जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वी युट्युबर ध्रुव राठी ताब्यात; CJP कडून तात्काळ सुटकेची मागणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 57 m ago
ध्रुव राठी आणि दिल्लीतील बंदोबस्त
ध्रुव राठी आणि दिल्लीतील बंदोबस्त

 

नवी दिल्ली

जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी गुरुग्राममधील त्यांच्या सेक्टर ५६ मधील निवासस्थानावरून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. कॉक रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते आले होते.

पोलिसांची कडक कारवाई आणि CJP चा विरोध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सुमारे ५० जवानांचे पथक शनिवारी सकाळी ध्रुव राठी यांच्या गुरुग्राम येथील घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर कॉक रोच जनता पार्टीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ध्रुव राठी यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. राठी यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या 'एक्स' (X) अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून या आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले होते.

जर्मनीहून भारतात आलेले राठी यांनी ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथील CJP च्या निदर्शनांमध्येही सहभाग घेतला होता. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून, राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील या आंदोलनापूर्वी पोलिसांनी शेकडो जणांना ताब्यात घेतले आहे.