एप्रिल महिना ठरला सर्वाधिक उष्ण महिना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशभर जनतेला उन्हाचा चटका बसत असून उकाड्याने जनता हैराण झाली आहे. उन्हाचा तडाखा नेहमीपेक्षा अधिक जाणवत असल्याच्या लोकांच्या अनुभवावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाचा एप्रिल महिना हा आतापर्यंतचा सर्वांत उष्ण एप्रिल ठरल्याचे युरोपीय समुदायाच्या कोपर्निकस पर्यावरण बदल सेवा (सी-३ एस) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच, सलग अकराव्या महिन्यात आतापर्यंतचे विक्रमी तापमान नोंदले गेले आहे.

आता कमजोर होत असलेला एल निनो आणि मानवी कारणांमुळे होत असलेले हवामान बदल यांचा एकत्रित परिणाम म्हणून जगभरात तापमान वाढल्याचे ‘सी-३ एस’ने म्हटले आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात जगाचे सरासरी तापमान १५.०३ अंश सेल्सिअस इतके होते. औद्योगिकीकरणपूर्व (१८५०-१९००) कालखंडातील एप्रिल महिन्यांच्या सरासरी तापमानापेक्षा हे तापमान १.५८ अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. हवामानातील अतितीव्र बदल टाळण्यासाठी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा शास्त्रज्ञ आग्रह करत असता बहुतांश देशांकडून याबाबत फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याची टीका ‘सी-३ एस’ने केली आहे.

तापमानाची नोंद ठेवण्याच्या १७४ वर्षांच्या इतिहासात २०२३ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. एल निनोचा प्रभाव पाहता २०२४ मध्ये हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच एल निनो प्रवाहाचा प्रभाव सुरु झाला. त्यामुळे महासागरांच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ झाली. हे तापमान आता पूर्वपदावर येत असले तरी निर्माण झालेली अतिरिक्त ऊर्जा ही हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे समुद्रात आणि वातावरणात अडकून पडली आहे. त्यामुळेच जागतिक तापमानवाढीचे विक्रम होत आहेत.

- कार्लो ब्युन्टेम्पो, संचालक, सी-३ एस

केरळमध्ये ‘येलो अलर्ट’
तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुअनंतपुरम, अलापुझा आणि कोझिकोड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नऊ मेपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आंध्रात वादळाचा इशारा
अमरावती : आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आठ मे ते १२ मे असे पाच दिवस वादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वादळाबरोबरच विजांचा कडकडाटासह जोरदार वारे वाहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

आशियातील वाढते तापमान
१९१० ते २००० काळाच्या तुलनेत जमिनीवरील सरासरी मासिक तापमानातील बदल