नवी दिल्ली
दिल्लीत कॉक रोच जनता पार्टीच्या (CJP) जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आंदोलनादरम्यान महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष 'पिंक फोर्स' (सर्व-महिला पथक) तैनात करण्यात आली असून, पोलिसांना युनिफॉर्मवर घालत कॅमेरे (बॉडी कॅम्स) देण्यात आले आहेत.
मागील काही आंदोलनांदरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या गैरवर्तनाचे प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आंदोलकांकडून महिला पोलिसांना धक्काबुक्की करणे, गणवेश फाडणे यांसारखे प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकारी आता कमी प्रकाशातही रेकॉर्ड करणाऱ्या बॉडी कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून आतापर्यंत ४०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच राजीव चौक, नवी दिल्ली, केंद्रीय सचिवालय यांसारख्या ४५ मेट्रो स्टेशनचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय दिल्लीत येणाऱ्या २५० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून जनपथ-कर्तव्य पथ परिसराजवळ इंटरनेट सेवाही तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे.