अल्लामा इक्बाल यांच्या साहित्यावर संस्कृत महाकवी भर्तृहरींचा प्रभाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
अल्लामा इक्बाल
अल्लामा इक्बाल

 

ग़ौस सिवानी

"फूल की पत्ती से कट सकता है हीरे का जिगर,
मर्द-ए-नादाँ पर कलाम-ए-नर्म-ओ-नाज़ुक बे-असर।"

अल्लामा इक्बाल यांच्या 'बाल-ए-जिब्रील' या प्रसिद्ध काव्यसंग्रहातील ही ओळ. हिऱ्याचे काळीज फुलाच्या पाकळीने कापले जाऊ शकते, पण मूर्ख माणसावर नाजूक, गोड शब्दांचा काहीच परिणाम होत नाही... हा विचार इक्बाल यांनी संस्कृतमधील थोर कवी भर्तृहरी यांच्या परंपरेतून घेतला.

उर्दू साहित्याचे वाचक संस्कृत कवींविषयी फारसे जाणत नाहीत. पण इक्बाल यांना अभ्यासणाऱ्यांना भर्तृहरी हे नाव नक्कीच ठाऊक असते. विशेष म्हणजे आज भारतापेक्षा युरोप आणि पाश्चात्त्य देशांमध्ये भर्तृहरी यांच्या साहित्यावर संशोधनाचा मोठा ओघ सुरू आहे. त्यांच्या ग्रंथांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होत आहेत.

इक्बाल यांच्या आवडत्या कवींमध्ये भर्तृहरींचे स्थान वरचे होते. आपल्या फारसी पुस्तकांमध्येही इक्बाल यांनी भर्तृहरींचा अतिशय आदराने उल्लेख केला. महाकवी इक्बाल यांना इतक्या प्राचीन काळातील कवीमध्ये असे काय वेगळेपण आढळले, की त्यांनी वारंवार त्यांचा उल्लेख केला? हा प्रश्न आजही साहित्यप्रेमींना भुरळ घालतो.

कोण होते कवी भर्तृहरी?
भर्तृहरी हे संस्कृत साहित्यातील महान कवी अन् तत्त्वज्ञ मानले जातात. त्यांनी मानवी जीवनाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या नावाने तीन प्रसिद्ध काव्यग्रंथ ओळखले जातात— नीति शतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. या तिन्हींना मिळून 'शतकत्रयी' म्हटले जाते.

नीति शतक : आदर्श जीवन कसे जगावे, चांगल्या-वाईटाची पारख आणि माणसाची नीतिमत्ता यावर मार्गदर्शन करते.

शृंगार शतक : प्रेम, सौंदर्य, सौंदर्य भावना आणि मानवी भावनांचे रंग दाखवते.

वैराग्य शतक : जगाचे क्षणभंगुरत्व, मोह-मायेचा त्याग आणि आत्मिक शांतीचा मार्ग दाखवते.

भर्तृहरींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सोपी, पण थेट काळजाला भिडणारी भाषा. त्यामुळेच शेकडो वर्षे उलटूनही त्यांचे श्लोक आजही तितकेच ताजे वाटतात.

त्यांच्या आयुष्याबद्दल ठाम ऐतिहासिक पुरावे कमी आहेत. पाचव्या ते सातव्या शतकाच्या दरम्यान त्यांचा काळ असावा. काही लोक त्यांना राजा मानतात, तर काही जण राजाच्या दरबारातील कवी. पत्नीच्या कपटामुळे दुःखी होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि अध्यात्माचा मार्ग निवडला, अशीही एक लोककथा प्रसिद्ध आहे.

उर्दू साहित्यावर पडलेला प्रभाव
केवळ इक्बालच नव्हे, तर उर्दूतील अनेक दिग्गज शायर भर्तृहरींच्या साहित्याने प्रभावित झाले. मिर्झा जाफर अली खाँ असर लखनवी, बाबू गोरीशंकर लाल अख्तर, रघुवेंद्र राव जज्ब आणि हसन नईम अशा दिग्गजांनी भर्तृहरींच्या रचनांचे अनुवाद केले अन् त्यांच्यातून प्रेरणा घेतली. युरोपीय भाषांमध्येही त्यांच्या श्लोकांचे भाषांतर झाले असून आजही त्यावर जगभरात संशोधन सुरू आहे.

जन्नतमध्ये इक्बाल अन् भर्तृहरींची काल्पनिक भेट
आपल्या 'जावेद नामा' या फारसी महाकाव्यात इक्बाल यांनी एक अद्भुत कल्पना मांडली आहे. स्वर्गात (जन्नत) त्यांची भेट कवी भर्तृहरींशी होते. या प्रसंगात इक्बाल यांनी भर्तृहरींचा उल्लेख भारताचे महाकवी असा अत्यंत आदराने केला आहे.
 

मूळ फारसी ओळी

हूरियाँ रा दर क़ुसूर ओ दर ख़ियाम
नालए-ए-मन दावत-ए-सोज़-ए-तमाम

आँ यके अज़ ख़ैमा सर बेरूँ कशीद
वाँ दिगर अज़ ग़ुरफ़ा रुख़ बिनमूद ओ दीद

हर दिले रा दर बहिश्त-ए-जाविदाँ
दादम अज़ दर्द ओ ग़म-ए-आँ ख़ाकदाँ

ज़ेर-ए-लब ख़ंदीद पीर-ए-पाकज़ाद
गुफ़्त ऐ जादूगर-ए-हिन्दी-निज़ाद

आँ नवा-परदाज़-ए-हिन्दी रा निगर
शबनम अज़ फ़ैज़-ए-निगाह-ऊ गुहर

या काव्यात भर्तृहरींशी झालेला मोठा संवाद आहे. मौलाना जलालोद्दीन रुमी आणि स्वतः इक्बाल यांच्या तोंडून भर्तृहरींचे वर्णन येते. त्याचा सोपा अर्थ असा, "ते अतिशय खोल विचारांचे कवी आहेत, ज्यांचे नाव भर्तृहरी आहे. त्यांचा स्वभाव सर्वांवर समभावाने कृपा करणाऱ्या ढगासारखा आहे. त्यांनी जगाच्या बागेतून फक्त ताजी उमललेली फुले निवडली आहेत. तुमच्या गाण्याने त्यांना इकडे आकर्षित केले. ते एका उंच आवाजाचे बादशहा आहेत. संन्यास आणि वैराग्यातही त्यांचे स्थान खूप वरचे आहे. ते दोनच शब्दांत अर्थाचे अथांग जग सामावून घेतात. त्यांना आयुष्याचे मर्म ठाऊक आहे. त्यांचे काव्य म्हणजे मानवी मनाचे सर्व रहस्य दाखवणारा आरसाच आहे."

संवादाच्या ओघात इक्बाल भर्तृहरींना विचारतात, "हे ज्ञानवंता! पूर्वेने तुमच्या वाणीतून आयुष्याचे रहस्य ओळखले आहे. मला सांगा, काव्यात ही तडप, हा दर्द कुठून येतो? हा माणसाच्या स्वतःच्या 'खुद़ी'तून (आत्मभावातून) निर्माण होतो की ईश्वराने दिलेली ही भेट आहे?"

यावर भर्तृहरी उत्तर देतात, "खऱ्या कवीचे अंतिम ध्येय काय असते, हे जगात कोणालाच ठाऊक नसते. त्याचे रहस्य त्याच्या गाण्याच्या सुरांमध्ये दडलेले असते. त्याच्या छातीत धडकणारे बेचैन काळीज ईश्वरासमोरही शांत बसत नाही. सतत शोध घेत राहण्यातच आत्म्याचा खरा आनंद असतो. काव्यातील वेदना याच शोधातून जन्माला येते. जर तुला हे स्थान मिळाले, तर तू अवघ्या दोन शेरांमधून स्वर्गातील अप्सरांचेही मन जिंकू शकशील."

त्यानंतर इक्बाल म्हणतात, "मी भारतातील लोकांना बेचैन आणि दुःखी पाहिले आहे. आता सत्य उघडपणे सांगण्याची वेळ आली आहे."

भर्तृहरी उत्तर देतात, "दगड-मातीचे हे कमजोर देव सोडून द्या. मंदिर आणि पूजास्थळांच्या पलीकडे असणारे एक महान सत्य आहे. अंतःकरणातील प्रेमाशिवाय केलेली पूजा निष्प्राण असते. कर्म हेच खरे जीवन आहे— मग ते चांगले असो वा वाईट. मी तुला एक गुपित सांगतो; भाग्यवान आहे तो माणूस, ज्याच्या हृदयावर हे सत्य कोरले गेले आहे. हे जग जसे दिसते, तसे ते थेट ईश्वराने बनवलेले नाही. हा आकाश तुझा आहे आणि हा दोराही तुझाच आहे, जो तू तुझ्या चरख्यावर काततोस. म्हणून कर्माच्या सिद्धांताचा स्वीकार कर. स्वर्ग, नरक आणि त्यामधील अवस्था माणूस स्वतःच्या कर्मानेच निर्माण करतो."

विचारांची नवी पहाट
संस्कृतच्या एका प्राचीन कवीबद्दल इक्बाल यांनी दाखवलेला हा आदर भारताच्या महान ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करतो. माणसाची खरी महानता पैशात किंवा सत्तेत नसून स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यात आणि इच्छांचा त्याग करण्यात आहे, हाच संदेश इक्बाल यांनी भर्तृहरींच्या माध्यमातून दिला.

इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या तत्कालीन भारताला जागे करण्यासाठी, स्वतःमधील ताकद ओळखण्यासाठी आणि आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी इक्बाल यांनी भर्तृहरींच्या या विचारांचा वापर केला. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि आधुनिक विचार यांचा हा संगम आजही तितकाच मार्गदर्शक ठरतो.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News