ग़ौस सिवानी
कवी अल्लामा इक्बाल यांची प्रसिद्ध ओळ आहे,
यक़ीं मुहकम अमल पैहम मुहब्बत फ़ातेह-ए-आलम
जिहाद-ए-ज़िंदगानी में हैं ये मर्दों की शमशीरें...
(अर्थात, पक्का विश्वास, सतत केलेले प्रयत्न आणि जग जिंकणारे प्रेम... आयुष्याच्या मैदानात लढताना हीच खरी ढाल आणि तलवार ठरते!)
या ओळी वाचताना तुम्हाला श्रीमद्भगवद्गीतेचा सुप्रसिद्ध कर्मयोग आठवतो का? हा प्रश्न ऐकून कदाचित अनेकांच्या भुवया उंचावतील. इक्बाल यांची ओळख प्रामुख्याने इस्लामिक तत्त्वज्ञान आणि विचार मांडणारे कवी म्हणूनच आहे. पण त्यांच्या या क्रांतिकारी विचारांच्या मागे श्रीमद्भगवद्गीतेची फार मोठी प्रेरणा होती! पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही जगतातील तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केलेल्या या महाकवीने गीतेतील 'कर्मयोगा'चे तत्त्व आपल्या काव्यात अगदी सहज उतरवले होते.
गीता अनुवादाची तीव्र इच्छा
इक्बाल यांच्या घरात पिढ्यानपिढ्या शिक्षणाचे वातावरण होते. त्यांचे पूर्वज कश्मीरी ब्राह्मण होते आणि पुढे मुघल काळात त्यांच्या कुटुंबाने इस्लामचा स्वीकार केला. इक्बाल यांना संस्कृत भाषेची चांगली जाण होती. त्यांनी वेद आणि गीता यांसारख्या पवित्र हिंदू धर्मग्रंथ अत्यंत आवडीने वाचले.
गीतेच्या कर्मयोगाने ते इतके प्रभावित झाले होते की, संस्कृतमधील हा महान विचार उर्दू भाषिकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांना स्वतः गीता अनुवादीत करायची होती. त्यांनी महाराजा किशन प्रसाद शाद यांना लिहिलेल्या पत्रात ही इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवली होती. स्वतः कवी नसताना किंवा भाषांतराचा कोणताही अनुभव नसताना केवळ या तत्त्वज्ञानावरील प्रेमापोटी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती.
'अमल' म्हणजेच कर्म
इक्बाल यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाया 'खुद़ी' (आत्मभान) आणि 'अमल' (कर्म) या दोन शब्दांवर टिकून आहे. त्यांच्या मते, हे आयुष्य म्हणजे आळसात घालवण्याची जागा नाही. आयुष्य ही एक अखंड वाहती नदी आहे; जिथे थांबणे म्हणजेच मृत्यू!
त्यांचा एक अतिशय गाजलेला शेर आहे,
अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी
यह ख़ाकी अपनी फ़ितरत में न नूरी है न नारी है...
माणूस जन्माने देव किंवा दानव नसतो. तो आपल्या कर्मानेच स्वतःचे नशीब, स्वतःचा स्वर्ग किंवा नरक घडवत असतो, हाच विचार त्यांनी यात मांडला.
गीतासुद्धा अर्जुनाला नेमका हाच उपदेश करते. कौरव-पांडवांचे सैन्य युद्धाच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकले, तेव्हा अर्जुनाचे हात गळून पडले. "आपल्याच आप्तांना मारून मिळालेले राज्य आणि सुख मला नको," असे म्हणत अर्जुनाने शस्त्रांचा त्याग केला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कर्म, कर्तव्य, आत्म्याची अमरता आणि फळाची अपेक्षा न करता लढण्याचा उपदेश दिला. कर्म सोडणे हा मार्ग असूच शकत नाही, हे श्रीकृष्णाचे बोल इक्बाल यांच्या मनावर कायमचे कोरले गेले.
संन्यासाला विरोध आणि अद्वैत तत्त्वज्ञानावरील भाष्य
इक्बाल यांनी संन्यास किंवा जगापासून पळून जाण्याच्या वृत्तीवर तीव्र टीका केली. सुफी परंपरेचा सन्मान करतानाही त्यांनी आळस आणि अकर्मण्यतेला कधीच पाठिंबा दिला नाही.
त्यांच्या 'असरार-ए-खुद़ी' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा सखोल आणि अत्यंत निष्पक्ष विश्लेषणात्मक धांडोळा घेतला आहे. ते लिहितात:
"माणसाचे दुःख आणि सुख त्याच्याच पूर्वकर्माचे फळ आहे, हा विचार हिंदू दार्शनिकांनी अतिशय आत्मविश्वासाने मांडला. पण यातून एक धोका निर्माण झाला, जर कर्म हेच दुःखाचे मूळ असेल, तर कर्म त्यागणे हाच सुटकेचा मार्ग वाटू लागला. अशा वेळी भगवान श्रीकृष्णांसारख्या युगपुरुषाने अवतार घेतला. त्यांनी कर्म सोडण्याचा अर्थ 'सगळी कामे सोडून देणे' असा नाही, तर 'फळाची आसक्ती न ठेवता कर्म करत राहणे' असा आहे, हे जगाला समजावून सांगितले."
इक्बाल यांनी गोएथेच्या 'फ़ाउस्ट' या प्रसिद्ध नाटकातील एका ओळीचा दाखला देत म्हटले होते की, "सुरुवातीला 'शब्द' नव्हता, तर 'कर्म' होते." हा विचार हिंदू दार्शनिकांनी शतकांपूर्वीच ओळखला होता!
गरुडाची झेप: तरुणांना आळस सोडण्याचे आवाहन
इक्बाल यांना तरुण पिढीने आराम आणि सुखाच्या मागे लागलेले अजिबात आवडत नसे. ते तरुणांना नेहमी ध्येयवादी बनण्याचे आवाहन करत.
नहीं तेरा नशीमन क़स्र-ए-सुल्तानी के गुम्बद पर
तू शाहीन है बसेरा कर पहाड़ों की चट्टानों में...
"अरे गरुडा! तुझे घर कुठल्या राजाच्या महालाच्या घुमटावर नाही, तर तुझा मुक्काम थेट उंच पर्वतांच्या खडकांवर असायला हवा!" असा संदेश देत त्यांनी तरुणांना संघर्ष करण्याचा मार्ग दाखवला.
गीतेमध्ये जसे आत्म्याच्या अमरतेविषयी सांगितले आहे, 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...', अगदी तसाच विचार मांडताना इक्बाल म्हणतात,
ज़िंदगी की आग का अंजाम ख़ाकिस्तर नहीं
टूटना जिसका मुक़द्दर हो यह वह गौहर नहीं...
(आयुष्याचा शेवट म्हणजे केवळ राख होणे नव्हे. मानवी आत्मा हा असा हिरा आहे जो सहज तुटणारा किंवा नष्ट होणारा नाही!)
कालजयी विचार
इक्बाल यांचे वडील शेख नूर मोहम्मद हे एक साधे शिंपी होते. गरिबीशी लढा देत, स्वतःच्या कष्टावर इक्बाल यांनी उच्च शिक्षण घेतले आणि युरोपपर्यंत मजल मारली. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात गीतेतील कर्म सिद्धांत प्रत्यक्ष जगून दाखवला.
काळाच्या ओघात अनेक विचार विरून गेले, पण कर्म आणि कर्तव्याचा हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. अल्लामा इक्बाल यांच्या ओळी शेवटी आपल्याला याच कटू सत्याची आठवण करून देतात—
सूरत-ए-शमशीर है दस्त-ए-क़ज़ा में वो क़ौम
करती है जो हर ज़माँ अपने अमल का हिसाब...
(जी जमात किंवा समाज प्रत्येक क्षणी स्वतःच्या कर्माचा हिशोब ठेवतो, तोच समाज काळाच्या हातात तलवारीसारखा मजबूत आणि अजिंक्य ठरतो.)