ठाण्याच्या दहीहंडीतील फैजल शेख गोविंदा?

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 47 m ago
शहापूरचा गोविंदा फैजल सुलेमान शेख
शहापूरचा गोविंदा फैजल सुलेमान शेख

 

भक्ती चाळक

गगनाला भिडणारे थरांचे मनोरे, ढोल-ताशांचा थरार आणि ‘गोविंदा आला रे’ चा गजर. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात सध्या दहीहंडीपूर्वी हे वातावरण पाहायला मिळतेय. याच ठाण्याच्या शहापूरमधील एका २८ वर्षीय गोविंदाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. 

शहापूर तालुक्यातील धसई या छोट्याशा गावातील फैजल सुलेमान शेख दहीहंडीच्या या उत्सवात ऐक्याचा संदेश देतोय. गेल्या १० वर्षांपासून 'जय महाराष्ट्र गोविंदा पथका'मध्ये फैजल उत्साहाने सहभागी होतोय. ‘आवाज-द-व्हॉईस’शी बोलताना फैजलने आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या.

शेतीमातीतला गोविंदा
शहापूरच्या धसई या ग्रामीण भागात राहणारा फैजल शेतकरी कुटुंबातील मुलगा. सध्या वेअरहाऊसमध्ये बाउन्सर म्हणून काम करणारा फैजल दिवसाची ड्युटी संपवून संध्याकाळी जिम गाठतो आणि तिथून थेट गोविंदा पथकाच्या सराव छावणीवर पोहोचतो. 

लहानपणापासूनच मैदानी खेळांचे अतोनात वेड असलेल्या फैजलने कबड्डीमध्ये नॅशनल स्तरापर्यंत मजल मारली आहे. क्रिकेट, कुस्ती, बॉडीबिल्डिंग, थेट बैलगाडा शर्यतीमध्ये गाड्या हाकलण्यापासून ते थेट कॉमेंट्री करण्यापर्यंत खेळाच्या प्रत्येक मैदानात त्याने स्वतःचा ठसा उमटवला आहे.

आपल्या क्रीडा प्रवासाबद्दल सांगताना फैजल म्हणतो, “मला लहानपणापासूनच मैदानी खेळांची भारी आवड आहे. मला स्पर्धेत उतरायला आणि डावात भिडायला आवडतं. खेळामध्ये माझ्या पुढे कोणी जाता कामा नये, हा चिवटपणा माझ्यात लहानपणापासूनच आहे. म्हणूनच मी कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, बॉडीबिल्डिंग आणि बैलगाड्यांच्या शर्यतीतसुद्धा हिरिरीने उतरतो.”
 

खेळाला कौटुंबिक विरोध 
कोणत्याही मैदानी खेळात दुखापतीचा धोका असतोच. फैजलच्या बाबतीतही तेच घडलं. सुरुवातीला कबड्डी खेळायला जाताना घरातील मंडळींनी त्याला तीव्र विरोध केला. हात-पाय मोडतील, मोठी दुखापत होईल अशी भीती पालकांच्या मनात होती. पण फैजलने आपल्या जिद्दीच्या जोरावर कुटुंबीयांची समजूत काढली आणि मैदानात स्वतःला सिद्ध करून दाखवलं.

या संघर्षाची आठवण सांगताना फैजल म्हणाला, “सुरुवातीला घरातले कबड्डीसाठी साफ नकार द्यायचे. कुठंतरी लागेल,हात-पाय मोडतील अशी भीती त्यांना वाटायची. पण मी त्यांना ठामपणे सांगितलं की माझी शरीरयष्टी जोरकस आहे आणि हा खेळ शरीरासाठी उत्तम आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मला माझ्या शरीरावर अन् ताकदीवर पूर्ण विश्वास होता आणि घरच्यांनाही मी तो पटवून दिला.”

असा सुरू झाला दहीहंडीचा प्रवास
फैजलचे धसई गाव म्हणजे निसर्गरम्य ठिकाण. इथे मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं आहेत. आदिवासी समाजातील मुलं ज्या सहजतेने झाडांवर चढतात, ते पाहून फैजलला दहीहंडी खेळाची भुरळ पडली. 

सुरुवातीला एका मित्राच्या मध्यस्थीने तो एका स्थानिक गोविंदा पथकात गेला. पण काही कारणास्तव ते पथक बंद पडलं. अशा वेळी धावून आले ते ‘जय महाराष्ट्र गोविंदा पथका’चे सर्वेसर्वा अक्षय अधिकारी. त्यांनी फैजल आणि त्याच्या कबड्डीपटू मित्रांमधील शारीरिक ताकद ओळखली आणि त्यांना आपल्या पथकात सामील होण्यास सांगितलं.
 

पथकातील या प्रवेशाबद्दल बोलताना फैजल सांगतो, “आमचं जुनं पथक बंद पडल्यावर अक्षय दादांनी आम्हाला खूप प्रेमाने त्यांच्या पथकात बोलावलं. आम्ही नवीन असूनही त्यांनी आमचं दणक्यात स्वागत केलं. ते म्हणाले की तुम्ही कबड्डीची मुलं आहात, तुमची ताकद आणि फिटनेस भारी आहे, तुम्ही हे नक्कीच करू शकता. त्यांनी दिलेला तो विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा होता.”

धर्माच्या पलीकडची मैत्री 
फैजल आत्ता ज्या पथकात आहे तिथे तो एकमेव मुस्लीम मुलगा आहे. पण गेल्या १० वर्षांत त्याला तिथे धर्माचा किंवा परकेपणाचा अनुभव क्षणभरासाठीही आला नाही. प्रशिक्षक अक्षय अधिकारी, गणेश चव्हाण आणि श्री पाटील सर्व त्याला भावासारखं सांभाळतात.  

या ऐक्याविषयी फैजल सांगतो, “गोपाळकाला हा सणच असा आहे की प्रत्येक गावातून, प्रत्येक भागातून मुलं एकत्र येतात. या सणामुळे आमची जबरदस्त एकजूट होते आणि मैत्री वाढते. माझ्या पथकात मी एकमेव मुस्लीम मुलगा असलो तरी मला कधीच वेगळेपण जाणवत नाही. आणि मीसुद्धा माझे १०० टक्के योगदान देतो.”

फैजल पहिल्यांदा दहीहंडीच्या सरावाला गेला, तेव्हा उंच मनोऱ्याच्या अगदी वरच्या थरावर उभ्या असणाऱ्या एका लहान मुलाला पाहून तो स्तब्ध झाला. एका बापाने आपल्या लहान मुलाला कोणतीही भीती न बाळगता थेट वर चढवलं होतं आणि तो लहानगासुद्धा निडरपणे उभा होता. या दृश्याने फैजलच्या मनातील स्पर्धक जागा केला.

त्या क्षणाची आठवण सांगताना तो म्हणाला, “ते दृश्य पाहून मला वाटलं की, एक छोटासा मुलगा कसलीही भीती न बाळगता थेट टोकावर उभा राहू शकतो आणि त्याचा बाप त्याला निसंकोचपणे तिथे पाठवतो, तर माझी तर बॉडी टेक्चर एवढी कडक आहे, मी हे का नाही करू शकत? तिथेच माझ्यातल्या खेळाडूने ते आव्हान स्वीकारलं आणि मी या खेळात पूर्णपणे उतरलो.”

सामाजिक बांधिलकीचा सण
दहीहंडी हा सांघिक खेळ आहे. बक्षीस, चषक किंवा फ्रेम ही कोण्या एकाची नसून पूर्ण मंडळाची असते. जय महाराष्ट्र गोविंदा पथक दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ‘शहापूरचा महाराजा’ बसवतं. या गणेशोत्सवादरम्यान सर्व गोविंदांना एकत्र बोलावून त्यांचा सन्मान केला जातो आणि ट्रॉफी दिल्या जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दहीहंडीतून जमणारा सर्व निधी मंडळ स्वतःकडे ठेवतं आणि पथकातील एखाद्या मुलाला अचानक आर्थिक मदतीची गरज भासल्यास मंडळ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं.

याबाबत फैजल म्हणतो, “हा खेळ एकाचा नाही, सर्वांचा आहे. दहीहंडीतून मिळणारं पारितोषिक अन् रक्कम आमच्या मंडळाकडे जमा राहते. आमच्या पथकाची सर्वात भारी गोष्ट म्हणजे, आमच्या पथकातील एखाद्या गोविंदाला अचानक काही अडचण आली किंवा आर्थिक गरज लागली, तर आमचे कोच अन् मंडळ त्याच्या मदतीला लगेच धावून जाते.”

दहीहंडी हा हिंदूंचा उत्सव आहे, परंतु तरीही फैजल यामध्ये हिरीरीने सहभागी असतो. या पथकात तो एकटा मुस्लिम असला तरीही त्याला इथे वेगळेपण जाणवत नाही, हे आपल्या महाराष्ट्राचं वेगळेपण आणि आपली संस्कृती आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News