आझाद मैदानावर सुन्नी दावत-ए-इस्लामीचे ३४ वे अधिवेशन सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 47 m ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सुन्नी दावत-ए-इस्लामी (एसडीआय)च्या ३४ व्या वार्षिक अधिवेशनाला काल (शुक्रवारी) आझाद मैदानावर (वादी-ए-नूर) सुरुवात झाली. देश-विदेशातून धर्मगुरू आणि सूफी संतांचे आगमन झाले आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार अधिवेशनस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. महिला सहभागींच्या मदतीसाठी आणि देखरेखीसाठी एक हजारांहून अधिक महिला स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशनस्थळी हँडीकॅम, लॅपटॉप, बॅटरी, माचिस, लायटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात काल नमाज-ए-जुमानंतर झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सामूहिक दुआ होणार असून हजारो भाविक या प्रार्थनेत सहभागी होणार आहेत. देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठीही अल्लाहकडे प्रार्थना केली जाणार आहे. अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण एसडीआय चॅनेलवरून केले जात आहे.

देश-विदेशातील धर्मगुरूंचे मार्गदर्शन
सुन्नी दावत-ए-इस्लामीचे मौलाना मझहर हुसेन अलीमी यांनी अधिवेशनाच्या तयारीबाबत बोलताना सांगितले की, "अधिवेशनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. देश-विदेशातून उलेमा आणि मशायख यांचे आगमन झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुफ्ती मोहम्मद निजामुद्दीन रझवी, मौलाना शाकिर नूरी (सुन्नी दावत-ए-इस्लामीचे अमीर) आणि प्रसिद्ध वक्ते सय्यद अमीन कादरी यांच्यासह अनेक नामवंत धर्मगुरू आणि प्रचारक विविध धार्मिक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण एसडीआय चॅनेलवरून केले जाणार आहे."

सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
अधिवेशनस्थळावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत मौलाना अलीमी यांनी सांगितले होते की, पोलिसांच्या सूचनेनुसार ३० डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर आणि ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण अधिवेशन परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी ६० हून अधिक अतिरिक्त कॅमेरे लावण्यात आलेत.

पोलिसांनी अधिवेशनाला येणाऱ्या भाविकांना हँडीकॅम, लॅपटॉप, बॅटरी, माचिस, लायटर, नेलकटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत न आणण्याचे आवाहन केले होते. या वस्तू आढळल्यास संबंधितांना अधिवेशनस्थळी प्रवेश दिला जाणार नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने आझाद मैदानाच्या आसपास दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन पार्क करण्यासही मनाई करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सूचनांचा विचार करून विशेष तयारी करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या संख्येने वजूखाने आणि स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती.

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मौलाना शाकिर नूरी
सुन्नी दावत-ए-इस्लामीचे अमीर मौलाना मोहम्मद शाकिर नूरी यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, "पहिल्या दिवसाच्या अधिवेशनासाठी आपल्या घरातील महिलांना मोठ्या संख्येने पाठवा. येथे त्यांना धार्मिक शिक्षण घेता येईल. त्यातून स्वतःच्या आचरणात सुधारणा करण्यासोबतच इतरांनाही चांगल्या गोष्टींची शिकवण देता येईल."

पुढे ते म्हणाले होते, "येथे कुराण पठण, अल्लाहचे स्मरण, प्रार्थना, तौबा आणि इस्तिगफारचे असे क्षण अनुभवायला मिळतात, जे कठोर मनालाही पाझर फोडतात. दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी, सुन्नतनुसार आचरण आणि इस्लामी संस्कार अत्यंत प्रभावी पद्धतीने शिकवले जातात. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम बांधवांनीही मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी व्हावे."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News