अल्लामा इक्बाल यांनी काव्यातून मांडली भगवान बुद्धांची महानता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 51 m ago
अल्लामा इक्बाल
अल्लामा इक्बाल

 

ग़ौस सिवानी

पूर्व जगतातील थोर कवी आणि तत्त्वज्ञ अल्लामा मोहम्मद इक्बाल यांच्या लेखनात जागतिक इतिहासातील महान विभूतींना अत्यंत आदराचे स्थान मिळाले आहे. अशाच एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख इक्बाल यांनी अतिशय आदराने अन् श्रद्धेने केला आहे, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे भगवान गौतम बुद्ध.

इक्बाल यांच्या दृष्टीने गौतम बुद्ध हे केवळ एक धर्मसंस्थापक नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे रक्षक, अहिंसेचे पुजारी, आत्मसंयमाचे प्रतीक आणि मानवी मूल्यांचे थोर संदेशवाहक होते. त्यांनी केवळ समाज किंवा राजकारणावरच नाही, तर मानवी विचार आणि संस्कृतीवर असा काही ठसा उमटवला की संपूर्ण आशिया खंडातील कोट्यवधी मानवांचे जगणे उजळून निघाले. जगातील शेकडो विचारवंतांनी बुद्धांवर लिहिले, पण इक्बाल यांचे बुद्धदर्शन अतिशय वेगळे आणि सखोल आहे. त्यांनी आपल्या उर्दू काव्यासोबतच 'जावेद नामा' या प्रसिद्ध फारसी ग्रंथातही बुद्धांचा मोठा गौरव केला आहे.

जगावर पसरलेली बुद्धांच्या विचारांची मोहिनी
एका काळात चीनपासून पार इराणपर्यंत भगवान बुद्धांचे कोट्यवधी अनुयायी पसरलेले होते. भारत, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता. याच कारणामुळे आज या सर्व प्रदेशांमध्ये बौद्ध स्तूप आणि भव्य प्रतिमांचे ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात.

भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेश ही बौद्ध संस्कृतीची मुख्य केंद्रे होती. पटना, नालंदापासून थेट अयोध्येपर्यंत याचे पुरावे विखुरलेले आहेत. काश्मीर हेसुद्धा बौद्ध दर्शनाचे मोठे केंद्र होते. आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ज्या काळात गांधार संस्कृतीचा भाग होते, तिथे बौद्ध धर्म अतिशय भरभराटीस आला. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान आणि इराण या देशांपर्यंत बुद्धांच्या विचारांची पताका फडकत होती.

इतकेच नाही तर पैगंबर साहेबांच्या काळात अरब देशांमध्येही बौद्ध भिक्षू राहत असत. त्यांच्या अंगावरील लाल वस्त्रांमुळे त्यांना अरबी भाषेत 'मुहम्मरा' (लाल वस्त्र परिधान करणारे) म्हटले जाई. इतिहासकारांच्या मते, त्या काळातील अरब लोक भगवान बुद्धांच्या मूर्तींशी चांगलेच परिचित होते.

आज चीन, जपान, तिब्बत, कंबोडिया, म्यानमार, भूतान, श्रीलंका, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया आणि मंगोलिया या देशांमध्ये बौद्ध धर्मीयांची संख्या मोठी आहे. ज्या भारतभूमीत बुद्धांचा जन्म झाला, तिथे आज बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या १ टक्क्यापेक्षा कमी असली तरी जागतिक स्तरावर हा जगातील चौथा मोठा धर्म मानला जातो.

ऐतिहासिक सत्य : भगवान बुद्ध
गौतम बुद्ध हे कोणतेही काल्पनिक किंवा पौराणिक पात्र नव्हते, तर ते एक ऐतिहासिक सत्य होते. इतिहासकारांच्या मते, ईसापूर्व सहाव्या ते चौथ्या शतकाच्या दरम्यान नेपाळमधील लुंबिनी (कपिलवस्तु जवळ) येथे त्यांचा जन्म झाला आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे त्यांनी देहत्याग केला.

ब्रिटानिकानुसार 'बुद्ध' या शब्दाचा अर्थ, असा जागृत आणि ज्ञानी पुरुष, जो अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून सर्व दुःखांतून मुक्त झाला आहे. त्यांचे नाव सिद्धार्थ आणि गोत्र गौतम होते. त्यांच्या जीवनकार्याची माहिती मुख्यतः बौद्ध ग्रंथांमधून मिळते. हे ग्रंथ त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर काही शतकांनी लिहिले गेले असले तरी, आधुनिक इतिहासकार गौतम बुद्ध हे एक ऐतिहासिक सत्य होते यावर पूर्णपणे एकमत आहेत.

परंपरेनुसार बुद्धांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या अचूक तारखेबद्दल निरनिराळ्या बौद्ध परंपरांमध्ये ईसापूर्व २४२० ते ईसापूर्व २९० पर्यंत वेगवेगळे मतप्रवाह आढळतात.

बुद्धांचे जीवनकार्य अन् तत्त्वज्ञान
बौद्ध तत्त्वज्ञानाचा मुख्य पाया 'कर्माचा नियम' हा आहे. चांगले कर्म भविष्यात सुख देते, तर वाईट कर्मामुळे दुःखाचा सामना करावा लागतो. या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक जीव जन्म-मृत्यूच्या अखंड चक्रात अडकलेला असतो. या फिरणाऱ्या चक्राला 'संसार' म्हणतात. हा संसार दुःखांनी भरलेला असून या दुःखातून मानवाची कायमची सुटका करणे (निर्वाण) हाच बुद्धांच्या उपदेशाचा मुख्य हेतू आहे.

राजपुत्राच्या सुखासीन आयुष्याचा त्याग करून सलग सहा वर्षे कठीण तपश्चर्या केल्यानंतर बुद्धांना दिव्याज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांनी स्वतः सांगून ठेवलेले उपदेश आणि प्रवचने हाच त्यांच्या जीवनकार्याचा सर्वात मुख्य स्रोत मानला जातो.

आरंभीच्या बौद्ध स्मारकांमध्ये बुद्धांची मानवी आकृती किंवा मूर्ती पाहायला मिळत नाही. सुरुवातीच्या काळात मूर्तीऐवजी केवळ विविध प्रतीकांद्वारे (जसे की बोधीवृक्ष, धर्मचक्र, पादुका) बुद्धांची उपस्थिती दाखवली जाई. पुढे चौथ्या-पाचव्या शतकापासून बौद्ध विहारांमध्ये 'सुगंधित कक्ष' नावाची विशेष खोली बनवून तिथे मूर्तीची स्थापना करण्याची प्रथा सुरू झाली.
 

अल्लामा इक्बाल अन् बुद्धदर्शन
इक्बाल यांच्या दृष्टीने गौतम बुद्ध हे भारतभूमीच्या अध्यात्मिक इतिहासातील एक अत्यंत चमकदार आणि महान अध्याय आहेत. बुद्धांनी मानवी समाजाला द्वेष, अन्याय आणि जातीभेदाच्या दलदलीतून बाहेर काढण्याचे ऐतिहासिक काम केले, असे इक्बाल मानतात. ज्या काळात भारतात विषमतेचे राज्य होते, त्या काळात बुद्धांनी सर्व मानवांच्या समानतेचा आणि अहिंसेचा जयघोष केला. मानवी प्रतिष्ठा आणि नैतिक मूल्यांचा हाच संदेश इक्बाल यांच्या स्वतःच्या काव्यातही ओतप्रोत भरलेला दिसतो.

जरी इक्बाल हे बुद्धांच्या सामाजिक मूल्यांचे चाहते होते, तरी बौद्ध तत्त्वज्ञानातील 'संसारत्याग' या संकल्पनेशी ते सहमत नव्हते. जगापासून पळून जाण्याऐवजी जग सुंदर बनवणे हा जीवनाचा उद्देश असावा, असा इक्बाल यांच्या 'खुदी' (आत्मभान) तत्त्वज्ञानाचा आग्रह होता. त्यांच्या मते, धर्माचे काम केवळ मानवाचा अंतर्गत सुधार करणे एवढेच नसून एक मजबूत समाज निर्माण करणे हेसुद्धा आहे. त्यामुळे ते अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि कर्मप्रधान अध्यात्माचे समर्थक होते.

इक्बाल यांनी आपल्या पीएचडीच्या संशोधनात (ज्याचा विषय 'इराणी तत्त्वज्ञान' हा होता) बुद्धांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता. आपल्या 'फल्सफा-ए-अजम' या ग्रंथात ते लिहितात, "या विचाराच्या विकासावर त्या भारतीय प्रवाशांचा प्रभाव पडला असावा, जे इराणमार्गे त्या काळात बाकू येथील बौद्ध मंदिरांच्या यात्रेला जात असत. या विचारसरणीला हुसेन मन्सूर यांनी पूर्णपणे 'वहदत-उल-वजूद'चे रूप दिले आणि एका खऱ्या हिंदू वेदांतीप्रमाणे 'अना-अल-हक' (अहं ब्रह्मास्मि) असा उद्घोष केला."

फल्सफा-ए-अजम (पृष्ठ १११)

बुद्धांच्या संन्यास आणि निर्वाण संकल्पनेबद्दल याच ग्रंथात पुढे लिहिताना इक्बाल नोंदवतात, "बुद्धांच्या मते मुक्ती तेव्हाच मिळू शकते, जेव्हा माणूस आपल्या सर्व इच्छा संपवून टाकतो आणि आत्म्याच्या वासनांना पूर्णपणे दाबून टाकतो."

फल्सफा-ए-अजम (पृष्ठ १८५)

इक्बाल यांच्या काव्यातील बुद्ध
अल्लामा इक्बाल यांनी आपल्या प्रसिद्ध उर्दू कवितेत ("नानक") बुद्धांच्या महानतेची आदरपूर्वक दखल घेतली आहे. ते अत्यंत खेदाने लिहितात,

क़ौम ने पैग़ाम-ए-गौतम की ज़रा परवा न की
क़द्र पहचानी न अपने गौहर-ए-यक-दाना की

अर्थात, दुर्दैवाने भारतभूमीतील लोकांनी बुद्धांच्या महान संदेशाची योग्य ती कदर केली नाही. बुद्ध हे एक अद्वितीय आणि अनमोल मोती (गौहर-ए-यक-दाना) होते, पण इथला समाज त्यांच्या अलौकिक मूल्यांना ओळखू शकला नाही.

आह बदक़िस्मत रहे आवाज़-ए-हक़ से बेख़बर
ग़ाफ़िल अपने फल की शीरीनी से होता है शजर

कवी दुःखाने म्हणतात, जसे झाडाला स्वतःच्याच फळाच्या गोडव्याची जाणीव नसते आणि इतर लोक त्या फळाचा आस्वाद घेतात; तसेच भारत भूमी सत्य आणि धर्माच्या या महान आवाजापासून अनभिज्ञ राहिली.

आश्कार उस ने किया जो ज़िंदगी का राज़ था
हिंद को लेकिन ख़याली फ़लसफ़ा पर नाज़ था

बुद्धांनी मानवाला जगण्याचा खरा मार्ग आणि दुःखातून मुक्तीचा मंत्र दिला. परंतु इथला पंडित वर्ग मात्र केवळ कोरड्या काल्पनिक चर्चांमध्ये अन् शाब्दिक तत्त्वज्ञानात गुंतून राहिला, त्यामुळे बुद्धांचा व्यावहारिक संदेश बाजूला पडला.

शम्अ-ए-हक़ से जो मुनव्वर हो ये वह महफ़िल न थी
बारिश-ए-रहमत हुई लेकिन ज़मीं क़ाबिल न थी

इक्बाल यांनी इथे अप्रतिम उपमा दिली आहे, सत्याचा दिवा पेटला खरं, पण महफील तो प्रकाश सामावून घेण्यास तयार नव्हती. आकाशातून कृपेचा पाऊस पडला, पण जमीनच बंजर असल्यामुळे तिथे पीक येऊ शकले नाही.

बरहमन सरशार है अब तक मय-ए-पिंदार में
शम्अ-ए-गौतम जल रही है महफ़िल-ए-अग़्यार में

पारंपरिक धार्मिक वर्ग अजूनही स्वतःच्या गर्वात आणि अहंकारात बुडालेला आहे. दुसरीकडे बुद्धांच्या विचारांचा दिवा मात्र चीन, जपान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंडसारख्या दुसऱ्या देशांच्या महफिलींमध्ये पूर्ण तेजाने उजळत आहे!

'जावेद नामा' ग्रंथातील अलौकिक भेट
आपल्या फारसी महाकाव्य 'जावेद नामा'मध्ये इक्बाल यांनी एका काल्पनिक सफरीचे वर्णन केले आहे. मौलाना रुमी यांच्यासोबत आकाशाची सफर करताना 'तासीन' नावाच्या ठिकाणी त्यांची भेट भगवान बुद्धांशी होते. तिथे बुद्धांचे उच्च चरित्र मांडताना इक्बाल फारसीत लिहितात:

मये दीरीना व माशूक़-ए जवाँ चीज़े नीस्त
पेश-ए साहिब-नज़राँ हूर-ए जिनाँ चीज़े नीस्त

ज्याला सत्याची आणि ईश्वराची दृष्टी लाभली आहे, त्याच्यासाठी जुनी दारू, तरुण सुंदरी किंवा स्वर्गातील अप्सरा या गोष्टींना काहीही अर्थ उरत नाही. बुद्धांनी राजवाडा, सुख-भोग आणि कुटुंब सोडून सत्याचा शोध घेतला, ही घटना यामागे आहे.

दानिश-ए मग़रिबियान फ़लसफ़ा-ए मशरिकियान
हमा बुतख़ाना ओ दर तवाफ़-ए बुताँ चीज़े नीस्त

जर पश्चिमेचे ज्ञान आणि पूर्वेचे तत्त्वज्ञान माणसाला सत्यापर्यंत पोहोचवत नसेल, तर त्या कोरड्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही.

अज़ ख़ुद अंदेश व अज़ीं बादिया तरसाँ मगुज़र
कि तू हस्ती व वुजूद ओ जहाँ चीज़े नीस्त

आपल्या आतल्या 'खुदी'ला (आत्म्याला) ओळखा आणि संकटांना घाबरू नका. जेव्हा माणूस स्वतःची खरी ताकद ओळखतो, तेव्हा जगातील कोणतीही सत्ता त्याच्यासमोर टिकू शकत नाही.

बगुज़र अज़ ग़ैब कि ईं वह्म ओ गुमाँ चीज़े नीस्त
दर जहाँ बूदन ओ रस्तन ज़ जहाँ चीज़े हस्त

केवळ अदृश्य गोष्टींच्या कल्पनेत अडकून पडू नका. या जगात राहून जगातल्या मोहापासून, कपटापासून आणि वाईट गोष्टींपासून अलिप्त राहणे हाच खरा पराक्रम आहे.

हुस्न-ए रुख़्सार दमे हस्त ओ दमे दीगर नीस्त
हुस्न-ए किरदार ख़यालात-ए ख़ुशाँ चीज़े हस्त

चेहऱ्याचे सौंदर्य क्षणभंगुर आहे, आज आहे उद्या नष्ट होईल. पण माणसाचे उच्च चरित्र, त्याची चांगली कर्मे आणि उदात्त विचार हेच कायम अमर राहतात.

इक्बाल यांच्या मते, गौतम बुद्ध हे पूर्वेच्या आध्यात्मिक बुद्धिमत्तेचे शिखर आहेत. त्यांनी मानवी मनात दया, करुणा, प्रेम आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची चेतना निर्माण केली. अशा या थोर महामानवाला अल्लामा इक्बाल आपल्या काव्यातून आणि विचारांतून मनोमन प्रणाम करतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter