अमेरिकेतील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा कट अत्यंत चिंतेचा विषय: परराष्ट्र मंत्रालय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
अमेरिकेतील हिंदू मंदिर
अमेरिकेतील हिंदू मंदिर

 

नवी दिल्ली 

अमेरिकेतील इलिनॉय येथील एका हिंदू मंदिरात मोठा गोळीबार आणि नरसंहार घडवण्याचा कट रचण्यात आल्याची घटना अतिशय चिंतेची असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी स्पष्ट केले की, अमेरिकेने आपल्या देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, सुदृढता आणि कल्याण सुनिश्चित करावे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या द्विसाप्ताहिक मीडिया ब्रीफिंगदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ऑरोरा, इलिनॉय येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात ११ ऑक्टोबर रोजी एका १९ वर्षीय तरुणाने गोळीबार घडवण्याचा कट रचला होता. मात्र, बंदुकीत तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा हा कट फसला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. १४ ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याच्यावर दहशतवादी धमकी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाढत्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांवर भारताची चिंता

जयस्वाल यांनी या घटनेला 'खोल चिंतेचा विषय' असे म्हटले आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाविरुद्ध वाढणारे द्वेषपूर्ण गुन्हे (Hate Crimes) आणि वांशिक भेदभाव या घटनेमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत, असे ते म्हणाले. या प्रकरणी अमेरिकन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी तात्काळ केलेल्या कारवाईची आम्ही नोंद घेतली आहे, असे सांगत भारताने अमेरिकेने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. याआधी अनेक अमेरिकन खासदारांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून वाढत्या हिंदूविरोधी आणि भारतविरोधी द्वेषावर चिंता व्यक्त केली आहे.