यूकेवरून परतलेल्या आसिफने महिला दिनानिमित्त कुटुंबातील स्त्रियांना दिले खास रिटर्न गिफ्ट

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
आसिफ मुलानी यांच्या घरातील महिला दिनानिमित्तचा उत्साह
आसिफ मुलानी यांच्या घरातील महिला दिनानिमित्तचा उत्साह

 

भक्ती चाळक

साधारणपणे महिला दिन आला की आपण काय करतो? घरातल्या महिलांना शुभेच्छा देतो, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवतो किंवा सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकतो. पण पुण्यातील आसिफ मुलानी यांनी यंदा काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रियांचा सन्मान हा मेसेजपुरता मर्यादित न ठेवता, तो कृतीतून कसा उतरवता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

आगळावेगळा महिला दिन 

आसिफ गेल्या ३-४ वर्षांपासून कामानिमित्त यूकेमध्ये होते. नुकतेच ते भारतात परतले. दीर्घकाळानंतर घरी आल्यावर यंदाच्या महिला दिनी घरातील स्त्रियांसाठी काहीतरी खास करायचे त्यांनी ठरवले. आपल्या संपूर्ण कुटुंबात महिलांची संख्या जास्त आहे आणि या सर्वांसाठी काहीतरी विस्मरणीय करण्याचे त्यांनी ठरवले. या संकल्पनेबद्दल आसिफ सांगतात, "नेहमी आपण शुभेच्छा देतोच, पण यंदा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल असं काहीतरी करायचं होतं. त्या दररोज घर आणि किचन सांभाळतात, मग त्यांना त्यातून थोडी विश्रांती आणि आनंद कसा देता येईल, याचा मी विचार सुरू केला."

शब्द सुमनांतून भावना व्यक्त 

महिलांना फुले खूप आवडतात आणि फुलांच्या माध्यमातून आपण आपले प्रेम सहज व्यक्त करू शकतो. हे ओळखून आसिफ यांनी एक छान कल्पना राबवली. त्यांनी कुटुंबातील १० महिलांसाठी खास १० संदेश लिहिले. प्रत्येक स्त्रीने त्यांच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकला आणि त्यांच्याकडून काय प्रेरणा मिळते, हे त्यांनी त्या कागदावर मांडले. चॉकलेट्स आणि फुलांच्या बुकेवर या स्टिकी नोट्स लावून त्यांनी हे सरप्राईज तयार केले.

भावूक करणारा क्षण 

आसिफ यांनी दिलेल्या या सरप्राईजमुळे घरातील वातावरण एकदमच बदलून गेले. घरातील तरुण बहिणींना आपल्या भावाकडून मिळालेली ही भेट पाहून खूप आनंद झाला. पण घरातील ज्येष्ठ महिला मात्र खूप भावूक झाल्या. आपल्या मुलाने किंवा पुतण्याने अशा प्रकारे स्वतःहून फुले आणून कौतुक करावे, हा त्यांच्यासाठी एक सुखद धक्का होता. याबद्दल बोलताना आसिफ म्हणतात, "त्यांना कौतुक केल्याचं खूप भरून आलं होतं. त्यांना तो आपला दिवस खऱ्या अर्थाने सेलिब्रेट केल्यासारखं वाटलं. त्यांनी दिवसातून ४-५ वेळा मला किती छान वाटतंय हे आवर्जून सांगितलं."

भेटवस्तू देऊन आसिफ थांबले नाहीत. घरातील स्त्रियांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून त्यांनी त्या दिवशी सर्वांना स्वयंपाकातून सुट्टी दिली. त्या संपूर्ण दिवसाचे संध्याकाळचे खास जेवण असिफ यांनी स्वतः तयार केले. त्यांनी बनवलेले जेवण सर्वांनी आवडीने खाल्ले आणि एक वेगळा आनंद अनुभवला.

नात्यात व्यक्त होणे गरजेचे

हा उपक्रम राबवण्यामागे आसिफ यांचा एक व्यापक दृष्टिकोन आहे. आपल्या आयुष्यातील महिलांच्या कामाचे आणि अस्तित्वाचे कौतुक करण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते, असे त्यांचे म्हणणे आहे. याविषयी ते म्हणतात, "महिला दिनाचं निमित्त होतं म्हणून मी एवढं सगळं केलं. पण आपण कोणत्याही निमित्ताशिवाय आपल्या आयुष्यातील महिलांचे वेगवेगळ्या पद्धतीनं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांच्या सौंदर्याबद्दल सगळेच बोलतात, पण त्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व, त्यांनी आपल्याला कसं प्रेरित केलं हे त्यांना सांगणं गरजेचं असतं. यातून नातं अधिक घट्ट कहोतं."

ते पुढे म्हणतात की, "पुरुष सहसा कोणत्याही नात्यात व्यक्त होत नसतात, परंतु त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. यातून महिलांना पुढे जाण्यासाठी नवी उर्जा मिळते आणि त्यांच्या कार्याचा देखील गौरव होतो. महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगेन की, घरातील प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वाचा,संघर्षाचा आणि स्वप्नांचा आपण वेळोवेळी सन्मान करायला हवा, यातून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल."

धर्माने दिलेल्या शिकवणी विषयी ते म्हणतात, "मी जेव्हा धर्माचा अभ्यास केला तेव्हा मला जाणवले की, धर्म सुद्धा महिलांच्या प्रतिष्ठेची आणि समानतेची शिकवण देतो. परंतु आपल्या पुरुषप्रधान समाजात अजाणतेपणी या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे महिलांच्या कार्याचा सन्मान होत नाही. आणि मला याच गोष्टीला छेद द्यायचा होता."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter