नक्षलग्रस्त दंतेवाड्यात सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक दौरा; मुख्यमंत्री साय यांनी मानले आभार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी क्रिकेट जगतातील दिग्गज सचिन तेंडुलकरच्या बस्तर दौऱ्याचे स्वागत केले आहे. एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात सचिनचा दौरा राज्यासाठी अभिमानास्पद असून मुले आणि तरुणांसाठी तो प्रेरणेचा मोठा स्त्रोत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भारतरत्न सन्मानित मुंबईच्या या क्रिकेटपटूने बुधवारी दंतेवाडा जिल्ह्याला दुर्मिळ भेट दिली. मुख्यमंत्री साय यांनी छत्तीसगडला "नक्षलमुक्त" घोषित केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनी तळागाळातील क्रीडा उपक्रमाचा भाग म्हणून हा दौरा झाला. दंतेवाड्यातील छिंदनार गावाला दिलेली सचिनची भेट संपूर्ण बस्तरमधील परिवर्तनाचे प्रतीक आहे. हा भाग आता भीतीकडून विकास, संधी आणि आत्मविश्वासाकडे सरकत असल्याचे साय यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले.

असे उपक्रम तरुणांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देतील. सचिन तेंडुलकरचा मुलांशी झालेला संवाद खेळांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, सांघिक भावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन आणि माणदेशी फाऊंडेशनतर्फे आयोजित 'मैदान कप मोहीम' हे विशेषतः आदिवासी भागातील क्रीडा पायाभूत सुविधांसाठी एक दूरदर्शी पाऊल असून यामुळे सर्वांगीण विकासाला मदत होईल, असेही ते म्हणाले. राज्य सरकार क्रीडा आणि युवा विकासाला सातत्याने प्राधान्य देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आपल्या दौऱ्यात तेंडुलकरने दंतेवाडा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सहभाग घेतला. माओवाद्यांचे केंद्र असलेल्या या भागाचे रूपांतर एका भरभराटीच्या क्रीडा केंद्रात करणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा या तळागाळातील क्रीडा उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रसंगी सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या तेंडुलकरने यशासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असल्याचे सांगितले. ध्येय गाठण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असे त्याने ठामपणे मांडले.

भारताच्या या माजी कर्णधाराने मुलांना मित्र निवडताना काळजी घेण्याचा आणि एक चांगला माणूस बनण्याचा सल्ला दिला. दंतेवाडा जिल्ह्यातील छिंदनार गावातील स्वामी आत्मानंद हिंदी माध्यम उच्च माध्यमिक विद्यालयातील बहुउद्देशीय क्रीडा मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी तो बोलत होता. या भागाची नक्षलग्रस्त प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सचिन तेंडुलकर फाऊंडेशन आणि माणदेशी फाऊंडेशनच्या मदतीने मैदान कप उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत विकसित केलेल्या २५ मैदानांपैकी हे एक मैदान आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाचे लक्ष्य दक्षिण छत्तीसगडमधील सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागातील दंतेवाडा येथे ५० क्रीडांगणे उभारण्याचे आहे.