झकिया सोमण : कुराण आणि संविधानाच्या प्रकाशात पेटवली हक्कांची मशाल

Story by  पुणे | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
झकिया सोमण
झकिया सोमण

 

मृदगंधा दीक्षित

एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काहीतरी वादळ येतं आणि ती त्यात उद्ध्वस्त होते, हे चित्र आपल्याला नवीन नाही. पण त्या वादळालाच आपली ताकद बनवून, हजारो स्त्रियांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणं सोपं नाही. हे करून दाखवणारं धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणजे झकिया सोमण. 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन' (BMMA) या संस्थेच्या सहसंस्थापक म्हणून काम करताना देशातील मुस्लिम महिलांच्या हक्कांची नवी व्याख्या तयार करण्याचं काम त्या करत आहेत.

उच्चशिक्षित कुटुंब आणि छळाचा सामना
झकिया सोमण या मुळच्या गुजरातच्या. त्यांचा जन्म एका अत्यंत उच्चशिक्षित आणि प्रगत विचारांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर आई उच्च माध्यमिक शाळेत शिक्षिका होती. विशेष म्हणजे, त्यांच्या नानी त्याकाळी त्यांच्या तालुक्यात मॅट्रिक होणाऱ्या पहिल्या महिला होत्या आणि त्याही एका शाळेत मुख्याध्यापिका होत्या.

अशा पुढारलेल्या वातावरणात वाढलेल्या झकिया यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रेमविवाह केला. पतीही उच्चशिक्षित होते. पण शिक्षण म्हणजे सुसंस्कृतपणा नव्हे, याचा प्रत्यय त्यांना लग्नानंतर आला. दरम्यान एका बाजूला त्या गुजरात युनिव्हर्सिटीच्या एका महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक झाल्या, तर दुसरीकडे घरात मात्र शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचा सामना करत होत्या. हा प्रेमविवाह होता, त्यामुळे तो निभवायची जबाबदारी आपलीच आहे, या दबावाखाली सोळा वर्षं त्यांनी तो छळ सोसला. त्यांचा १४ वर्षांचा मुलगाही हा छळ सोसत होता.
 

२००२ च्या गुजरात दंगलीतून मिळाली प्रेरणा
पुढे झकिया यांच्या आयुष्याला खरं वळण मिळालं ते २००२ च्या गुजरात दंगलीच्या वेळी. तोपर्यंत त्या कोणत्याही सामाजिक चळवळीत सक्रिय नव्हत्या. दंगलीत होरपळलेल्या लोकांची मदत करण्यासाठी त्या अहमदाबादमधल्या एका रिलीफ कॅम्पमध्ये जायला लागल्या. तिथल्या परिस्थितीने त्यांना हादरवून टाकलं. घरं जळून गेलेली, कुटुंबं विखुरलेली, भविष्याची शाश्वती नाही. पण अशा वातावरणातही त्या मुस्लिम स्त्रिया ज्या जिद्दीने उभ्या राहत होत्या, त्याने झकिया अंतर्मुख झाल्या.

मुसलमान, त्यातही ते गरीब असतील तर किती असुरक्षित असतात याची जाणीव झकिया यांना तिथे झाली. रिलीफ कॅम्पमधल्या सातवी आठवी शिकलेल्या त्या सामान्य स्त्रिया ज्या धैर्याने आपली मोडलेली आयुष्यं सावरत होत्या ते पाहून झकिया यांना स्वतःच्या आयुष्यातील छळ अधिक अन्यायकारक वाटू लागला.

‘माझ्याकडे शिक्षण आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, तरीही मी हा हिंसाचार का सहन करतेय?’, असा विचार त्या करू लागल्या. कॅम्पमधल्या त्या महिलांनी नकळतपणे झकिया यांना प्रेरणा आणि धैर्य दिलं. त्यानंतर लगेचच २००३ मध्ये त्यांनी त्या हिंसक नात्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
 

BMMA ची स्थापना आणि तिहेरी तलाक विरुद्ध लढा
अशा पद्धतीने स्वतःच्या अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यावर झकिया यांनी आपलं उर्वरित आयुष्य मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. 

पुढे जाऊन गुजराती झकिया यांची कर्मभूमी मुंबई झाली. जानेवारी २००७ मध्ये त्यांनी आणि नूरजहाँ सफिया नियाझ यांनी मिळून 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संस्थेची (BMMA) स्थापना केली. अशा रीतीने ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ हे स्त्रीवादी तत्त्व त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरलं.

“मुस्लिम महिलांना न्याय हवा आहे, आणि तो मिळवण्यासाठी त्यांना आपला धर्म सोडण्याची गरज नाही”, असं झकिया मानतात. त्यांनी कुराण आणि संविधान या दोन्ही पातळ्यांवर आपल्या हक्कांची मांडणी करायला सुरुवात केली. 

आज BMMA ही संस्था देशातल्या पंधराहून जास्त राज्यांमध्ये पसरली आहे. एवढंच नव्हे तर एक लाखांहून अधिक मुस्लीम महिला या चळवळीशी जोडल्या गेलेल्या आहेत. ‘अन्याय काय असतो, गरिबी काय असते आणि भेदभावाविरुद्ध उभं कसं राहायचं, हे मी विद्यापीठात नाही तर वयाच्या चाळीसाव्या वर्षी या स्त्रियांसोबत काम करताना शिकले,’ असं झकिया सांगतात.

BMMA च्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणजे 'जुबानी तिहेरी तलाक' (Instant Triple Talaq) विरुद्ध दिलेली लढाई. तिहेरी तलाक ही प्रथा कुराणविरोधी तर आहेच, पण ती मानवी हक्कांचंही उल्लंघन आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. या लढ्याच्या माध्यमातून त्यांनी जगाला ठणकावून सांगितलं की मुस्लिम महिला देखील या देशाच्या समान नागरिक आहेत. 
 

‘आम्हाला न्याय हवा आहे, आणि तो कुराण आणि संविधान या दोघांच्या प्रकाशात हवा आहे’ ही BMMA ची भूमिका चांगलीच गाजली. त्यांनी ५०,००० महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली. २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवला. 

आता तो निकाल लागल्याला दहा वर्षं होऊ घातली आहेत. दरम्यानच्या काळात आज भारतात तोंडी तिहेरी तलाक हा प्रकार जवळपास नामशेष झाला असल्याचं झकिया त्यांच्या कामाच्या अनुभवातून सांगतात.

महिला काझी आणि समानतेचा दृष्टिकोन
आज झकिया सोमण आपल्या खासगी आयुष्यातही सुखी आहेत. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी सोमण यांच्याशी दुसरा विवाह केला. झकिया यांच्या कामात त्यांचे पती, मुलगा, सून, सोमण यांची मुलगी अशा संपूर्ण कुटुंबाचा खंबीर पाठींबा आहे. 

झकिया सोमण यांचा सामाजिक कामातला अनुभव जसा दांडगा आहे तसा त्यांचा कुराणविषयी आणि धर्माविषयीही अभ्यासही गाढा आहे.

इस्लामचा अर्थ लावण्याचे काम पुरुषसत्ताक दृष्टिकोन आणि पुरुषप्रधान सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पुरुषांकडूनच होत असेल, तर त्यातून पुढे येणारे सर्वमान्य अर्थही साहजिकच पुरुषधार्जिणेच असणार. 

मात्र, आपण स्त्री-पुरुष समानतेविषयी संवेदनशील असणारी कुराण भाष्ये वाचतो; तेव्हा अल्लाहाने स्त्री आणि पुरुष दोघांनाही समानच निर्माण केले आहे, ही बाब आपल्या लक्षात येते, असे त्यांचे मत आहे.

‘न्याय आणि समानता हा इस्लामचा मूळ गाभा आहे, पण शतकानुशतके पुरुषांनी त्यांच्या सोयीनुसार धर्माचा अर्थ लावला. अल्लाहने आदम आणि हव्वा यांना एकाच वेळी, समान हक्कांसह निर्माण केलं आहे’, हे त्या संदर्भानिशी सांगतात. 

मानवनिर्मितीसाठी कुराणमध्ये वापरलेली 'जौझ' (म्हणजे जोडा) ही संकल्पना समानता दर्शवणारी आहे, त्या दोघांना जोडीत, एकत्र बनवलं गेलं आहे हे त्या पोटतिडकीने सांगतात.

महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या केसेसवर काम करण्यासोबतच त्या इतर अनेक महत्वाचे मुद्देही हाती घेत असतात. 'हाजी अली दर्गा' मध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठीही त्यांच्या संस्थेने लढा दिला, शिवाय महिलांना 'काझी' होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं कामही त्या करतात. 

'मुस्लिम फॅमिली लॉ'मध्ये सुधारणा करण्याची त्यांची मागणी आहे. त्या संदर्भाने कायदेशीर लढाई आणि सामाजिक जागृतीचं काम अशा दुहेरी फ्रंटवर त्या आणि त्यांची संस्था काम करत आहे.

आपलं व्यक्तिमत्व काही धर्मापुरतं मर्यादित नसतं असं त्या मानतात. "मी एक मुस्लिम आहे, पण त्यासोबतच मी एक आई आहे, एक स्त्री आहे, कदाचित एक पेंटर किंवा योगाभ्यासकही असेन." 

ही व्यापक दृष्टी त्यांच्या कामातही प्रतिबिंबित होते. देशातील वाढत्या द्वेषाच्या राजकारणाबद्दल आणि विविधतेवरील प्रश्नचिन्हांबद्दल त्या काळजीने बोलतात. 

शेवटी त्या म्हणतात, “आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आपली संमिश्र संस्कृती असल्यामुळेच हा देश आजवर ठामपणे उभा राहू शकला आहे. विविधता हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. आजचे राजकारण हीच विविधता नष्ट करू पाहत आहे आणि ही अत्यंत दुर्दैवी व मूर्खपणाची गोष्ट आहे.”
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter