नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८ टक्के जीडीपी (GDP) वृद्धीदर नोंदवला असून, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधत पंतमप्रधानांनी, "निराशावादी तोंडाघशी पडले आणि भारताने पुन्हा एकदा भरभराट साधली," अशी प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अनिश्चितता, इराणमधील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार यांसारखी आव्हाने असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेली लवचिकता अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मागील तिमाहीत ८.६ टक्के असलेला विकासदर या तिमाहीत थोडा मंदावला असला, तरी जागतिक ऊर्जा बाजारातील विस्कळीतपणाच्या पार्श्वभूमीवर हा आकडा अपेक्षेपेक्षा खूपच चांगला असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारताच्या या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीमागे देशातील जनतेची सामूहिक शक्ती आणि संयम कारणीभूत असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. जागतिक स्तरावर अनेक अडचणी असतानाही भारताने मिळवलेले हे यश ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कठीण जागतिक परिस्थितीचा सामना करत भारतीय अर्थव्यवस्थेने केलेली ही प्रगती देशाच्या मजबूत आर्थिक पायाची साक्ष देते.