ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख
भक्ती चाळक
मराठी भाषेचे सौंदर्य आणि शुध्दलेखनाचे नियम ज्यांच्या श्वासात अन् ध्यासात शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत होते, त्या ज्येष्ठ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी भाषा, अध्यापन आणि भाषाशास्त्र क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता, मात्र प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
जन्माने ज्यू, एका मुस्लिम तरुणाशी विवाह आणि आयुष्यभर मराठी मायबोलीची केलेली निस्पृह सेवा... असा विस्मयकारक, संघर्षमय अन् तितकाच प्रेरणादायी प्रवास अनुभवणाऱ्या यास्मिन शेख यांचे जाणे मराठी सारस्वताची कधीही भरून न निघणारी हानी आहे.
“आपणच आपली मराठी प्रदूषित करतोय!”
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर खूप सहजतेने करतात, पण असे करताना आपणच आपली मायबोली प्रदूषित करत आहोत याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे, असे यास्मिन नेहमी तळमळीने सांगायच्या.
बोलीभाषा कशीही असली, तरी वैचारिक लेखन, शास्त्रीय ग्रंथ, वर्तमानपत्रे आणि ललित वाङ्मय निर्माण करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, अशी त्यांची आयुष्यभर ठाम भूमिका होती. व्याकरण आणि भाषाशास्त्र हा कोरडा विषय न मानता, तो मायबोलीचा सर्वात मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपणे हे आपले आद्यकर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.
यामुळे बदलले नाव
यास्मिन यांचा जन्म एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा रुबेन असे होते. २१ जून या वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शाळेत असताना त्या वाढदिवशी शाळेचा गणवेश न घातल्यामुळे शिक्षिकेने विचारणा केली. यावर वर्गमैत्रिणीने आज त्यांचा वाढदिवस असल्याचे सांगितले.
स्वतःचा वाढदिवस आहे हे सांगायलाही संकोच करणाऱ्या चिमुकल्या जेरुशाच्या त्या स्वभावावर शिक्षिकेने उद्गार काढले होते, “तू खूप मोठी होणार आहेस, कारण २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.” शिक्षिकेचे ते शब्द यास्मिन यांनी आपल्या उत्तुंग कर्तृत्वाच्या जोरावर तंतोतंत खरे करून दाखवले.
वडिलांच्या नोकरीनिमित्त हे कुटुंब पंढरपूरला स्थायिक झाले असताना एक वेगळाच अनुभव आला. लहान वयात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी त्या कुटुंबातील इतर मुलींसोबत गेल्या. मात्र, रंग आणि कपड्यांवरून त्या हिंदू नसल्याचे ओळखून स्थानिक पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात जाण्यास प्रतिबंध केला.
समाजात असलेल्या या विषमतेचा लहान वयातच अनुभव आल्याने त्यांना वाईट वाटले, पण त्यांनी मनात कोणतीही कटुता धरली नाही. उलट या अनुभवाने त्यांच्या व्यक्तित्वाची सात्विकता अधिकच बहरली.
पुढे ज्येष्ठ साहित्यिक वसंत कानेटकरांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये एका चित्रमंदिरात काम करणाऱ्या अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) या मुस्लिम तरुणाशी त्यांची भेट झाली. १९५० मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर सासूबाईंना ‘जेरुशा’ नाव उच्चारायला कठीण जायचे, म्हणून त्या ‘यास्मिन’ झाल्या. पण शेख परिवाराचे आप्त खलील यांच्या सल्ल्याने त्यांनी स्वतःचा धर्म बदलला नाही. पुढे त्यांच्या कन्या डॉ. शमा भागवत आणि प्रा. रुकसाना बाविस्कर यांनीही हा आंतरधर्मीय विवाहाचा पुरोगामी वारसा पुढे चालवला.
कुटुंबीयांच्या नावात मुस्लिम नाव असल्यामुळे ५० वर्षांपूर्वी त्यांना घर नाकारले गेले होते. त्या वेळी झालेल्या क्लेशाच्या वेदना त्यांनी सहन केल्या. पण माणुसकी हाच धर्म मानणाऱ्या या कुटुंबाने समाजसुधारक हमीद दलवाई यांच्याशी ओळख झाल्यावर, साहित्यिक श्री. पु. भागवत यांच्या माध्यमातून मुस्लिम महिलांच्या प्रश्नांची उकल करून आकाशवाणीसाठी महत्त्वाचे लेखनही केले.
अध्यापन, बालभारती अन् ३५ वर्षांची ग्रंथतपस्या
प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन यांनी श्री. पु. भागवत आणि वसंत कानेटकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले. तब्बल ३५ वर्षे त्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाचे पवित्र कार्य केले. मुंबईच्या एस.आय.ई.एस. महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी धुरा सांभाळली.
शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’मध्ये त्यांनी आयएएसच्या विद्यार्थ्यांना तब्बल १० वर्षे व्याकरण व भाषाशास्त्र शिकवले. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे सात वर्षे संपादन केले, तसेच संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरण’ पुस्तकातील त्यांचा सहभाग मोलाचा होता. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी १५ वर्षे योगदान दिले.
मुंबईच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रसिद्ध झालेली ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, लोकसत्तामधील दर सोमवारी प्रसिद्ध होणारे ‘भाषा सूत्र’ हे लोकप्रिय सदर आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ हा ग्रंथ आजही लेखक, पत्रकार, शिक्षक आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरतो. राज्य शासनाचा ‘डॉ. अशोक केळकर सन्मान’ देऊन त्यांच्या ऋषितुल्य कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला होता.
धर्माच्या भिंती ओलांडणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी यास्मिन यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. तांबोळी म्हणाले की, “शंभरी पार केलेल्या डॉ. यास्मिन शेख यांच्याविषयी विशेष आदर वाटतो. लोक त्यांना मराठी व्याकरणतज्ज्ञ म्हणून ओळखत असले, तरी ७०-७५ वर्षांपूर्वी त्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्टखाली केलेला आंतरधर्मीय विवाह आणि आयुष्यभर जपलेली जात-धर्मापलीकडली माणुसकी खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही धार्मिक आणि जातीच्या भिंती न मानणारे हे एक सदाप्रसन्न व्यक्तिमत्त्व होते.”
ते पुढे म्हणाले की, “मुस्लीम सत्यशोधक मंडळाने त्यांना ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मानाने’ सन्मानित केले होते. हमीद दलवाई यांच्या विचारांवर आणि मंडळाच्या कामावर त्यांचे अफाट प्रेम होते अन् त्यांनी या कामाला नेहमीच मोठी साथ दिली.”
डावीकडून डॉ. शमसुद्दिन तांबोळी, डॉ. रूक्साना बाविस्कर (यास्मिन शेख यांच्या कन्या) डॉ. यास्मिन शेख, डॉ. बेनझीर तांबोळी
व्याकरणाची भीती घालवणारी ‘गुरू’
कादंबरीकार अन् भाषाशास्त्राचे अभ्यासक सुशील धसकटे यांनी ‘अंतर्नाद’ मासिकात काम करत असताना यास्मिन यांच्यासोबत घालवलेला २००३ ते २०१५ हा काळ ‘शेखबाईमय’ होता, अशी आठवण सांगत आपल्या संशोधनाची पायाभरणी कशी झाली याविषयी सांगितले.
सुशील धसकटे सांगतात, “शेखबाईंकडे मराठी शब्दलेखनकोशाच्या मुद्रणप्रतीचे काम करत असताना व्याकरणाबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या अत्यंत सोप्या भाषेत द्यायच्या. बाई हाडाच्या शिक्षिका असल्याने व्याकरणाची मनात असलेली अनामिक भीती निघून गेली आणि या विषयात रुची निर्माण झाली.”
ते पुढे म्हणतात, “केवळ शंका निरसन करून न थांबता, “आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधता आली पाहिजेत, त्यासाठी भाषाविज्ञानाच्या शास्त्रीय अभ्यासावर भर दे,” असा दृष्टिकोन त्यांनी दिला. याच प्रेरणेतून डेक्कन कॉलेजात भाषाशास्त्राचे शिक्षण आणि पुढे बोलीभाषेत पीएच.डी.पर्यंतचा संशोधनाचा प्रवास घडला.”
यास्मिन शेख यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अर्पण केले. आज त्या भौतिकदृष्ट्या आपल्यात नसल्या, तरी त्यांनी लिहिलेले शब्दकोश, निर्माण केलेले शेकडो विद्यार्थी आणि मराठी व्याकरणाला दिलेली अभिजात शिस्त या माध्यमातून त्या प्रत्येक मराठी रसिकाच्या हृदयात सदैव अमर राहतील.