अयोध्या
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी आणि ऑपरेशन्ससाठी देशाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून निवृत्त एअर मार्शल जितेन्द्र मिश्रा (Air Marshal Jeetendra Mishra) यांची नियुक्ती केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व केलेले ६२ वर्षीय मिश्रा यांच्या नावावर ५,५८५ अर्जांमधून अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंदिर दानामध्ये कथित अफरातफर प्रकरणाच्या वादानंतर आणि चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या शोध समितीने कठोर आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे ही नावे शॉर्टलिस्ट केली होती. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित छाननी तसेच प्रत्यक्ष मुलाखतींचा समावेश होता. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले जितेन्द्र मिश्रा यांनी भारतीय वायुसेनेत ३९ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली असून, 'ऑपरेशन सिंदूर'मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 'सर्वोत्तम युद्ध सेवा पदक' प्रदान करण्यात आले होते. ३० एप्रिल २०२६ रोजी ते वायुसेलेतून निवृत्त झाले होते.
निवड समितीचे सचिव समीर पांडा यांनी सांगितले की, उमेदवारांचे नेतृत्वगुण, व्यवस्थापन कौशल्य, सचोटी आणि दूरदृष्टी पाहून तीन अत्यंत पात्र व्यावसायिकांची शिफारस ट्रस्टकडे करण्यात आली होती. यादरम्यान, मंदिराच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत ट्रस्टच्या आगामी कामकाजाची रूपरेषाही निश्चित करण्यात आली.