मुंबईतील मीरा रोडवर हिंदू-मुस्लीम-शीख-ईसाई बांधवांचा अभूतपूर्व 'वॉक फॉर पीस'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
'वॉक फॉर पीस'च्या माध्यमातून मीरा रोडच्या नागरिकांकडून शांतता व भाईचाऱ्याचा संदेश
'वॉक फॉर पीस'च्या माध्यमातून मीरा रोडच्या नागरिकांकडून शांतता व भाईचाऱ्याचा संदेश

 

मुंबई/मीरा रोड:

काही महिन्यांपूर्वी मीरा रोड शहरात घडलेल्या काही अनुचित घटनांमुळे आणि जातीय तणावाच्या बातम्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला होता. पण, "द्वेषाचं राजकारण इथल्या मातीला जास्त काळ टिकवता येणार नाही," हेच इथल्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. समाजात पसरवली जाणारी नफरत मुळासकट उखडून टाकण्यासाठी आणि 'अमन आणि भाईचाऱ्याचा' पैगाम देण्यासाठी मीरा रोडवर नुकताच भव्य'वॉक फॉर पीस' आयोजित करण्यात आला होता.

या पदयात्रेने संपूर्ण देशाला 'गंगा-जमनी' संस्कृतीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे.

सर्व धर्म आणि राजकीय पक्षांची मांदियाळी

या 'वॉक फॉर पीस'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही एक धर्म, जात किंवा पक्ष नव्हता; तर इथला फक्त आणि फक्त 'माणूस' रस्त्यावर उतरला होता. 'बॉम्बे कॅथोलिक सभा'चे अध्यक्ष डॉल्फी डिसूझा, इस्कॉन मिशनचे तपोवन हरीक आणि जीवन दास, मौलाना फैयाज बाकरी, फादर मायकेल आणि फादर गिल्बर्ट यांसारख्या विविध धर्मांच्या प्रमुख धर्मगुरूंचा यात सहभाग होता.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांचे नेते एका झेंड्याखाली आले होते. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीरा-भाईंदर अध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाम नबी फारुकी, वंचित बहुजन आघाडीचे इक्बाल महाडिक, जमात-ए-इस्लामी (मीरा रोड) चे अध्यक्ष डॉ. तारिक शाह, विद्यमान नगरसेविका ॲड. सना देशमुख आणि माजी नगरसेविका मेरीलीन डिसूझा यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी खांद्याला खांदा लावून चालत होते.

शहीद कौस्तुभ राणे यांच्या स्मारकापाशी सांगता

ही शांतता रॅली मीरा रोडच्या सूर्या शॉपिंग सेंटर (सृष्टी कॉम्प्लेक्स) येथून सुरू झाली. त्यानंतर पूनम क्लस्टर हाउसिंग सोसायटी, सेंट झेवियर्स, सिंगापूर प्लाझा या मुख्य मार्गांवरून फिरत, मीरा रोड रेल्वे स्टेशनसमोरील'शहीद मेजर कौस्तुभ राणे'यांच्या स्मारकाजवळ येऊन या रॅलीची अत्यंत भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.

या संपूर्ण मार्गावर"भाईचारा झिंदाबाद", "हिंदू-मुस्लीम-शीख-ईसाई, आपस मे है भाई-भाई", "कौमी एकता झिंदाबाद"आणि"हम सब एक है"अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

 

नफरत पसरवणाऱ्यांना आयोजकांचा संदेश

'मीरा-भाईंदर फॉर पीस' या बॅनरखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेचे मुख्य आयोजक सादिक बाषा यांनी यामागची भूमिका सांगितली. ते म्हणाले, "गेल्या काही वर्षांत आमच्या शहरातील समुदायांच्या मधील विश्वासाला तडा गेला होता. नफरत पसरवणाऱ्या काही संघटनांनी समाजात फूट पाडण्याचा आणि शहराचा शांततापूर्ण माहौल खराब करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. या विषारी वातावरणाला उत्तर देण्यासाठी आणि शहरात पुन्हा एकदा जातीय-धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठीच आम्ही या रॅलीचे आयोजन केले आहे."

दुसरे आयोजक समीर वागले यांनी सांगितले की, "आमचा उद्देश एकच आहे, एक मजबूत आणि शांतताप्रिय शहर बनवणे! इथल्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांचा आदर करावा आणि नफरत पसरवणाऱ्यांच्या जाळ्यात न अडकता सर्वांनी प्रेमाने राहावे, हाच आमचा हेतू आहे."

"शांतता हीच आज सर्वात मोठी गरज!"

रॅलीत सहभागी झालेल्या धर्मगुरूंनीही उपस्थितांना अत्यंत मोलाचा संदेश दिला. ख्रिश्चन धर्मगुरू फादर गिल्बर्ट आपला अनुभव सांगताना म्हणाले, "आज वेगवेगळ्या धर्मांचे लोक शांततेसाठी एकत्र चालत आहेत, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. केवळ भारतातच नाही, तर आज संपूर्ण जगाला 'शांततेची' सर्वात जास्त गरज आहे. आपण सर्वांनी प्रेम, मैत्री आणि सद्भावनेचा संदेश सगळीकडे पोहोचवला पाहिजे."

याच वेळी एका हिंदू धर्मगुरूंनी परखड विचार मांडले. ते म्हणाले, "प्रत्येकाला इथे आदराने आणि प्रेमाने जगण्याचा अधिकार आहे. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये, किंवा सण कसे साजरे करावेत, हे सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येकाने शिस्तीचे पालन करत आणि दुसऱ्याच्या भावनांची कदर करत आपले सण एकत्र साजरे केले पाहिजेत. ही रॅली शांततेच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे."

हातांत फुले आणि ओठांवर प्रेमाची गीते...

या रॅलीत बच्चेकंपनीपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते महिलांपर्यंत शहरातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अनेकांच्या हातात फुलांचे गुच्छ होते, तर काहींनी हातात भाईचाऱ्याचेसंदेश देणारे बॅनर आणि पोस्टर्स धरले होते. संपूर्ण रॅलीमध्ये शांततेवर आणि राष्ट्रीय एकतेवर आधारित गीते आणि कविता गायल्या जात होत्या.

शेवटी आयोजकांच्या छोट्याशा मनोगताने आणि उपस्थितांचे आभार मानून या 'वॉक फॉर पीस'ची सांगता झाली. समाजात धर्माच्या नावाखाली फुट पाडणाऱ्या प्रवृत्तींना, मीरा रोडच्या जनतेने प्रेमाच्या आणि भाईचाऱ्याच्या या पदयात्रेतून दिलेले हे उत्तर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे!