अजानबाबत पुजाऱ्याचे वक्तव्य व्हायरल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 46 m ago
मंदिराचे पुजारी
मंदिराचे पुजारी

 

भक्ती म्हणजे काय? भक्तीचा खरा अर्थ इतकाच की आपल्या वागण्याने, आपल्या प्रार्थनेने समोरच्याच्या मनाला किंवा शरीराला कसलीही वेदना होता कामा नये... एका हिंदू पुजाऱ्याने आपल्या भक्तांना दिलेला हा कानमंत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

धार्मिक सणांमध्ये डीजेच्या वापरामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद होत आहेत. याच कारणावरून देशात वातावरण तापवले जात असताना, एका पुजाऱ्याने अत्यंत संयमाने मांडलेला हा विचार लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेलाय.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मंदिरातील पुजारी आपल्या सेवेकऱ्यांशी आणि भक्तांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधताना दिसतात. आरती आणि अजानची वेळ जवळपास एकच येत असल्याचे लक्षात आल्यावर या पुजाऱ्याने घेतलेली भूमिका खरोखरच विचार करायला लावणारी आहे.

पुजारी भक्तांशी संवाद साधताना म्हणतात, "आरतीची वेळ आणि अजानची वेळ जवळपास एकच आहे. हे तुम्ही लोकांनी नीट लक्षात ठेवा. आपल्या आसपास काही मुस्लिम बांधवसुद्धा राहतात. जर आपली आरती आधीच सुरू झाली असेल तर काहीच हरकत नाही. पण जर आरती सुरू झाली नसेल आणि अजान सुरू झाली असेल, तर आपण २ मिनिटे थांबून घेतले पाहिजे. कारण देवाचे नाव तेही घेतात अन् देवाचे नाव आपणही घेतो. विनाकारण हिंदू-मुस्लिम वाद आम्हाला अजिबात पसंत नाही. अशी कोणतीही तक्रार माझ्याकडे यायला नको."

धर्माच्या नावावर भिंती उभारण्याऐवजी, एकमेकांच्या प्रार्थनांचा सन्मान करत एकत्र कसे जगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठच या पुजाऱ्याने आपल्या शब्दांतून दिला आहे.

मनाची शांती महत्त्वाची
मोठमोठ्याने साऊंड वाजवून देवाची भक्ती सिद्ध होत नसते, हा महत्त्वाचा संदेशही पुजाऱ्याने आपल्या सेवेकऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत समजावून सांगितला. वृद्धांना, आजारी व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास होतो, याची जाणीव त्यांनी सर्वांना करून दिली.

ते पुढे म्हणतात, "आपले साऊंड खूप हाय क्वालिटीचे आहेत. त्यामुळे सर्व सेवेकरी आणि भक्तांनी हे साऊंड अशा पद्धतीने वाजवायचे की कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याने हनुमान जी खूश होत नाहीत. हे सगळे फक्त वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठी केले जाते. जर कोणी वृद्धाने किंवा आजारी व्यक्तीने येऊन 'आवाज कमी करा' असे सांगितले, तर लगेच आवाज कमी करायचा. एका मर्यादेत आणि योग्य पद्धतीनेच साऊंड वाजला पाहिजे."

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडीओ इंटरनेटवर येताच लोकांनी पुजाऱ्याच्या या समंजस विचारांचे उस्फूर्त स्वागत केले. "ईश्वराची प्रार्थना करताना दुसऱ्याच्या शांतीचा भंग होणार नाही याची काळजी घेणे हीच खरी धार्मिकता," अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव चालवला आहे.

शेवटी सर्वांकडून हनुमंताचा जयघोष करून घेत या पुजाऱ्याने संवादाचा सांगता केली. जातीय तणाव आणि धार्मिक वादाच्या बातम्या रोज ऐकायला मिळत असताना, या पुजाऱ्याने दाखवलेली समज, संयम आणि सामाजिक सलोख्याची ही वाट संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter