जळगावात ‘मस्जिद परिचय’ उपक्रमातून सलोख्याचा संवाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 49 m ago
जळगावच्या जामा मस्जिदीत आयोजित ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रमातील क्षण
जळगावच्या जामा मस्जिदीत आयोजित ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रमातील क्षण

 

भक्ती चाळक

मस्जिदीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. अजान कुठून आणि कशी दिली जाते? मुस्लिम नमाज कशी अदा करतात? मस्जिदीतील वजूखाना आणि तहारतखाना नेमके कशासाठी असतात? या प्रश्नांची उत्तरे पुस्तकातून किंवा ऐकीव माहितीमधून मिळवण्याऐवजी प्रत्यक्ष मस्जिदीत जाऊन समजून घेण्याची संधी जळगावमधील हिंदू बांधवांना मिळाली. 

जळगावच्या जामा मस्जिदीत आयोजित ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रमातून मस्जिदीची रचना, इस्लामी इबादत आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक परंपरांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात शहरातील हिंदूंनी विशेष उपस्थिती लावली. मस्जिदीत आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नूर जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बिरादरान-ए-वतन अर्थात देशबांधवांना मस्जिदीची ओळख करून देणे, इस्लामी इबादतीविषयी माहिती देणे आणि मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवून देणे हा होता. धार्मिक स्थळाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळावी, तेथील प्रार्थनापद्धती आणि धार्मिक शिस्त समजावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.

उलेमांनी दिली सोप्या भाषेत माहिती
कार्यक्रमादरम्यान उपस्थित उलेमा-ए-इकराम (धर्मगुरू) यांनी मस्जिदीतील विविध भागांची आणि इस्लामी इबादतीची माहिती अत्यंत सोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत दिली. अजान म्हणजे काय, मुस्लिम बांधव नमाज कशी अदा करतात, नमाजपूर्वी वजू करण्याची पद्धत काय असते, वजूखाना आणि तहारतखान्याचे महत्त्व काय, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

मुस्लिमांच्या दैनंदिन जीवनात इबादतचे महत्व काय आहे, नमाज अदा करण्यासाठी मस्जिदीत कोणत्या गोष्टींचे पालन केले जाते, धार्मिक विधींच्या वेळी स्वच्छतेला किती महत्त्व दिले जाते, अशा विविध विषयांवरही उलेमांनी मार्गदर्शन केले. वजूखान्यात नमाजपूर्वी हात, पाय, चेहरा आदी अवयव स्वच्छ धुऊन वजू केले जाते. तहारतखान्याचा संबंध वैयक्तिक स्वच्छता आणि पवित्रतेशी आहे. या सर्व गोष्टींचे इस्लामी इबादतीतील महत्त्वही उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

उपस्थितांनी जाणून घेतली इस्लामी संस्कृती
उलेमा-ए-इकराम यांचे मार्गदर्शन उपस्थितांनी अत्यंत लक्षपूर्वक ऐकले. मस्जिदीतील धार्मिक परंपरा, नमाजची पद्धत आणि इस्लामी शिकवण समजून घेण्यासाठी त्यांनी उत्सुकता दाखवली. कार्यक्रमादरम्यान मुस्लिम समाज, इस्लामी संस्कृती आणि मस्जिदीशी संबंधित काही उपयुक्त पुस्तकेही पाहुण्यांना भेट देण्यात आली. या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना इस्लामी शिकवण आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक परंपरांविषयी अधिक माहिती मिळू शकणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आपले अनुभव आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मस्जिदीत येऊन कार्यक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद त्यांनी बोलून दाखवला. अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हायला हवेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या संपूर्ण उपक्रमाची माहिती अल हुफ्फाझ फाउंडेशनचे सरचिटणीस आणि जळगाव जिल्हा एकता संघटनेचे कार्याध्यक्ष हाफिज अब्दुल रहीम यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.

संवादातून दूर होतात गैरसमज
धार्मिक स्थळांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. मस्जिदीत जाऊन तेथील प्रार्थना पद्धती, धार्मिक आचार आणि स्वच्छतेचे नियम समजून घेण्याचा अनुभव या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाला. उपस्थितांनी मस्जिदीत येऊन उलेमांचे मार्गदर्शन ऐकले, प्रश्नांची उत्तरे मिळवली आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

जळगावच्या जामा मस्जिदीत झालेला हा ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रम धार्मिक स्थळांविषयीची माहिती आणि परस्पर संवादासाठी एक व्यासपीठ ठरला. अशा उपक्रमांमधून वेगवेगळ्या धर्मांच्या परंपरा समजून घेण्याची संधी मिळते. त्यातून एकमेकांविषयीची ओळख वाढते आणि सामाजिक सलोख्याचा संवाद अधिक दृढ होण्यास मदत होते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News