बेळगावातील कॅम्प परिसरात मुस्लिमांकडून दुर्गामाता दौडीचे जंगी स्वागत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
बेळगावमधील कॅम्प परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त निघालेल्या दुर्गामाता दौडीचे मुस्लिमांकडून स्वागत
बेळगावमधील कॅम्प परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त निघालेल्या दुर्गामाता दौडीचे मुस्लिमांकडून स्वागत

 

फझल पठाण

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले बेळगाव शहर म्हणजे संमिश्र संस्कृतीचे प्रतिक. इथे भाषा, प्रांत किंवा धर्मावरून झालेले मतभेद कधीच पाहायला मिळाले नाही. नुकतीच बेळगावच्या छावणी परिसरात गंगा जमुनी तहजीब अनुभवायला मिळाली.

दुर्गामाता दौडचे स्वागत 
बेळगाव शहर आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी जगभरात ओळखले जाते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरात निघालेली दुर्गामाता दौड म्हणजे तरुणांच्या अंगात उसळणारा उत्साह आणि भक्तीचा एक महापूर असतो. ढोल-ताशांच्या गजर आणि भगव्या ध्वजांच्या साक्षीने ही दौड शहराच्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करते. यंदाच्या नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड जेव्हा ऐतिहासिक कॅम्प परिसरात आली, तेव्हा परिसरातील मुस्लिमांनी तिचे स्वागत केले.

रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहून मुस्लिम तरुणांनी आणि वयोवृद्धांनी धारकऱ्यांना फळांचे वाटप केले. हातात भगवे ध्वज घेतलेल्या तरुणांचे एका मुस्लिमबहुल प्रभागात अशा प्रकारे ओवाळून किंवा प्रेमाने स्वागत होणे, हे सीमाभागातील अस्सल सलोख्याचे दर्शन घडवणारे होते.
 

सैन्य दलाच्या उच्चपदस्थांची उपस्थिती
या संपूर्ण सोहळ्यात लष्करी अधिकारीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. दौडीच्या या दुसऱ्या दिवशी माजी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष साजिद शेख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याची शान वाढवण्यासाठी ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, डेप्युटी कमांडर विनोद पाटील, सीईओ सुदाम मंचलवार यांच्यासह सतीश मनुरकर, डॉ. राहिली शेख आणि अजीज अब्बास अली यांसारख्या विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. 

या संपूर्ण आयोजनामागे आणि दोन्ही समाजांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका माजी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष साजिद शेख यांनी बजावली. दौड संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना अगदी मोकळ्या मनाने व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आज दुर्गामाता दौड कॅम्प मधून होती ते बघून आम्हला खूप आनंद झाला. ध्वजला हार घालायचं आम्हाला सौभाग्य मिळालं. आमच्यासोबत अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला याचा जास्त आनंद वाटला."

स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या उत्सवात कसे समरस झाले होते, हे सांगताना त्यांनी सैनिकी अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल विशेष कौतुक केले. साजिद शेख पुढे म्हणतात, "आमचे सीईओ साहेब आमच्याबरोबर होते आणि परत ब्रिगेडियर साहेब सुद्धा आणि डेप्युटी कमांडर साहेब सुद्धा इथे आलेले. सीईओ साहेबांनी ध्वजाला आणि तलवारीला हार घातला. ही दौड चांगली व्हावी यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो."

सण-उत्सव हे माणसांना तोडण्यासाठी नसतात, तर ते जोडण्यासाठी असतात, या वास्तवावर बेळगावातील घटनेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. या मातीने यापूर्वीही अनेक भाषा आणि संस्कृतींना आपल्यात सामावून घेतले आहे. आणि आता साजिद शेख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प परिसरात घडलेला हा उपक्रम आणखी एका सौहार्दाचे प्रतिक आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter