नवी दिल्ली
UPI युजर्ससाठी एक मोठासा दिलासादायक निर्णय समोर आला असून, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर लावण्यात येणारा ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मंगळवारी ही घोषणा केली असून, आता दिवाळीनंतर याच्या अंमलबजावणीची नवीन तारीख जाहीर केली जाईल.
NPCI ने गेल्या महिन्यात जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांवरील पर्सन-टू-मर्चंट (P2M) UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR आकारण्यात येणार होता. मात्र, आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन UPI आणि सर्व्हिसेस स्टीयरिंग कमिटीने हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा MDR शुल्क ग्राहकांकडून नव्हे तर व्यापाऱ्यांकडून वसूल केला जातो आणि ७५,००० रुपये किंवा त्याहून अधिक व्यवहारांसाठी तो ३०० रुपयांपर्यंत मर्यादित आहे. दिवाळीनंतर नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे NPCI ने स्पष्ट केले आहे.