‘विधी भूषण’ पुरस्कार स्वीकारताना अॅड. नंदकिशोर भुतडा
भक्ती चाळक
एखाद्या भाषेची ओळख तिच्या बोलणाऱ्यांच्या धर्मावरून ठरवायची की त्या भाषेने समृद्ध केलेल्या संस्कृतीवरून? उर्दूच्या संदर्भात हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी मुंबईतील एका सन्मान सोहळ्यात उर्दू भाषेविषयी व्यक्त केलेले विचार याच मुद्द्यावर लक्ष वेधणारे ठरले.
‘उर्दू ही भारताची भाषा आहे. तिला धर्माशी जोडू नये,’ असे स्पष्ट मत न्यायमूर्ती वराळे यांनी मांडले. उर्दू शायरी, साहित्य आणि भारतीय संस्कृतीतील तिचे स्थान अधोरेखित करत त्यांनी या भाषेशी असलेली आपली जवळीकही व्यक्त केली. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात उर्दू साहित्य आणि संस्कृतीशी घट्ट नाते जपणारे नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नंदकिशोर भुतडा यांचा वकिलीतील ५१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल ‘विधी भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
‘बड़ी नज़ाकत है ज़बान उर्दू में’
मुंबईतील दादर येथील योगी सभागृहात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी न्यायव्यवस्था आणि वकिली व्यवसायासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्याचवेळी उर्दू भाषा, तिची शायरी आणि भारतीय संस्कृतीतील तिचे स्थान याविषयी त्यांनी विशेष आस्था व्यक्त केली.
आपला संबंध संभाजीनगशी असल्याचे सांगत न्यायमूर्ती वराळे यांनी उर्दूच्या साहित्यिक परंपरेचा उल्लेख केला. उर्दू भाषेच्या विकासात या भूमीचे मोठे योगदान राहिले आहे. प्रसिद्ध कवी सिराज औरंगाबादी यांचा संदर्भ देत त्यांनी या भागाची साहित्यिक परंपरा जुनी आणि अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
उर्दूच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी वली दखनी, अल्लामा इक्बाल, गुलजार आणि दुष्यंत कुमार अशा नामवंत कवींची आठवण काढली. यावेळी गुलजार यांचा एक शेरही त्यांनी ऐकवला.
‘बड़ी नज़ाकत है ज़बान उर्दू में,
फ़क़ीरी में भी अमीरी का मज़ा देती है।’
उर्दू शायरीमध्ये आपल्याला विशेष रस असल्याचे सांगत न्यायमूर्ती वराळे म्हणाले की, “उर्दू ही भारताची भाषा आहे. तिच्याकडे धर्माच्या चौकटीतून पाहणे योग्य नाही. उर्दू भाषा आणि तिचे साहित्य भारतीयांच्या सामायिक संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे उर्दूची ओळख नसलेल्या लोकांनीही तिच्या शायरीत रस घ्यावा आणि तिच्या साहित्यिक सौंदर्याचा आनंद अनुभवावा.”
‘माझ्या वकिलीच्या यशात उर्दू शायरीचा मोठा वाटा’
या सोहळ्यात अॅड. नंदकिशोर भुतडा यांना वकिलीतील ५१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल आणि कायदा, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने ‘विधी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मान स्वीकारताना अॅड. भुतडा यांनी बार कौन्सिलचे आभार मानले. आपल्या वकिलीच्या यशामागे उर्दू शायरी आणि उर्दू संस्कृतीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. उर्दू साहित्य आणि शायरीतून मिळणारा आनंद, समाधान आणि मानसिक समृद्धी शब्दांत मांडणे शक्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने उर्दू भाषेशी असलेले त्यांचे दीर्घकालीन नाते पुन्हा अधोरेखित झाले.
या कार्यक्रमाला न्यायमूर्ती ए. एस. चंदूरकर, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. अनिल सिंह, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अॅड. जयंत जयभावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध भागांतून सुमारे तीन हजारांहून अधिक वकिलांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
उर्दूच्या प्रेमापोटी मिळालेला आणखी एक सन्मान
अॅड. नंदकिशोर भुतडा यांचे उर्दू भाषेवरील प्रेम आणि साहित्याशी असलेले नाते यापूर्वीही गौरवले गेले आहे. ३ फेब्रुवारीला मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाच्या वतीने आयोजित ‘जश्न-ए-उर्दू’ महोत्सवात त्यांना ‘अन्वर-ए-उर्दू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विद्यापीठाच्या परिसरातील फिरोजशाह मेहता भवन येथे झालेल्या या सोहळ्यात मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.