ठाणे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) केलेल्या कथित विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०१४ मधील राहुल गांधी यांच्या रॅलीची मूळ चित्रफीत (Footage) आपल्याकडे उपलब्ध नसल्याची माहिती 'झी मीडिया'ने भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाला दिली आहे.
आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी हा खटला दाखल केला असून, ६ मार्च २०१४ रोजी भिवंडीतील सोनाले गावात एका निवडणुकीच्या रॅलीत भाषण करताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जोडत मानहानीकारक विधान केल्याचा दावा यात करण्यात आला आहे. न्यायालयाच्या समन्सनुसार, रॅलीचा व्हिडिओ पुरावा सादर करण्यासाठी 'झी मीडिया'ने (झी २४ तास) न्यायालयात एक अर्ज दाखल केला. प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही बातमी किंवा प्रसारण १२ वर्षांहून अधिक जुने असून, टीव्ही चॅनेलच्या नियमांनुसार केवळ ९० दिवसांपर्यंतच रेकॉर्ड ठेवले जाते. तसेच या घटनेचे कव्हरेज करणारे पत्रकार आता संस्थेत कार्यरत नाहीत.
या प्रकरणाची सुनावणी शनिवारी पार पडली असून न्यायालयाने या खटल्याची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली.