इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 2 Months ago
दिवंगत इब्राहिम रईसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिवंगत इब्राहिम रईसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

एका हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. रायसी हे ६३ वर्षांचे होते. त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचा देखील मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही तासांपासून रईसी यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता होते. त्याचा शोध सुरु होता.

बचावपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आले होते. त्यानंतर इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या इतरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्या बचाव कार्यात अडथळा येत होता. अखेर त्याचे हेलिकॉप्टर सापडले, पण या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान मोदींनी केले दु:ख व्यक्त 
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, "इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आणि धक्का बसला. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती शोक व्यक्त करतो. यामध्ये भारत इराणच्या पाठीशी उभा आहे."
 
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही केले दु:ख व्यक्त 
 
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही इराणी नेत्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण करून दिली. X वर पोस्ट करत त्यांनी लिहिले, "इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री एच. अमीर-अब्दोल्लाहियान यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याचे ऐकून खूप धक्का बसला. अलीकडेच जानेवारी 2024 मध्ये त्यांच्यासोबत झालेल्या माझ्या अनेक भेटी आठवल्या. त्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो. या शोकाच्या काळात आम्ही इराणचे लोकांसोबत आहे." 

कुठे आणि कसा झाला अपघात 
इराणचे अध्यक्ष अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून परत निघाले होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चित स्थळी पोहोचले. पण, तिसरे विमान पोहचले नाही. हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर बचावपथक रवाना करण्यात आले होते.

रविवारी रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. त्यानंतर गेल्या १० तासापासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. बचावपथक रवाना करण्यात आले होते, पण जाड धुक्यांमुळे मदत कार्यात अडथळा येत होता. ड्रोन्सची देखील मदत घेण्यात आली होती. डोंगर भागात हा अपघात झाला होता. याठिकाणी रात्रीच्या ठिकाणी तापमान खूप कमी असते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत बचाव मोहीम राबवण्यात आली होती.

युरोपीयन यूनियनने देखील बचावकार्यात सहभाग घेतला होता. रॅपिड मॅपिंग सर्व्हिस सक्रिय करण्यात आली होती. यामुळे तंतोतत स्थितीची माहिती मिळत असते. याशिवाय, इराणने तुर्कीला मदत मागितली होती. नाईट व्हिजन आणि रेस्क्यू हेलिकॉप्टर तुर्कीकडून पुरवण्यात आले होते. याशिवाय सौदी अरेबियाने देखील मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, इराणचे अध्यक्ष आता या जगात नसल्याचं समोर येत आहे.

कोण होते  इब्राहिम रईसी
इब्राहिम रईसी यांचा जन्म १४ डिसेंबर १९६० मध्ये महशदच्या नोघन जिल्ह्यातील एका मौलवी परिवारात झाला होता. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. इब्राहिम रायसी यांनी आपले प्राथमिक शिक्षण 'जावाहियेह स्कूल'मधून पूर्ण केले. आणि त्यानंतर हौजामध्ये (इस्लामी मदरसा) पुढचे शिक्षण घेतले. १९७५ मध्ये क्यूम सेमिनरीतून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी रायसी "अयातुल्लाह बोरोजेडी स्कूल"मध्ये दाखल झाले. रईसी यांनी मोताहारी विद्यापीठातून खाजगी कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केलाचा दावा आहे. मात्र त्यांचा हा दावा विवादित आहे.

कारकिर्दीची सुरुवात
इब्राहिम रईसी यांची १९८५ मध्ये इराणची राजधानी तेहरानचे उप वकील म्हणून निवड करण्यात आली. पुढे १९८८मध्ये त्यांना वकील म्हणून बढती मिळाली.  १९८८ च्या सुरुवातीस, रईसी यांची इराण क्रांतीचे जनक आणि इराणचे संस्थापक रुहोल्लाह खोमेनी यांच्याशी भेट झाली. या भेटीत रईसी यांनी खोमेनी यांना प्रभावित केले. त्यानंतर रईसी यांना लॉरेस्तान, सेमनन आणि केर्मनशाह सारख्या काही प्रांतांमध्ये कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र संस्थेचे प्रमुख केले.

महत्त्वाची पदे
रुहोल्लाह खोमेनी यांच्या मृत्यू नंतर आणि आयातुल्हा खोमेनी यांची इराणचा सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्यानंतर रईसी यांना इराणच्या सरकारकडून मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या.  इब्राहिम रईसी यांनी २००४ ते २०१४ या काळात ईराणचे पहिले उपमुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. २०१४मध्ये ते इराणचे महाधिवक्ता झाले. २०१६पर्यंत ते या पदावर होते. इब्राहिम रईसी यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषद,मॉनेटरी अँड क्रेडिट कौन्सिल आणि भ्रष्टाचारविरोधी मुख्यालयामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अध्यक्षपदाची पहिल्या निवडणुकीत पराभव
देशात अनेक वर्षे महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या इब्राहिम रईसी यांनी २०१७ मध्ये पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इस्लामिक रिव्होल्यूशनरी फोर्सेस पक्षाकडून पहिल्यांदा इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. पण तरीही यामध्ये त्यांना पराभवास समोरे जावे लागले.

पण पुढे, २०२१ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांनी अखेर विजय मिळवला. पण या निवडणुकीत रायसी यांनी गैरप्रकार केल्या आरोप झाले होते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter