भक्ती चाळक
रात्रीचे साधारण बारा वाजले होते. मुंब्र्याच्या दाभोळकर नाक्यावर अचानक धावपळ सुरु झाली. सुमारे २० फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती घेऊन जाणारी एक भलीमोठी ट्रॉली रस्त्याच्या मधोमध कलंडली. मूर्ती खाली पडून भग्न होण्याचा मोठा धोका मुस्लिम युवकांच्या मदतीने टळला. या संपूर्ण प्रसंगाने पुन्हा एकदा जगाला महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याचे उदाहरण दाखवून दिले.
नेमके काय घडले?
मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसरात असणाऱ्या मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुमारे २० फूट उंचीची विलोभनीय गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. ही भव्य गणेशमूर्ती भिवंडीतील पद्मानगर परिसरातील गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम सुरू होते.
रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही ट्रॉली मुंब्र्यातील दाभोळकर नाक्याजवळ पोहोचली. अचानक ट्रॉलीचे चाक तुटले आणि मोठा गोंधळ उडाला. ट्रॉली एका बाजूला झुकल्याने २० फुटी गणेशमूर्ती खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या आरिफ सय्यद, बासीत शेख आणि शाहू या तरुणांच्या लक्षात आला. कसलाही विचार न करता या मुलांनी मदतीसाठी थेट ट्रॉलीच्या दिशेने धाव ठोकली.
चार तासांच्या प्रयत्नांना यश
या तरुणानांनी क्षणाचाही विलंब न लावता परिसरातील आपल्या इतर सर्व मुस्लिम मित्रांना हाका मारल्या. बघता बघता अनेक तरुण तिथे जमा झाले. २० फुटी मूर्ती तोलून धरणे हे साधे काम नव्हते. तरुणांनी स्वतःच्या हातांचा आणि शरीराचा आधार देत ती ट्रॉली सावरून धरली. मध्यरात्री १२ वाजेपासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत तब्बल चार तास हे सर्व तरुण थकव्याची तमा न बाळगता गणेशमूर्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून उभे होते.
त्यानंतर क्रेन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने ती भव्य गणेशमूर्ती अतिशय काळजीपूर्वक त्या तुटलेल्या ट्रॉलीवरून खाली उतरवण्यात आली. दरम्यानच्या काळात दुसऱ्या नवीन ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली. क्रेनने पुन्हा ती मूर्ती नवीन ट्रॉलीवर अत्यंत सुरक्षितपणे स्थापन करण्यात आली. या संपूर्ण प्रवासात या तरुणांनी दाखवलेली तत्परता आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती.
श्रीफळ वाढवून निरोप
पहाटे ४ वाजता गणेशमूर्ती नव्या ट्रॉलीवर सुरक्षितपणे आरूढ झाली. परंतु खरी भावूक करणारी घटना यानंतर घडली. गणेशमूर्ती भिवंडीच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना होण्यापूर्वी, तिथे रात्रभर राबलेल्या त्याच मुस्लिम तरुणांनी आणि एका स्थानिक मौलानांनी श्रीगणेशाच्या चरणी श्रद्धेने श्रीफळ वाढवले.
विघ्नहर्त्याचे विघ्न दूर करून त्याला भिवंडीकडे रवाना केल्यानंतर या तरुणांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटसमयी धर्म-पंथाचा विचार न करता देवाच्या अन् माणसाच्या मदतीला धावून जाणाऱ्या या मुस्लिम तरुणांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाने मनापासून आभार मानले.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
या अभूतपूर्व प्रसंगावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “गाडीचे चाक तुटले होते, पण आपल्या बाप्पाची मूर्ती खाली पडू शकली असती का? अजिबात नाही. तिथे उपस्थित असलेल्या सर्व तरुणांनी विशेषतः मुस्लीम युवकांनी तब्बल चार तास ती भव्य गणेशमूर्ती घट्ट धरून ठेवली. सर्वांनी एकत्र येऊन क्रेन बोलावली, रस्ता रिकामा केला आणि सर्व व्यवस्था केली. त्यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ती मूर्ती उचलली, नव्या गाडीवर सुरक्षितपणे ठेवली आणि चरणी नारळ वाढवून बाप्पाला अत्यंत सन्मानाने निरोप दिला”
ते पुढे म्हणाले, “हीच खरी आपल्या मुंब्र्याची ओळख आहे. जे लोक मुंब्रा देवीच्या नावाने राजकारण करतात, त्यांना सांगू इच्छितो की ही घटना साक्षात देवीच्या मंदिरासमोरच घडली आहे. बाप्पाच्या चरणी नारळ वाढवणारे आणि निरोप देणारे आपले एक मौलाना साहेब होते.”
आमदार आव्हाड पुढे म्हणतात, “मुंब्र्यात आम्ही अशा भेदाभेदाला कधीच स्थान देत नाही. गेल्या ४०-५० वर्षांचा इतिहास पाहिला तर इथे हिंदू-मुस्लिम नावाने कधीही दंगली किंवा कसलीही गडबड झालेली नाही. हेच मुंब्रा अन् भिवंडीचे खरे रूप आहे आणि इथे फक्त आणि फक्त ऐक्य चालते.”
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया आणि राजकारणाच्या पटलावर धार्मिक वातावरण गढूळ करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण मुंब्र्याच्या या मुस्लिम तरुणांनी कृतीने या सगळ्याला चपराक दिली आहे. एकतेचा खरा अर्थ सांगणारा मुस्लिमबहुल मुंब्रा पुन्हा एकदा सामाजिक एकतेचे मोठे उदाहरण ठरला आहे.