खान सरांची होणार पोलीस चौकशी; कोचिंग सेंटरमधील तोडफोडीनंतर गुन्हा दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
खान सर
खान सर

 

बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक फैसल खान, जे देशभरात खान सर म्हणून ओळखले जातात, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटण्यातील त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या तोडफोड आणि गोंधळ प्रकरणात पोलिसांनी खान सरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पाटणाचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी या माहितीला दुजोरा दिला असून याप्रकरणी लवकरच त्यांची चौकशी केली जाईल, असे सांगितले.

मंगळवारी रात्री १५ ते २० जणांच्या एका गटाने पाटण्यातील खान ग्लोबल स्टडीज इन्स्टिट्यूटची तोडफोड केली होती आणि आवारात दगडफेक केली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत गुरुवारी कोचिंग सेंटरच्या दोन रक्षकांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हे रक्षक तोडफोडीदरम्यान हवेत गोळीबार करताना दिसत होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

प्रतिस्पर्धी संस्थांवर आरोप-प्रत्यारोप
या तोडफोडीच्या घटनेनंतर खान सर यांनी एका प्रतिस्पर्धी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या लोकांवर गोळीबार आणि तोडफोड केल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर त्यांनी सावध भूमिका घेत पोलीस तपासानंतरच गोळीबार झाला होता की नाही हे स्पष्ट होईल, असे सांगितले. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सदस्यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी खान सर यांनी स्वतःच प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा इतर कारणाने हा संपूर्ण प्रकार घडवून आणल्याचा उलट आरोप केला आहे.

पाटणा पोलिसांनी अद्याप खान सरांवर कोणते नेमके गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याचा खुलासा केलेला नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून तोडफोडीमागील खरे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.