स्वामी रामतीर्थ यांच्या जलसमाधीनंतर कवी अल्लामा इक्बाल यांनी रचली होती खास नझ्म

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 44 m ago
अल्लामा इक्बाल आणि स्वामी रामतीर्थ
अल्लामा इक्बाल आणि स्वामी रामतीर्थ

 

ग़ौस सिवानी

उर्दू भाषेने जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील शब्द जसे आपलेसे केले, अगदी त्याचप्रमाणे विविध संस्कृतींनाही स्वतःच्या कुशीत स्थान दिले. या भाषेचा सर्वात मोठा गुण म्हणजे तिची उदार मानसिकता, धार्मिक सहिष्णुता आणि बंधुभाव. उर्दूच्या अनेक कवींनी वेगवेगळ्या धर्मांतील महान मानवांवर सुरेख काव्यरचना केल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अल्लामा इक्बाल.

अल्लामा इक्बाल यांची शायरी इस्लामिक तत्त्वज्ञानाने नटलेली असली, तरी त्यांनी अनेक हिंदू महापुरुषांवर अत्यंत आवडीने कविता लिहिल्या. इक्बाल यांच्या मनात ज्या आदरणीय व्यक्तींबद्दल प्रचंड आस्था होती, त्यात स्वामी रामतीर्थ हे अग्रस्थानी होते. भगवान श्रीराम, गुरु नानक देव, गौतम बुद्ध आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल इक्बाल यांच्या मनात अपार आदर होताच, पण स्वामी रामतीर्थ यांचे वैशिष्ट्य म्हणजे इक्बाल अन् स्वामीजींचा वैयक्तिक ऋणानुबंध होता.

स्वामी रामतीर्थ हे त्यांच्या काळातील प्रख्यात हिंदू तत्त्वज्ञ आणि वेदांताचे महान संत होते. इक्बाल यांनी त्यांच्यावर एक अत्यंत सुंदर कविता (नझ्म) रचली. चला तर मग, स्वामी रामतीर्थ नेमके कोण होते आणि त्यांनी इक्बाल यांच्यावर कशी भुरळ घातली होती, ते अगदी जवळून समजून घेऊया...

कोण होते स्वामी रामतीर्थ?
स्वामी रामतीर्थ यांचा जन्म २२ ऑक्टोबर १८७३ रोजी आजच्या पाकिस्तानमधील गुजरानवाला जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणचे नाव 'तीर्थराम' असे होते. लहानपणापासूनच ते तल्लख बुद्धिमत्तेचे धनी होते, पण त्यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. अठराविश्वे दारिद्र्य आणि बिकट आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षणाची कांस सोडली नाही.

उच्च शिक्षणासाठी ते लाहोरला गेले. पंजाब युनिव्हर्सिटीतून बी.ए. करताना संपूर्ण पंजाबात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांना दरमहा ९० रुपये शिष्यवृत्ती मिळायची. पुढे त्यांनी गणितात एम.ए. केले आणि त्याच कॉलेजात ते गणिताचे प्रोफेसर बनले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण एका मदरशात झाले होते. त्यामुळे उर्दू आणि फारसी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, नंतर त्यांनी संस्कृत भाषाही आत्मसात केली. प्रोफेसर झाल्यानंतरही त्यांचे जगणे अत्यंत साधे होते. आपल्या पगाराचा मोठा हिस्सा ते गरीब अन् गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करायचे.

लाहोरमध्ये असताना त्यांना स्वामी विवेकानंदांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. या भाषणाचा त्यांच्या अंतर्मनावर आणि अध्यात्मावर खोल प्रभाव पडला. त्या काळात ते पंजाबच्या सनातन धर्म सभेशी जोडलेले होते.

अध्यात्माची वाट आणि संन्यास
स्वामी रामतीर्थ यांनी केवळ हिंदू धर्मग्रंथांचाच अभ्यास केला नाही, तर संत तुलसीदास, सूरदास, गुरु नानक देव, शम्स तबरेझी, मौलाना जलालुद्दीन रुमी आणि इतर सुफी संतांच्या विचारांचे सखोल मंथन केले. गीता, वेद, उपनिषदे आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचाही त्यांनी सखोल अभ्यास केला.

त्यांनी उर्दूत 'अलिफ' नावाचे मासिक सुरू केले, ज्यातून ते आपले विचार मांडायचे. १९०१ मध्ये त्यांनी प्रोफेसरची नोकरी सोडली आणि कुटुंबासह हिमालयात निघून गेले. पुढे द्वारका पीठाच्या शंकराचार्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी संन्यास घेतला आणि संसाराचा त्याग केला.

ff

परदेश दौरा आणि वैश्विक संदेश
हिमालयातील वास्तव्यादरम्यान टिहरी (गढवाल) चे महाराज स्वामीजींचे भक्त बनले. त्यांच्याच मदतीने स्वामी रामतीर्थ जपानमधील एका धार्मिक परिषदेला गेले. तिथून ते अमेरिका आणि इजिप्तलाही गेले. जपानमध्ये महिनाभर तर अमेरिकेत दोन वर्षे त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली.

"स्वतःला ओळखा, तुमचे मूळ स्वरूप ईश्वराच्या प्रकाशाशी जोडलेले आहे," हा त्यांचा मुख्य संदेश असायचा. त्यांच्या अद्भूत व्यक्तिमत्त्वात असा काही चमत्कारिक प्रभाव होता की, लोक त्यांच्या सानिध्यात येताच शांतता अनुभवत असत. हळूहळू जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.

नवीन पंथ स्थापन करण्यास नकार
स्वामी रामतीर्थ मानवी मने जोडण्यावर विश्वास ठेवायचे. १९०४ मध्ये ते भारतात परतल्यावर त्यांच्या अनुयायांनी त्यांना स्वतःचा नवीन संप्रदाय (पंथ) सुरू करण्याची विनंती केली. पण स्वामीजींनी तो प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला. नवीन मतभेद निर्माण करण्यापेक्षा लोकांना एकत्र आणणे अधिक गरजेचे आहे, समाजाला वादाची नाही तर एकतेची गरज आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

वेदांताचे चिंतन अन् देशप्रेम
स्वामी रामतीर्थ हे वेदांत तत्त्वज्ञानाचे पाईक होते. आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांतावर त्यांची अपार श्रद्धा होती. सर्व जग एकाच आत्म्याचे स्वरूप आहे, असे ते मानायचे. जात, धर्म, कुटुंब अन् समाजाच्या संकुचित भिंती ओलांडून संपूर्ण मानवतेला आपलेसे करा, अशी त्यांची शिकवण होती. मानवी सुख पैशात किंवा वस्तूंत नसून स्वतःच्या आत्म्यात दडलेले असते, यावर त्यांचा भर होता.

स्वामी रामतीर्थ हे सच्चे देशभक्त होते. "सध्याच्या काळात 'राष्ट्रधर्म' म्हणजेच देशाची सेवा करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे," असे ते नेहमी सांगायचे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत स्वतंत्र होईल, असे भाकीत त्यांनी खूप आधीच केले होते. स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा हिंदी असेल, त्यामुळे आपले विचार हिंदीतून मांडत जा, असा मोलाचा सल्ला त्यांनी क्रांतिकारी विचारवंत लाला हरदयाळ यांना पत्राद्वारे दिला होता.

आयुष्याचा शेवटचा अध्याय
गढवालमधील टिहरीशी स्वामीजींचे आत्मिक नाते जोडलेले होते. आयुष्याच्या शेवटी ते तिथेच परतले. १९०६ च्या दिवाळीच्या दिवशी त्यांनी मृत्यूच्या नावे एक संदेश लिहून तो गंगेच्या पात्रात सोडून दिला. २७ ऑक्टोबर १९०६ रोजी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांनी जगात निरोप घेतला. त्यांनी स्वतःहून जलसमाधी घेतली असावी, असे मानले जाते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार होता.

अल्लामा इक्बाल आणि स्वामीजींचे सख्य
अल्लामा इक्बाल आणि स्वामी रामतीर्थ यांच्यात अतूट मैत्री होती. दोघेही एकाच कॉलेजात शिकवायचे आणि तरुणपणापासूनचे जिगरी दोस्त होते. दोघेही कवी, तत्त्वज्ञ आणि ज्ञानी होते. दोघे एकत्र शिकले, एकत्र वाढले आणि दोघांनीही आपापल्या लेखणीने जगावर मोहिनी घातली.

त्यांच्या या अनोख्या मैत्रीबद्दल त्यांचे चरित्रकार इंद्रजीत लाल लिहितात, "लाहौर में स्वामी राम की शायर-ए-मशरिक़ अल्लामा इक़बाल से गहरी मित्रता हो गई थी। दोनों ने साथ पढ़ाई की और साथ ही युवावस्था बिताई। दोनों कवि, दार्शनिक और विद्वान थे। दोनों दिल से लोगों की सेवा करना चाहते थे। दोनों ने लेखन के क्षेत्र में बड़ी पहचान बनाई। केवल भारत ही नहीं, बल्कि दुनिया भर में उनका नाम हुआ। दोनों अपने पीछे कविता और गद्य का बड़ा ख़ज़ाना छोड़ गए।"

(स्रोत: स्वामी रामतीर्थ, लेखक – इंद्रजीत लाल, पृष्ठ २४–२५)

त्या काळात असा एक किस्सा प्रसिद्ध होता की, जर सर मोहम्मद इक्बाल त्यांच्या खोलीत सापडले नाहीत, तर ते नक्कीच तीर्थराम यांच्या घरी गेले असणार हे उघड असायचे! तसेच तीर्थराम घरी नसले की ते इक्बाल यांच्याकडेच भेटायचे. दोघे तासनतास साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मावर चर्चा करत बसत असत.

एकदा रात्री स्वामीजींच्या पोटात भयंकर वेदना सुरू झाल्या. तेव्हा इक्बाल त्यांच्या जवळच होते. इक्बाल यांनी औषध घेण्याचा सल्ला दिला, पण स्वामीजींनी हसत हसत औषध नाकारले आणि म्हणाले, "औषधाची गरज नाही, वेदना आपोआप बऱ्या होतील." रात्रभर वेदना सहन करून सकाळी ते पूर्णपणे ठीक झाले. स्वामीजींच्या संन्यास घेण्यावरून काही लोकांनी जेव्हा त्यांचा उपहास केला, तेव्हा अल्लामा इक्बाल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

या प्रसंगाबद्दल डॉ. रफिक झकेरिया लिहितात, "अगर स्वामी रामतीर्थ पागल हैं, तो दुनिया में समझदारी और बुद्धि जैसी कोई चीज़ नहीं है। यह वही दीवानगी है जिसने स्पिनोज़ा जैसे महान दार्शनिक को ऊँचाई दी और पैगम्बरों को महान बनाया।"
(स्रोत: इक़बाल: शायर और सियासतदाँ, डॉ. रफ़ीक़ ज़करिया, पृष्ठ ६६)

'स्वामी रामतीर्थ' ही अजरामर नझ्म
स्वामीजींच्या जलसमाधीची बातमी ऐकून अल्लामा इक्बाल यांना मोठा धक्का बसला. या असीम दुःखाच्या आवेगात त्यांनी 'स्वामी रामतीर्थ' नावाने एक नझ्म लिहिली. या कवितेत त्यांनी मित्राचा विरह आणि स्वामीजींची अध्यात्मिक उंची अद्भूत शब्दांत मांडली आहे.

नझ्म पुढीलप्रमाणे आहे,

हम बगल दरिया से है ऐ क़तरा बे-ताब तू
पहले गौहर था, बना अब गौहर-ए-नायाब तू

आह खोला किस अदा से तू ने राज़-ए-रंग-ओ-बू
मैं अभी तक हूँ असीर-ए-इम्तियाज़-ए-रंग-ओ-बू

मिट के ग़ौगा ज़िंदगी का शोरिश-ए-महशर बना
ये शरारा बुझ के आतिश-ख़ाना-ए-आज़र बना

नफ़ी-ए-हस्ती इक करिश्मा है दिल-ए-आगाह का
'ला' के दरिया में निहाँ मोती है 'इल्लल्लाह' का

चश्मे-नाबीना से मख़्फ़ी मानी-ए-अंजाम है
थम गई जिस दम तड़प, सीमाब सीमे-ख़ाम है

तोड़ देता है बुत-ए-हस्ती को इबराहीम इश्क़
होश का दारू है गोया मस्ती-ए-तस्नीम इश्क़

नझ्मचा भावार्थ आणि सुफी विचार
या कवितेच्या पहिल्याच ओळीत इक्बाल थेट स्वामी रामतीर्थ यांच्याशी संवाद साधतात. यात 'क़तरा' (पाण्याचा थेंब) म्हणजे स्वामीजींचे वैयक्तिक आयुष्य आणि 'दरिया' (नदी/समुद्र) म्हणजे ईश्वर! इक्बाल म्हणतात, "हे बेचैन थेंबा! आता तू अथांग सागराला जाऊन मिळाला आहेस. आयुष्यात तू एक अनमोल मोती होतास, पण मृत्यूनंतर तुझी महानता आणखी वाढली अन् तू एक दुर्मिळ रत्न बनलास!"

दुसऱ्या ओळीत ते स्वामीजींच्या आध्यात्मिक उंचीचे कौतुक करताना लिहितात, "तू या जगतातील रंग, रूप, जात अन् धर्मातील भेदभावाचे रहस्य ओळखून त्यापलीकडे गेलास. पण मी मात्र आजूनही याच बाह्य भेदांमध्ये अन् संकुचित ओळखींमध्ये अडकलो आहे."

ही कविता केवळ शोकगीत नसून एका महान संताच्या अध्यात्माला दिलेली मानवंदना आहे. एका मुस्लीम कवीने एका हिंदू संन्याशाचा केलेला हा सन्मान धार्मिक भेदांच्या पलीकडचा होता. इक्बाल यांनी स्वामीजींची महानता समजावण्यासाठी 'ला इलाहा इल्लल्लाह', हजरत इब्राहिम आणि तस्नीम या सुफी व इस्लामिक रूपकांचा वापर केला. सच्चा अध्यात्म हा कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसून ती संपूर्ण मानवतेची सामायिक संपत्ती आहे, हाच संदेश या मैत्रीतून अन् कवितेतून अजरामर झाला.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News