पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी प्रयत्नांना भारताने खंबीरपणे प्रत्युत्तर द्यावे: माजी राजनैतिक अधिकारी टी. सी. राघवन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
माजी राजनैतिक अधिकारी टी. सी. राघवन
माजी राजनैतिक अधिकारी टी. सी. राघवन

 

पाटणा 

पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि चिथावणीखोर कृत्यांविरोधात भारताने आपली कठोर आणि खंबीर भूमिका कायम ठेवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चआयक्त टी. सी. राघवन यांनी केले आहे. पाटणा येथील लोक भवनात आयोजित 'पाटलिपुत्र प्रज्ञा प्रवाह' मालिकेतील पहिल्या व्याख्यानात ते बोलत होते. मुत्सद्देगिरीमध्ये भावनांपेक्षा 'व्यावहारिक आणि संतुलित विचारांना' प्राधान्य दिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

'मक्का करार, पाकिस्तान आणि भारत-पाकिस्तान संबंधांचे भविष्य' या विषयावर बोलताना राघवन म्हणाले की, एकीकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाला कडाडून विरोध करतानाच शेजारी देशांसोबतच्या दीर्घकालीन संवादाची आणि संपर्काची गरजही लक्षात घेतली पाहिजे. मक्का करारामुळे पाकिस्तान, तुर्कस्तान आणि सौदी अरेबियामधील सहकार्य वाढीस लागण्याची शक्यता असून, प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. परराष्ट्र धोरणाकडे विजय किंवा पराभवाच्या दृष्टिकोनातून पाहता येत नाही, असे सांगत देशांना आपापल्या हितानुसार संबंध ठेवावे लागतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

आधुनिक तंत्रज्ञान आणि राजनैतिक धोरण

युद्धाचे बदलणारे स्वरूप आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्तिशाली आणि कमी शक्तिशाली देशांमधील अंतर कमी होत चालले आहे, असे राघवन म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या व्याख्यानमालेमुळे राज्याला ज्ञान, विचार आणि बौद्धिक देवाणघेवाणीचे प्रमुख केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळेल.