नवी दिल्ली
अन्न सुरक्षेला प्राधान्य देत प्रसिद्ध फूड डिलिव्हरी ॲप 'झोमाटो'ने (Zomato) आपल्या प्लॅटफॉर्मवर एनॅलॉग चीज, एनॅलॉग पनीर आणि इतर कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांच्या (Analogue Dishes) विक्रीवर शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण जाहीर केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या रेस्टॉरंट भागीदारांना प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचा (Delist) स्पष्ट इशारा झोमाटोने दिला आहे.
पारंपरिक घटकांऐवजी स्वस्त पर्याय (जसे की दुधाऐवजी वनस्पती तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ) वापरून अस्सल पदार्थांसारखे दिसणारे अन्न विकणाऱ्या रेस्टॉरंट्सवर ही कारवाई केली जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात केलेल्या कारवाईनंतर आणि FSSAI च्या तपासणीनंतर झोमाटोने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्या रेस्टॉरंट्सने आपल्या मेन्यूमध्ये एनॅलॉग पदार्थांचा वापर असल्याचे आधीच जाहीर केले होते, ते पदार्थ तात्काळ प्रभावाने झोमाटोवरून काढून टाकण्यात आले आहेत.
झोमाटोने आपल्या मंचावरील सर्व रेस्टॉरंट भागीदारांना तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यात नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थांकडे वळणे किंवा एनॅलॉग घटक असलेले पदार्थ मेन्यूमधून काढून टाकणे समाविष्ट आहे. ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि पारदर्शक अन्न मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे झोमाटोचे सीईओ आदित्य मंगला यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट्सची हकालपट्टी करण्यासोबतच कंपनीला होणाऱ्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याचा अधिकारही झोमाटोने राखून ठेवला आहे.