लोणावळा
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात परदेशी नागरिकांना बनावट ड्रग्स प्रकरणाची भीती दाखवून फसवणूक करणाऱ्या एका अवैध कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी २० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३६ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगगाव येथील एका बंगल्यावर ही धाड टाकली. या कारवाईदरम्यान अनेक तरुण हेडफोन, लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून इंग्रजीतून परदेशी नागरिकांशी संवाद साधताना आढळले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी या ठिकाणी कोणत्याही वैध परवान्याविना कॉल सेंटर चालवत असल्याची कबुली दिली. हे आरोपी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमधील नागरिकांशी इंटरनेट कॉल्सच्या माध्यमातून संपर्क साधत असत.
आरोपी गुगल आणि अमेझॉनसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रे तयार करत असत. याद्वारे ते नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांची बँक खाती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डची माहिती मिळवत होते.
तसेच, परदेशी नागरिकांनी मागवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ (ड्रग्ज) सापडल्याची भीती दाखवून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा आणि भारतीय टेलिग्राफ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.