मृदगंधा दिक्षित
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय नागरिकाची आयुर्मर्यादा अवघी २७-२८ वर्षं होती. त्यामुळे इथल्या आरोग्य व्यवस्थेवर भर देणं गरजेचं होतं. भारताची आर्थिक स्थितीही वाईट होती. त्यामुळे इथल्या गरीब जनतेला परवडेल अशी कल्याणकारी आरोग्य व्यवस्था उभी करायची होती.
फार्मासिटीकल कंपन्यावर तेव्हाही नाफेखोरीचे आरोप होतच होते. अशात औषधनिर्मितीमध्ये देशी कंपन्या तयार होऊन औषधनिर्मितीच्या क्षेत्रातही भारताला स्वावलंबी व्हायचं होतं. भारताच्या निर्मितीकर्त्यांनी या गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष दिल्याचं आपला इतिहास सांगतो.
या इतिहासातलं एक सोनेरी पान म्हणजे 'सिप्ला'. पण एखादी संस्था ८० वर्षांचा टप्पा ओलांडते, तेव्हा तिच्यासमोर जुन्या मूल्यांना नव्या जगाच्या वेगवान तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान लीलया पेललं आहे हमीद कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समीना हमीद यांनी.
एकेकाळी २२७ अब्ज रुपये बाजारमूल्य असलेल्या या कंपनीला आज तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या टप्प्यापलीकडे नेण्यामध्ये आणि 'कॉर्पोरेट शिस्त’ आणि 'मानवीय दृष्टिकोन’ यांचा मेळ साधत संस्थेची प्रगती करण्यामध्ये समीना यांचा सिंहाचा वाटा आहे.
कॉर्पोरेट जगतातली तिसरी पिढी
समीना यांचा प्रवास 'चांदीचा चमचा' घेऊन सुरू झाला असं वरवर पाहणाऱ्याला वाटू शकतं. पण त्यांनी सिप्लामध्ये नवीन संकल्पना राबवल्या. पारंपारिक व्यवसायाला मॉडर्न टच दिला. त्यांचे आजोबा आणि सिप्लाचे संस्थापक ख्वाजा अब्दुल हमीद यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन या कंपनीची स्थापना केली.
पुढे त्यांचे वडील एम. के. हमीद आणि काका डॉ. वाय. के. हमीद यांनी ती भारताबरोबरच परदेशातही वाढवली. त्यांनी पाश्चात्य कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढत आफ्रिकेसह अनेक विकसनशील देशांना एड्सवरची औषधं अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिली.
समीना यांचं बालपण मुंबईत गेलं. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठलं. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' (LSE) मधून 'इंटरनॅशनल अकाउंटिंग अँड फायनान्स' या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यावर त्या सिप्लामध्ये काम करतील हे गृहीतक होतं. पण त्याला छेद देत त्यांनी जागतिक अर्थकारणाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या 'गोल्डमन सॅक्स'मध्ये काम सुरू केलं.
लंडन आणि न्यूयॉर्कमधील त्या अटीतटीच्या स्पर्धेत समीना यांनी जागतिक बाजारपेठेचे नियम आणि 'ग्लोबल वर्क कल्चर' जवळून अनुभवलं. कॉर्पोरेट जगात एखादा निर्णय कसा घेतला जातो आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतात, हे त्या तिथेच शिकल्या.
सिप्लामधलं नवं पर्व
समीना २०११ मध्ये सिप्लामध्ये अधिकृतपणे रुजू झाल्या. तेव्हा त्यांच्यासमोर दोन मोठी आव्हानं होती. पहिलं म्हणजे, कंपनीच्या जुन्या आणि अनुभवी टीमचा विश्वास संपादन करणं आणि दुसरं म्हणजे, सिप्लाला 'पारंपारिक भारतीय औषध कंपनी' या प्रतिमेतून बाहेर काढून एक 'मल्टिनॅशनल जायंट' म्हणून उभं करणं.
त्यांनी सिप्लामध्ये आल्यावर तिथली 'स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट्स'ची धुरा सांभाळली आणि कंपनीच्या कानाकोपऱ्याशी त्या वाकीफ झाल्या. शिस्त, ठामपणा आणि दूरदृष्टी हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.
त्यांनी जागतिक दर्जाचे तज्ज्ञ आणि प्रोफेशनल्स कंपनीत आणले. सिस्टिम्स बसवल्या. आज सिप्लामध्ये दिसणारी व्यावसायिक शिस्त ही समीना यांनी गेल्या दशकभरात केलेल्या मेहनतीचं फळ आहे.
'सिप्ला हेल्थ' आणि कंझ्युमर हेल्थकेअरमधली क्रांती
समीना यांच्या दूरदृष्टीचा एक उत्तम नमुना म्हणजे २०१५-१६ च्या सुमारास झालेली 'सिप्ला हेल्थ लिमिटेड' (Cipla Health Ltd.) ची स्थापना. केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर अवलंबून न राहता, थेट ग्राहकांच्या रोजच्या गरजांशी जोडलं जाणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी अचूक ओळखलं होतं.
या नव्या व्यवसायाची रणनीती स्पष्ट करताना समीना यांनी मांडलेला विचार खूप गाजला. त्या म्हणाल्या होत्या, "कंझ्युमर हेल्थकेअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला 'फार्मा इन / एफएमसीजी आऊट' या मानसिकतेची अत्यंत गरज आहे. म्हणजे उत्पादन बनवताना त्यात 'फार्मा' कंपनीची वैज्ञानिक अचूकता आणि विश्वासार्हता असावी, पण बाजारात ते विकताना मात्र साबण-शॅम्पूसारखं थेट ग्राहकांपर्यंत आक्रमकपणे पोहोचवलं जावं."
याचाच परिणाम म्हणून आज भारतीय बाजारपेठेत 'निकोटेक्स' (धूम्रपान सोडण्यासाठीची उत्पादने), 'कफसिल्स' (Cofsils - खोकल्यावरील गोळ्या आणि सिरप), 'ओम्निजेल' (Omnigel - वेदनाशामक मलम/स्प्रे) आणि 'मॅक्सिरिच' (Maxirich - मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट्स) यांसारख्या ब्रँड्सनी घराघरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ओटीसी (Over the Counter - डॉक्टरांच्या चिठ्ठीविना मिळणारी औषधे) उत्पादनांच्या क्षेत्रात सिप्लाला यशस्वीपणे उतरवून समीना यांनी 'सिप्ला'चा ब्रँड थेट सामान्य माणसाच्या 'फर्स्ट-एड बॉक्स'पर्यंत पोहोचवला.
परदेशातही विस्तार आणि धाडसी निर्णय
समीना यांच्या नेतृत्वाखाली सिप्ला जागतिक नकाशावर झळकलं. त्यांनी औषधांची निर्यात तर केलीच शिवाय परदेशातल्या स्थानिक कंपन्यांचं अधिग्रहण (Acquisition) करून तिथं आपली पाळंमुळं घट्ट केली. २०१५-१६ मध्ये अमेरिकेतल्या 'इनव्हाजेन फार्मास्युटिकल्स' (InvaGen Pharmaceuticals) आणि 'एक्सेलॅन' (Exelan) यांसारख्या कंपन्यांच्या खरेदीचा निर्णय हा सिप्लाच्या इतिहासातल्या सर्वात धाडसी निर्णयांपैकी एक मानला जातो.
या निर्णयामुळे अमेरिकेसारख्या कडक नियम असलेल्या बाजारपेठेत सिप्लाचा प्रवेश सुकर झाला. आज दक्षिण आफ्रिका असो वा अमेरिका, सिप्लाचा ब्रँड एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखला जातो. या जागतिक विस्तारामध्ये समीना यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
'पेशंट-फर्स्ट' दृष्टिकोन
सिप्लाचं ब्रीदवाक्य आहे - 'Caring for Life'. पण हे केवळ ब्रीदवाक्य राहू नये यासाठी समीना यांनी संशोधनावर (R&D) विशेष भर दिला. त्यांच्या मते, "संशोधन हे औषध उद्योगाचं हृदय आहे." त्यांनी श्वसनविकार क्षेत्रात सिप्लाला जगात अव्वल स्थानी नेण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही करून दाखवलं.
आज सिप्लाचे 'इन्हेलर्स' जगभरातल्या कोट्यवधी रुग्णांना श्वास घेण्यासाठी मदत करताहेत. विशेषतः कॅन्सर आणि एचआयव्ही सारख्या गंभीर आजारांवरील औषधं सामान्यांना परवडतील अशा किमतीत उपलब्ध करून देण्याच्या सिप्लाच्या धोरणाला समीना यांनी अधिक प्रभावीपणे पुढे नेलं. "औषध हे नफा कमवण्याचं साधन नाही, तो रुग्णाचा अधिकार आहे," ही त्यांची ठाम धारणा आहे.
कोरोनाचा कसोटीचा काळ आणि जपलेले समाजभान
जागतिक महामारीच्या काळात जेव्हा अख्खं जग ठप्प झालं होतं, तेव्हा समीना हमीद आणि त्यांची टीम अहोरात्र काम करत होती. 'रेमडेसिविर' असो वा इतर महत्त्वाची औषधं, ती वेळेत उपलब्ध करून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्यांनी स्वतः सप्लाय चेन आणि लॉजिस्टिकवर लक्ष ठेवलं. नफ्याचा विचार बाजूला ठेवून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत औषधं कशी पोहोचतील याला त्यांनी प्राधान्य दिलं.
या आणीबाणीच्या परिस्थितीविषयी बोलताना समीना हमीद यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत सिप्लाची भूमिका मांडली होती. त्या म्हणतात, "या जागतिक महामारीच्या काळात आमचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरले आहे. कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत जीवनदायी औषधं विनाव्यत्यय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत."
या काळात सिप्लाने दाखवलेली तत्परता ही समीना यांच्या नेतृत्वाची 'लिटमस टेस्ट' ठरली, ज्यामध्ये त्या नक्कीच यशस्वी ठरल्या असं म्हणावं लागेल.
कॉर्पोरेट जगतातलं मानाचं स्थान
समीना यांच्या कर्तृत्वाचा गौरव अनेकदा झाला आहे. 'फॉर्च्युन इंडिया' आणि 'बिझनेस टुडे' सारख्या नामांकित नियतकालिकांनी त्यांचा उल्लेख वारंवार 'भारतातील सर्वात शक्तिशाली महिला उद्योजिका' म्हणून केला आहे. 'फोर्ब्स'च्या आशियातील प्रभावी महिलांच्या यादीतही त्यांचं नाव झळकलं आहे.
मात्र, या पुरस्कारांपेक्षाही 'इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स' (IPA) च्या माध्यमातून त्या संपूर्ण भारतीय औषध उद्योगासाठी करत असलेलं धोरणात्मक काम अधिक महत्त्वाचं आहे. २०२१ ते २०२३ या काळासाठी 'इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स'च्या (IPA) उपाध्यक्षा (Vice President) म्हणून त्यांची झालेली निवड हा त्यांच्या वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
'आरोग्य सेवेच्या इको सिस्टीमला सक्षम बनवण्यासाठी आणि उद्योगातील सर्व घटकांसोबत समन्वयाने काम करून रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.' असं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या. सरकारच्या धोरणांमध्ये रुग्णांचं हित कसं जपलं जाईल यासाठी त्या नेहमीच आग्रही असतात.
समाजभान आणि भविष्यवेधी विचार
समीना हमीद सिप्लामध्ये आल्या त्याच दरम्यान म्हणजे २०११ मध्ये 'सिप्ला फाऊंडेशन'ची स्थापना झाली. फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात अनेक आश्वासक उपक्रम राबवले आहेत.
विशेषतः 'सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटर' (Cipla Palliative Care) सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांना मोफत आणि सन्मानाने उपचार मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
ग्रामीण भागात फिरत्या दवाखान्यांचे (Mobile Healthcare Units) जाळे विणण्यामागेही त्यांची मुख्य भूमिका राहिली आहे. "आमचं यश बॅलन्स शीटमध्ये मोजता येणार नाही. आम्ही किती जीव वाचवले त्या संख्येत ते मोजावं लागेल", असं त्या म्हणाल्या आहेत.
आपल्या या सामाजिक दृष्टिकोनाबद्दल बोलताना समीना हमीद म्हणतात, "आरोग्यसेवा हा व्यवसाय नाही. तो एक मूलभूत मानवी हक्क आहे. आमची जबाबदारी औषधं बनवण्यापुरती मर्यादित नाही. गरिबातल्या गरीब रुग्णालाही सन्मानाने आणि परवडणारे उपचार मिळतील अशी व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे."
आजच्या घडीला सिप्ला डिजिटल हेल्थकेअर आणि प्रिसिजन मेडिसिनकडे वाटचाल करत आहे. त्याचं नेतृत्वही समीना करत आहेत. डिजिटल हेल्थकेअर म्हणजे तंत्रज्ञान आणि मोबाईल ॲप्सच्या मदतीने आरोग्यसेवा अधिक स्मार्ट करणं. यामध्ये घरात बसून व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांचा सल्ला घेणं, स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड सारखे वेअरेबल्स वापरणं यांचा समावेश होतो. त्यातून आपले हार्ट रेट, ईसीजी किंवा रक्तातील ऑक्सिजन सतत मोजता येतं.
त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड ठेवणं, म्हणजे रुग्णाच्या आजाराची आणि उपचारांची सर्व माहिती कागदावर न ठेवता क्लाउडवर सुरक्षित ठेवणं अशा गोष्टींचा समावेश होतो. तर प्रिसिजन मेडिसिन म्हणजे एकच औषध सर्वांसाठी असा दृष्टिकोन न ठेवता योग्य रुग्णाला, योग्य वेळी, योग्य तेच औषध देणं.
फार्मासिटीकल सारख्या नफ्यासाठी बदनाम असणाऱ्या क्षेत्रांत येणं, त्याला छेद देत नफा आणि सामाजिक काम यांचा मेळ साधत काम करणं हे भान त्यांना विरासत म्हणूनच मिळालं असलं तरी ते नाव, प्रतिष्ठा, कार्य टिकवून ठेवत, आणि त्यात भरीव योगदान देत परंपरेला आधुनिकतेशी जोडणाऱ्या समीना हमीद नव्या भारतासाठी मिसाल आहेत, यात शंका नाही!