गाझाच्या ढिगाऱ्यात फुलली 'प्रेमाची' बाग! ५० जोडप्यांचा अनोखा सामूहिक विवाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गाझा पट्टीत गेल्या दोन वर्षांपासून मृत्यू आणि विनाशाचे तांडव सुरू आहे. पण याच उद्ध्वस्त शहराच्या ढिगाऱ्यात मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) एक आशेचा किरण दिसला. दक्षिण गाझा येथील खान युनिसमध्ये ५० हून अधिक पॅलेस्टिनी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. युद्ध आणि संघर्षाने ग्रासलेल्या या भूमीत हा सोहळा म्हणजे जीवनाच्या जिद्दीचे प्रतीक ठरला.

पॅलेस्टिनी संस्कृतीत लग्नाला मोठे महत्त्व आहे. पण युद्धाच्या काळात हे सोहळे दुर्मिळ झाले होते. आता एका नाजूक युद्धविरामानंतर काही जोडप्यांनी ही परंपरा पुन्हा सुरू करण्याचे धाडस दाखवले आहे.

ढिगाऱ्यातून निघाली वरात

या सोहळ्याचे दृश्य हृदय हेलावणारे होते. उद्ध्वस्त झालेल्या इमारती आणि मातीचे ढिगारे यांच्या साक्षीने ही जोडपी हातात हात घालून चालत होती. सर्वजण एकाच प्रकारच्या पोषाखात होते. दक्षिण गाझामधील कोसळलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर हा आनंद साजरा केला जात होता.

"युद्ध संपेल हीच आशा"

लग्नासाठी तयार होत असलेल्या हिकमत ल्वा या वराने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "जे काही घडले आहे, ते सर्व असूनही आम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करू. देवाच्या इच्छेने (इन्शाअल्लाह), हा युद्धाचा शेवट असेल."

खान युनिसमध्ये जमावाने पॅलेस्टिनी झेंडे फडकवून आनंद व्यक्त केला. पण या उत्साहावर संकटाचे सावट होतेच. गाझाचे २० लाख रहिवासी विस्थापित झाले आहेत. त्यात हिकमत आणि त्याची वधू इमान यांचाही समावेश आहे. शहरांचे पूर्ण भाग जमीनदोस्त झाले आहेत आणि मदतीचा तुटवडा आहे.

हिकमत म्हणाला, "आम्हालाही इतर जगासारखे आनंदी राहायचे आहे. माझे स्वप्न होते की माझे स्वतःचे घर असावे, नोकरी असावी. पण आज, राहण्यासाठी एक तंबू शोधणे हेच माझे स्वप्न बनले आहे."

अश्रूंना आवरत नवी सुरुवात

पांढऱ्या, लाल आणि हिरव्या रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेली वधू इमान (Eman) हिने सांगितले की, अनेक वर्षांच्या वेदनेनंतर या लग्नाने तिला थोडा दिलासा दिला आहे. पण तिच्या आनंदाला दुःखाची किनार होती. या युद्धात तिने तिचे आई, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य गमावले आहेत.

डोळ्यांतून अश्रू वाहत असताना ती म्हणाली, "इतक्या दुःखानंतर आनंद अनुभवणे कठीण आहे. पण देवाच्या इच्छेने, आम्ही विटा रचून पुन्हा (आमचे जग) उभारू."

युएईची मदत

या सोहळ्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) समर्थित 'अल फारेस अल शहिम' (Al Fares Al Shahim) या मानवतावादी मदत संस्थेने अर्थसहाय्य केले होते. केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही, तर या संस्थेने जोडप्यांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी थोडी आर्थिक मदत आणि संसारोपयोगी साहित्यही दिले.

जेव्हा आजूबाजूला केवळ विध्वंस दिसत होता, तेव्हा या ५० जोडप्यांनी एकच संदेश दिला - इमारती पडल्या तरी माणसांची जगण्याची उमेद अजूनही कायम आहे.