समीर मणियार
पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या कोणत्याही धर्मातील मुली अथवा महिलांनी विचारलेले प्रश्न धर्म मार्तडांना सहन होत नाहीत. देवाधर्माच्या नावावर सार्वत्रिक महिलांचे सर्वच धर्मात कमी अधिक शोषण होते. धर्माची कालसुंसगत विज्ञाननिष्ठ आणि विवेकाच्या आधारावर चिकीत्सा करण्याचा जागर भारतीयसंविधानास अभिप्रेत असलेल्या लोकशाही मूल्यांच्या आधारे करणारी मराठवाड्यातील लातूर शहरात रणरागिणी रुक्साना हिचा जीवनातील संघर्ष वाखाणण्याजोगा आहे.
रुक्सानाचा प्रत्येकशब्द हा बुलेट सरखा पोथीनिष्ठ झापडबंद समाजाला धक्का अर्थात शॉक ट्ीटमेंट देणारा आहे. मुस्लिम समाजातील या बंडखोरी विदुषीचे कार्य आणि विचार हे नव्या पिढीला मार्गदर्शक आणि जुनाट बुरसटलेल्या विचारांच्या लोकांच्या प्रवृतीस झणझणीत अंजन टाकणारे आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातीमा शेख यांच्यासारखी कार्य करण्याची धमक रुक्साना मुल्ला यांच्या व्यक्तिमत्वात जाणवते.
एका कार्यक्रमात या विदुषीने मांडलेला जीवनसंघर्ष अंगावर काटा आणणारा होता. रुक्साना मुल्ला हिने आपले मनोगत मांडताना जे शब्द वाणी वापरली ती भल्या भल्या लोकांच्या मनात घर करणारी होती. कर्मठ व सनातनी मुस्लिम समाजात जन्म घेतलेल्या रुक्सानाला शिक्षण घेण्यासाठी करावा लागणारा संघर्ष सोपा नव्हता. पण तिने जिद्द आणि चिकाटीने शिक्षणाची वाट धरुन स्वतच्या कुटुंबाला सावरताना एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मूळ गाव असलेले रुक्साना ही आपल्या आई वडिलांसोबत रोजी रोटी कमावणे यासाठी लातूर शहरात दाखल झाली. घरची गरिबी आणि अठराविश्वे दारिद्य असलेल्या रुक्सानाला शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला.
या संघर्षाविषयी बोलताना ती सांगते, “शिक्षण घेण्यासाठी मला जन्मदात्या आईबाबांशी भांडावे लागले. त्या परिस्थितीचा मला अवमान करायचा नाही. संघर्षाशिवाय जगण्यात मजा नाही. आज मी आई बाबांना मिस करते. संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. त्या संघर्षाला मी सलाम करते. ती माझी शिदोरी आहे.”
ती पुढे सांगते,“कामाशी प्रामाणिक असलो तरी कुठेही अडचण येत नाही अशी माझी धारणा आहे. राज्यात मी पैशापेक्षा सामाजिक चळवळीत माणसं कमावली आहेत. हीच माझी संपत्ती आहे. आपले हात हे भीक मागण्यासाठी नव्हे तर चांगला समाज निर्माण करण्यासाठी असतात. जन्नत दोजख अर्थात स्वर्ग नरक या बेगडी संकल्पनेत जाण्यापेक्षा सदविवेक बुद्धी, विज्ञानिष्ठ विचार यासाठी आपला विवेक का वापरु नये? माणूस म्हणून माणसांसाठी आपण मानवतावादी भूमिकेतून विचार करावा.”
गरीबीमुळे फाटक्या चंद्रमोळीत झोपडीत राहणाऱ्या जन्मदात्यांनी दिलेले स्वातंत्र मोलाचे असल्यामुळे येथपर्यंतचा सामाजिक प्रवास करता आला असे सांगणाऱ्या रुक्सानाच्या या निवेदनामुळे उपस्थित विचारी मनांची मने हेलावली.
“समाजवादी विचारांच्या गोतावळ्यात राष्ट् सेवा दल, छात्रभारती, दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या समर्थ नेतृत्वाखालील विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ पुरस्कार करणारी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही मला जीवनात महत्वाची वाटली. रक्ताच्या नात्यापेक्षा सामाजिक चळवळीतील माझा परिवार मोठा आहे.”, असे ती कृतज्ञतापूर्वक सांगते.
“दैववादापेक्षा प्रयत्नवादाला मी जास्त महत्व दिले. आई वडिलांसाठी खूप काही प्रयत्न केले पण त्यास यश आले नाही. बाबांना पक्षघाताचा विकार झाला. ज्वारीची भाकर आणि तुरीचे वरण याविषयी ग्रामीण भागात आरोग्यविषयक अंधश्रद्धा आहे. आईला कर्करोगाची लागण झाली. विज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे आपण साक्षर झालो पण आपल्यात वैज्ञानिक दृष्टीकोण आला नाही. प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकता आले.” असे रुक्साना सांगत होती.
सध्या जे काही सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकारकडून चालू आहे. ते पाहता आम लोकांना अडाणी ठेवण्याचा उद्योग दिसतो. गोरगरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थी यांना शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळा बंद पाडण्याचा उद्योग सुरु आहे. खाजगीकरणाच्या रेट्यात गरीबांच्या शिक्षणाची संधी कायमची नाकारली जात आहे. पण विचारी आणि मध्यमवर्गीय लोकांना हा प्रश्न पडत नाही. लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली महिलांना दीड हजार रुपयांची रक्कम देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत नाही. महिलांच्या सुरक्षेचे काय हा प्रश्न आहे. शिवाय अडाणी आळशी बनवून भीक मागणे अथवा याचकाच्या जमाती वाढविण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न होत असून, यामुळे भविष्यात अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतील असे भाकित रुक्साना मुल्ला व्यक्त करतात.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर शहरात मी मुस्लिम समाजाची असल्यामुळे मला घर, सदनिका अथवा घर बांधण्यासाठी जागा मिळत नाही असे भीषण सामाजिक वास्तव रुक्साना मुल्ला यांनी यावेळी विशद केले. मी मराठी उत्तम बोलते. भारतीय संविधान जागृती आणि अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीत काम करते पण केवळ मुस्लिम असल्यामुळे माझ्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी मला हक्काचा व मालकीचा निवारा मिळत नाही. हे वास्तव आहे. याचा अर्थ धर्मांधता सर्वत्र वाढत आहे, अशी खंत रुक्साना मुल्ला यांनी बोलून दाखविली.
गरीबी आणि कट्टरतावादी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या रुक्सानाने शिक्षणासाठी विरोध असतानाही तो विरोध झुगारुन जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बारावी, डी. एड,. बी. ए. इंग्रजी विषय घेऊन एम. ए आणि कायद्याचा अभ्यासक्रमासाठी एल. एल. बी शिक्षण पूर्ण केले.
उत्कृष्ट आवाज, सांस्कृतिक कलागुण, अस्सलिखित मराठी भाषा संवाद याआधारे आपल्या व्यक्तीमत्वास आकार दिला. लातूर जिल्हा साक्षरता अभियान, भारत ज्ञान विज्ञान जत्था अभियानात कृतीशील सहभाग, कॉपीविरोधी अभियान, राष्ट्ीय एकात्मता शिबिरात सहभाग, डॉ. बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिरात त्यांच्या कृतीशील सहभाग होता.
भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात सहभाग, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या आंदोलनात पदरमोड करुन सक्रिय सहभाग, जिल्हा परिषदेत शिक्षक या नात्याने काम करताना सरकारच्या आदेशावरुन विज्ञान बोध वाहिनी या उपक्रमात दीडशेहून अधिक कॉलेज शाळांमधून दीड लाख विद्यार्थ्यापर्यंत मनोरंजन, खेळातून वैज्ञानिक जाणीवा रुजविण्याचे मोठे काम केले आहे.
मुस्लिम धर्ममार्तंडांच्या धमक्यांना न जुमानता सामाजिक प्रबोधनाचे काम रुक्साना मुल्ला यांनी सुरु ठेवले आहे. एका बाजूला शिक्षण, दुसरीकडे शिक्षक पेशातील नोकरी अशा प्रतिकूल परिस्थितीत देव धर्म, अल्लाह, स्वर्ग नरक अशा कालबाह्य रुढी नाकारुन जुनाट प्रथा परंपरांची चिकित्सा करण्याचे काम त्या करीत आहेत. मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा यांच्याविरोधात परखड विवेकवादी विज्ञाननिष्ठ विचारांची मांडणी त्या करत असतात. अशा विदुषीची भारतीय समाजाला आवश्यकता आहे. रुक्सानाच्या संघर्षशील संघर्षाच्या वाटचालीस त्रिवार सलाम..
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -