वॉशिंग्टन
अमेरिकन सरकारी योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेला भारतीय वंशाचा गुन्हेगार मनजीत सिंग बेदी याचे भारतातून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले आहे. न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात भारतात अटक करण्यात आलेल्या बेदीला बुधवारी रात्री अमेरिकेत आणण्यात आले.
अमेरिकेचे एफबीआय संचालक काश पटेल यांनी या कारवाईची माहिती दिली. मनजीत सिंग बेदी याने वॉशिंग्टन राज्यातील टाकोमा शहरात 'एशियन ग्रोसरी स्टोअर' चालवले होते. ईबीटी कार्ड्स आणि स्नॅप (SNAP) योजनांच्या माध्यमातून त्याने अमेरिकन सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वायर फ्रॉड आणि SNAP फायद्यांच्या फसवणुकीचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याने कॅनडा आणि नंतर भारतात पळ काढला होता.
एफबीआयच्या सिएटल येथील तपासाधिकाऱ्यांनी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बेदीला भारताकडून ताब्यात घेण्यात आले. वॉशिंग्टन राज्याच्या पश्चिमी जिल्हा न्यायालयात शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, तो पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे एफबीआयने त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.