बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भडका उडून मोठा काळ लोटला असला, तरी शांततेची आस अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर किर्गिझस्तानची राजधानी बिशकेक येथे भरलेल्या एससीओ (SCO) परिषदेच्या व्यासपीठावर एका अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीने जगाचे लक्ष वेधून घेतले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी युद्धाच्या समाप्तीसाठी पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला. महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांच्या या भूमीतून मोदींनी पुतिन यांच्यासमोर जगाच्या शांततेची भूमिका मांडली.
अखंड युद्धाकडून युद्धाच्या अंताकडे...
दोन्ही नेत्यांच्या बैठकीत युक्रेन युद्धाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. बैठकीच्या सुरुवातीलाच वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झालेल्या वक्तव्यात पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत थेट आणि ठाम शब्दांत आपली भूमिका मांडली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "युक्रेनच्या मुद्द्यावर आपल्यात सतत चर्चा सुरू आहे. याआधी जेव्हा आपली भेट झाली होती, तेव्हा आपण या विषयाच्या सर्व बाजूंवर मला सविस्तर माहिती दिली होती. आपल्याला माहितीच आहे की, भारत शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाला पाठिंबा देतो आणि पुढेही देत राहील."
शांततेचे महत्त्व विशद करताना त्यांनी जागतिक समुदायाचा विचार मांडला. ते म्हणाले की, "युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे ढकलत असतो, तर शांततेच्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल मानवी समाजात नवीन आशा आणि उत्साह भरते. म्हणूनच आता आपल्याला अखंड चालणाऱ्या या युद्धाकडून युद्धाच्या अंताच्या दिशेने जावे लागेल."
मानवतेच्या कल्याणाचा विचार मांडताना मोदी पुढे म्हणाले, "मानवाच्या कल्याणासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सर्व समस्यांवर लवकरात लवकर शांततेच्या मार्गाने तोडगा काढणे हीच आज जगाची गरज आहे आणि हाच भारताचा संदेश आहे. गांधी आणि बुद्धांच्या या भूमीचा एकच संदेश आहे, तो म्हणजे शांततेचा मार्ग."
महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
या बैठकीत केवळ युद्धाचाच मुद्दा नव्हता, तर दोन्ही देशांतील परस्पर सहकार्यावरही भरभरून चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्र आणि खतांची सुरक्षितता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल संवाद झाला.
रशियन अध्यक्षांच्या गेल्या वर्षीच्या भारत दौऱ्याची आठवण काढत पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपला मागच्या वर्षीचा भारत दौरा अतिशय यशस्वी आणि आठवणीत राहणारा असा ठरला. आपल्यातील सहकार्य नव्या उंचीवर पोहोचत आहे आणि दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी आपण एकत्र काम करत आहोत, ही आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हा आपला नेहमीचाच दृष्टिकोन राहिला आहे आणि भविष्यातही हाच आपला मार्गदर्शक विचार असेल."
पुतिन यांच्याकडून भारत-रशिया संबंधांचा गौरव
पंतप्रधान मोदी यांच्या या भूमिकेनंतर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. भारत आणि रशियामधील विशेष आणि विशेषवाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीच्या (Special and Privileged Strategic Partnership) बळावर दोन्ही देशांतील संबंध नवीन टप्प्यावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन वार्षिक ब्रिक्स (BRICS) परिषदेसाठी भारतात येत आहेत. त्या दौऱ्याच्या अवघ्या काही दिवस आधी बिशकेक येथे झालेली ही भेट आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.