंदवली गेली.

खरेदीतील घटीचे कारण काय?

गतवर्षी नवरात्रीत महाराष्ट्रात १ लाख ५ हजार १२५ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा या आकडेवारीत दोन टक्क्यांची घट झाली आहे. ग्रामीण भागातील अपुरा पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी व नागरिकांनी वाहन खरेदी तूर्तास टाळली असण्याची शक्यता आहे. तसेच, जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम शहरी भागातील वाहन खरेदीवर झाला असावा, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.