SHAHEED HUMAYUN BHAT: दहशतवाद्यांशी लढताना पत्करले वीरमरण; काश्मीरचे DySP हुमायूं मुझम्मिल भट यांना कीर्ती चक्र प्रदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
काश्मीरचे DySP हुमायूं मुझम्मिल भट
काश्मीरचे DySP हुमायूं मुझम्मिल भट

 

श्रीनगर

काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना सर्वोच्च बलिदान देणारे उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) हुमायूं मुझम्मिल भट यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' देऊन सन्मानित केले आहे. शांतता काळातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च लष्करी सन्मान असून, यापूर्वी त्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकही जाहीर करण्यात आले होते.

अनंतनाग जिल्ह्यात १३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या एका भीषण चकमकीत अवघ्या ३२ वर्षांच्या हुमायूं भट यांनी लश्कर-ए-तैयबाच्या कुख्यात दहशतवाद्यांना भिडताना प्राणांची आहुती दिली होती. ५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी नेहमी पुढे राहून तुकडीचे नेतृत्व केले. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी त्यांनी दिलेले हे बलिदान संपूर्ण देशासाठी शौर्याची प्रेरणादायी कथा बनले आहे.

गडूलच्या जंगलातील ती भीषण चकमक

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरातील गडूल गावाच्या घनदाट जंगलात दहशतवादी लपल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर लष्कर व पोलिसांचे संयुक्त अभियान सुरू झाले होते. या मोहिमेदरम्यान जंगलात लपलेल्या लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर उझैर खान व त्याच्या साथीदारांनी सुरक्षा दलांवर अंधाधुंद गोळीबार केला. या चकमकीत हुमायूं भट गंभीर जखमी झाले.

पोटाला प्राणघातक गोळी लागलेली असतानाही त्यांनी अत्यंत संयमाने आपल्या वडिलांना फोन करून धीर दिला होता. तसेच तातडीने उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोंचक आणि शिपाई प्रदीप सिंग यांनाही वीरमरण आले होते.

दोन पिढ्यांची देशसेवेची परंपरा

हुमायूं यांचे वडील गुलाम हसन भट हे स्वतः पोलिस निरीक्षक जनरल (IGP) म्हणून ३४ वर्षे देशसेवा करून निवृत्त झाले आहेत. वडिलांच्या निवृत्तीनंतर काही महिन्यांतच हुमायूं यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी फातिमा अली आणि लहानगा मुलगा आशर असा परिवार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले होते. काश्मीरच्या मातीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी हुमायूं भट यांनी दिलेले हे बलिदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.